ग्रांट डफने शिवाजी महाराजांना निरक्षर ठरवताना केवळ ऐकीव माहितीवर किंवा सदोष गृहीतकावर विश्वास ठेवला, एवढ्यापुरताच राजवाड्यांचा त्याच्यावरचा राग मर्यादित नव्हता; त्याने ते विधान करण्यापूर्वी आवश्यक तो गृहपाठ मुळीच केला नाही, यामुळेही त्यांची नाराजी होती. ती व्यक्त करण्यासाठी त्यांनी लिहिले, ‘सामान्यत: बर्याच शिवकालीन मराठ्यांना लिहिता-वाचता येत असे. शिवाजीचा पणजा, आजा, बाप, आई, मुलगा, नातू, पणतू, खापरपणतू, चुलतभाऊ वगैरे भोसल्यांच्या कुळातील सर्व व्यक्तींना लिहितावाचता येत होते; त्यांच्यापैकी अनेकांची अस्सल हस्ताक्षरे मजजवळ आहेत. भोसल्यांच्या लिहितावाचता येणार्या कुलात एकटा शिवाजीच तेवढा निरक्षर राहावा, हे तर सकृद्दर्शनीच चमत्कारिक आहे. परंतु डफसारख्या धूर्त गप्पीदासाला हा असंभाव्य चमत्कार खरा वाटून घ्यावा लागला, हे स्पष्टच आहे.’
शिवरायांच्या साक्षरतेचे पूर्वप्रकाशित साहित्यामधील उल्लेखांचे दाखले देत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘येथूनतेथून सर्व मराठी बखरींमध्ये शिवाजीला दादोजी कोंडदेवाने लिहिण्यावाचण्याला शिकवले, असे स्पष्ट म्हटलेले आहे. सभासदी बखर, चिटणिशी बखर, शिवाजीप्रताप, शिवदिग्विजय, शहाण्णव कलमी बखर वगैरे सर्व बखरींत शिवाजीच्या साक्षरतेची कथा दिलेली आढळते. गायन, वादन, पुराणवाचन, संस्कृत धर्मशास्त्र, राजनीति वगैरे शाखा शिवाजीला शिकविल्याची विस्तृत वर्णनेही कित्येक बखरींतून आढळतात. ती सर्व एकीकडे बाजूला ठेवून ‘शिवाजी अक्षरशत्रु होता’, असे निर्लज्ज विधान करण्यास डफला काय आधार मिळाला, तो समजत नाही. मराठी बखरींतील इतर मजकूर जसा डफने आपल्या इंग्रजी बखरीत प्रमाणभूत म्हणून उतरवून घेतला, तसा हाही मजकूर प्रमाणभूत समजून नमूद करावयाला कोणती हरकत होती? पण इतका प्रामाणिकपणा लिहिण्यात ठेवल्यावर, मग इंग्रजपणा तो काय राहिला? गप्पांनी भरलेले काही युरोपियन इतिहास माझ्या पाहण्यात आहेत, परंतु डफच्या या गप्पीदासपणाची सर त्यांपैकी एकालाही येणार नाही… त्याने केेलेले सत्यापलापी विधान आपमतलबीपणाने व नालस्ती करण्याच्या बुद्धीने केले आहे, यात काडीचाहि संशय नाही.’
हे निर्णायक भाष्य केल्यानंतर राजवाड्यांनी शिवरायांच्या साक्षरतेच्या १४ प्रमाणांची एकापाठोपाठ एक अशी यादी दिली व ग्रांट डफच्या म्हणण्याला प्रमाण एकही नाही, हे अधोरेखित केले आणि पुढे म्हटले, ‘निराळे एक प्रमाण आहे, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. तेही देता येण्याचे साधन सध्या मजजवळ आहे. पाचसहाशे वर्षांपूर्वी कित्येक हिंदू राजे ताम्रपटावर विशेष अगत्य असल्यास ‘स्वहस्तोयं महाराज श्रीनरवर्मदेवस्य’, ‘स्वहस्तोयं भोजदेवस्य’ अशा सह्या स्वहस्ताने लोखंडी लेखणीने खोदीत असत. मोगल पातशहा सही न करता अगत्याचे आज्ञापत्र किंवा महजर असल्यास स्वत:चा पंजा शाईत बुडवून लेखावर उठवीत असत. त्याचप्रमाणे अगत्याच्या दस्तऐवजावर मराठे भोसले छत्रपति ‘बहुत काय लिहिणें’ अशी अक्षरे स्वहस्ताने लिहून लेखसमाप्ति करीत असत. हे समाप्तीचे वाक्य स्वत: स्वहस्ताने शिवाजीने लिहिलेले एक पत्र सोबत देतो… हे पत्र मुधोळच्या मालोजी घोरपड्याला शिवाजीने लिहिले आहे. शहाजीराजे भोसले यांना कैद करणारा जो बाजी घोरपडे मुधोळकर, त्याचा मुलगा मालोजी घोरपडे.’
यानंतर ते संपूर्ण पत्र उद्धृत करून झाल्यावर राजवाड्यांनी शिक्कामोर्तब करीत लिहिले, ‘राज्याभिषेकानंतर पुढे दोन वर्षांनी शिवाजीने तंजावरावर स्वारी केली. वाटेत रघुनाथपंत हणमंत्याच्या हस्ते कुतुबशाहासी शिवाजीची भेट झाली व तह झाला. एकाचा जो मित्र व शत्रु तो दुसर्याचा मित्र व शत्रु हे या तहातील मुख्य कलम होते. त्यावेळी बहलोलखान पठाणाने विजापूर बळकावले होते. त्याच्या गोटातून मालोजी घोरपड्याला फोडण्याकरिता शिवाजीने हे सलगीचे पत्र लिहिले आहे. पत्राचा सर्व मजकूर शिवाजीच्या मुखातला असून ‘बहुत काय लिहिणे’ हे वाक्य खुद्द शिवाजीच्या हातचे आहे… आता यापुढे तरी शिवाजीला लिहिता येत होते, ही बाब नाकारण्याचे औद्धत्य प्राय: कोणी करणार नाही!’
