पुण्यातल्या दोन मुद्रणालयांच्या सहकार्याने ऐतिहासिक साधनांवरचा ग्रंथ छापून प्रकाशित करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या कारणांनी फसल्यानंतरही राजवाड्यांनी धीर सोडला नाही. ते पुन्हा वाईला जाऊन राहिले आणि तिथल्या ‘मोदवृत्त’ छापखान्यात त्यांनी पुन्हा काम सुरू केले. त्या छापखान्याचे मालक होते, भाऊशास्त्री लेले. त्यांनी राजवाड्यांना शब्द दिला होता, ‘छपाईच्या कामात जातीने लक्ष घालीन.’ त्यांनी तो शब्द पाळला. प्रारंभापासूनच त्यांनी कच्ची मुद्रिते राजवाड्यांकडून तपासून आली की, त्या सगळ्या दुरुस्त्या आपल्या कामगारांकडून केल्या जातील, याबद्दल दक्षता घेतली. वेळप्रसंगी कामगारांना राजवाड्यांची भीती दाखवून, तर कधीतरी दिवसभरातल्या कामाबद्दलच्या अपेक्षांचे बंद सैल सोडून त्यांनी ते काम धिम्या गतीने पण सुयोग्य पद्धतीने चालू ठेवले.

मुद्रितांची दुसरी फेरी वाचण्याचे काम म्हणजे पहिल्या कच्च्या मुद्रितांमध्ये राजवाड्यांनी ज्या दुरुस्त्या दर्शवलेल्या असतील, त्या तशाच्या तशा झाल्या आहेत की नाहीत, याची खातरजमा करून घेण्याचे काम भाऊशास्त्र्यांनी स्वत:कडे घेतले. आपल्या छापखान्यामध्ये चाललेल्या इतर कामांपेक्षा हे काम मुळातच वेगळे आहे, हे ओळखण्याइतपत ते समंजस होते; त्यामुळे कामाच्या प्रारंभी राजवाड्यांना जसा दोन-तीन वेळा मुद्रिते तपासण्यासाठी वेळ खर्च करावा लागत होता, तसा नंतरच्या काळात करावा लागत नसे. राजवाड्यांनी तीन-चार वेळा दुसर्‍यांदा मुद्रिते तपासायला घेतली आणि त्यांना सुखद धक्का बसला. आधीच्या फेरीत दाखवलेल्या सगळ्याच चुका नीट दुरुस्त झालेल्या त्यांना आढळल्या. न राहवून त्यांनी शास्त्रीबुवांना विचारले, तेव्हा त्यांना समजले की, ती खरे म्हणजे दुसरी नसून तिसरी मुद्रिते आहेत. दुसर्‍या फेरीतले तपासणीचे काम शास्त्रीबुवांनी आपणहून पार पाडले होते आणि निघालेल्या किरकोळ दुरुस्त्यादेखील करवून घेतल्या होत्या. मग त्यांनी ती जबाबदारी विश्वासाने शास्त्रीबुवांवरच सोपवली.

हे अनपेक्षित सहकार्य छापखाना मालकांकडून मिळाल्यामुळे राजवाड्यांचे कष्ट वाचले खरे; पण त्यामुळे त्यांनी सुरू असणार्‍या मोहिमेत अधूनमधून उसंत घेतली, असे मात्र झाले नाही. ‘मोदवृत्त’ छापखान्यातले काम धिम्या गतीने होत होते, याबद्दल त्यांची तक्रार नव्हती. ते दर्जेदार व निर्दोेष स्वरूपात पुढे सरकते आहे, यावर ते समाधानी होते. मग त्यांनी विचार करून संहितेचा परीघ वाढवायचे ठरवले.

प्रारंभी ते केवळ पंडित-बोपर्डीकरांनी दाखवलेल्या दादासाहेब येरंडे यांच्या वाड्याच्या तिसर्‍या मजल्यावरील भिंतीच्या अंबारीतील पेटार्‍यामधली ऐतिहासिक कागदपत्रेच प्रकाशित करण्याच्या विचारात होते. थोडी उसंत मिळाल्यावर राजवाड्यांची संपादकीय दृष्टी अधिक ताजीतवानी झाली. त्या पेटार्‍यात एकूण पत्रे होती सुमारे ७००. दादासाहेबांचे पूर्वज जनार्दनपंत येरंडे यांना नानासाहेब पेशव्यांनी बुंदेलखंडातले त्यांचे मामलतदार गोविंद बल्लाळ यांच्यावर दरखदार म्हणजे तपासनवीस म्हणून पाठवले होते. १७५७ ते १७६१ या कालावधीत ते बुंदेलखंडात असताना ती पत्रे त्यांच्याजवळ जमा झाली होती. ती वाईला परत आल्यावर त्यांनी आपल्या वाड्यात जी ठेवून दिली, ती तशीच राहिली होती. १७६१ नंतर १८९७च्या एप्रिलपर्यंत ती कातड्याने मढवलेल्या एका पेटार्‍यात कोरी करकरीत पडून होती. ती सगळीच्या सगळी प्रकाशित करण्याजोगी आहेत का, हा प्रश्न राजवाड्यांनी स्वत:च स्वत:ला विचारला आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या निकषांवर नकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्यांनी कागदपत्रांची निवड करण्याचे काम आरंभले. अखेरीस त्यांनी फक्त १८२ पत्रेच या प्रस्तावित खंडामध्ये समाविष्ट करण्याजोगी आहेत, असे ठरवले आणि पानिपतच्या मोहिमेसंबंधीच्या त्या पत्रांबरोबरच इतरही काही कागदपत्रे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. एकूण ३०४ पत्रे निश्चित केल्यावरच संपादक राजवाड्यांनी ‘हुश्श’ म्हटले. त्या ‘इतर’ कागदपत्रांत होती, पैठणला वाण्याच्या दुकानातल्या रद्दीतून राजवाड्यांनी शोधून काढलेली २३ पत्रे; मिरजेच्या इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी दिलेली २५ पत्रे आणि वाईच्याच गोविंदराव भानू यांच्याकडून मिळवलेली ७५ पत्रे. हे तीन निरनिराळे स्रोत राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेत नोंदवले आणि शोधमोहिमेचा वाढता परीघही सूचित केला… त्या वाढत्या परिघाची त्यांनी ‘केसरी’मधून सांगितलेली माहिती पुढील लेखात…