‘शक ९६१च्या (इसवी सन १०३९च्या) सुमारास लिहिलेल्या मूळ पोथीची शक १३६९च्या (इसवी सन १४४७च्या) सुमारास केव्हातरी केेलेली नक्कल आपल्या हाती लागली आहे’, असे स्पष्ट करून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘मूळ मराठी पोथीची ही कितवी नक्कल आहे न कळे, परंतु श्रीपतीची मूळ मराठी टीका मोठ्या अक्षरांनी लिहून नक्कलकाराने स्वत:चे लिहिणे बारीक अक्षरांनी लिहिले आहे व त्यात स्वत:च्या कालाचा सहजगत्या निर्देश करून ठेविला आहे… नक्कलकाराने संस्कृत श्लोक अगदी अशुद्ध लिहिले आहेत; मराठी टीकाही फारशी शुद्ध लिहिली आहे, असे नाही.
भाषा शक ९६१मधील कित्येक स्थळी आहे, परंतु नक्कलकाराने तिला आधुनिक म्हणजे शक १३६८-६९च्या सुमाराची करण्यास कमी केलेले नाही… या सार्या नक्कलकारांची ही खोडच आहे. प्राय: मूळ ग्रंथ जसाच्या तसा बिनचूक कान्हामात्रासुद्धा उतरावयाचे वळण या लोकांना नाहीच. इतके मात्र खरे की, या गावठ्या जोशाचे आपल्यावर ही पोथी लिहून ठेवल्याबद्दल फार उपकार आहेत…’
ते उपकार स्मरून राजवाड्यांनी कर्तव्यबुद्धी जागी ठेवून सुमारे ३२ छापील पाने भरतील एवढी ती मराठी टीका १५७ स्पष्टीकरणात्मक टिपांसह आणि विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्रावरचे विवेचन असल्यामुळे त्यात असणार्या ग्रहगणिताशी संबंधित काही कोष्टकांसह छापून प्रसिद्ध केली. पोथीमध्ये फुलपाखराचे ऊर्फ पतंगाचे एक चित्रदेखील समाविष्ट होते.
राजवाड्यांनी ते चित्र तर छापलेच, परंतु त्यासोबत स्पष्टीकरणात्मक तळटीपही जोडली, ती अशी होती की, ‘पतंग म्हणजे सूर्य व पतंग म्हणजे फुलपाखरू असे दोन अर्थ मराठीत पतंग या शब्दाचे होत असल्यामुळे पतंगाचे चित्र काढून सूर्याचे व सूर्यमालिकेचे स्मरण पाहणार्याला करून देण्याचा हेतू लेखकाचा किंवा मूळ ग्रंथकाराचा असावा…’ राजवाड्यांनी जरी अशा रीतीने आपले कर्तव्य पार पाडले, तरी ‘या आद्य मराठी ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने संशोधनक्षेत्रात राजवाडे यांनी मारलेली झेप व गाठलेली उंची समकालीनांना पेलता आली नाही आणि या ग्रंथाच्या उत्तरकालीन संशोधकांनीही नंतर प्रकाशित झालेल्या पुरवण्यांमध्ये ग्रंथाची फारशी चिकित्सा न करताच ‘हा ग्रंथ मराठी भाषेतला आद्य ग्रंथ ठरत नाही’, एवढीच ‘रत्नमाले’ची बोळवण केली आहे’, हे श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत केलेले भाष्य बरेच काही सांगून जाते.
संशोधकांच्या झापडबंद प्रवृत्तीमुळे कधीकधी चुकीचेच निष्कर्ष साधार व सप्रमाण सिद्धांतांच्या नावाखाली कसे प्रचलित होतात, याचे सर्व अभ्यासकांनी लक्षात घ्यावे, असे उदाहरण म्हणून राजवाडे यांच्या ‘ज्योतिषरत्नमाले’बद्दलच्या दाव्याचा उल्लेख केला पाहिजे. ‘ज्योतिषरत्नमाले’वरील मराठी टीका ही श्रीपतीनेच लिहिली आहे, त्यामुळे ती मराठी आद्यग्रंथ मानली जावी. हा १९१४साली राजवाड्यांनी केलेला दावा होता. जरी समकालीनांकडून त्याला लगेच मान्यता मिळाली नसली, तरी पुढे १९५७ साली डॉ. मु. ग. पानसे यांनी आणखी एका हस्तलिखिताच्या मदतीने ‘ज्योतिषरत्नमाले’च्या समग्र मराठी टीकेचे संपादन केले व ते पुस्तक डेक्कन महाविद्यालयाने प्रकाशित केले. या समग्र टीकेत ‘मी श्रीपति’ असे उल्लेख चार ठिकाणी आले होते.
राजवाडेसंहितेत केवळ दोनच होते, त्यावरून काढलेल्या निष्कर्षाला डॉ. पानसे संपादित पूर्ण टीकेमुळे दुजोरा मिळत होता. आणि तरीदेखील डॉ. वि. भि. कोलते १९६८ साली प्रकाशित केलेल्या ‘प्राचीन मराठी संशोधन’ या आपल्या ग्रंथात त्याची यत्किंचितही दखल न घेता ‘मी श्रीपती’ हे मराठी उल्लेख मूळ संस्कृत संहितेचे अनुवादरूपच आहेत, असा एकांगी निष्कर्ष काढून मोकळे झाले. १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहासा’च्या पहिल्या खंडात संपादक डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी आवर्जून विशेष टीप लिहून डॉ. कोलते यांचीच री ओढली. या दोन्ही विद्वानांनी डॉ. पानसे यांनी संपादित केलेल्या प्रतीचा तटस्थ वृत्तीने अभ्यास केला असता, तर आपले मत बदलणे आणि राजवाड्यांनी १९१४ साली केलेला दावा मान्य करणे त्यांना भाग पडले असते!
परंतु तसे घडले नाही, राजवाड्यांचा दावा अधांतरी लोंबकळतच राहिला…
anand47.hardikar@gmail.com
