पाटण येथील शिलालेखावरच्या मराठी ओळींचा आपण प्रत्यक्ष शिळेवरून उतरवून घेतलेला अधिक शुद्ध उतारा देऊन झाल्यावर राजवाड्यांनी त्यामधील बहुतेक सर्वच शब्दांचे सुलभ अर्थ स्पष्ट करणार्या ७४ टिपा तर लिहिल्याच, पण त्याचबरोबर त्या उतार्यातील मराठी भाषेच्या स्वरूपावरून तिची कालनिश्चिती करण्याचाही घाट घातला. तो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यांनी लिहिले, ‘हे शक ११२८मधील (इसवी सन १२०६मधील) मराठी आहे. ह्याच्यानंतर ८४ वर्षांनी ज्ञानेश्वरी झाली. आज शक १८२८ला (इसवी सन १९०६मध्ये) हा शिलालेख लिहिला जाऊन बरोबर ७०० वर्षे झाली. शक ११२८मध्ये महाराष्ट्रावर सार्वभौम जो पहिला जैतुगि यादव त्याचे राज्य होते व पाटण शहरी जैतुगीचा मांडलिक जो हेमाडिदेव निकुंभ त्याचे राज्य होते. ज्याअर्थी सर्वसामान्य लोकांना कळण्याकरितां शिलालेखाचा हा भाग तत्कालीन मराठीत लिहिला आहे, त्याअर्थी निकुंभांच्या राज्यांत – चाळीसगांव प्रांतांत त्याकाली मराठी भाषा प्रचलित होती, हे उघड आहे. इतकेच नव्हे, तर शक ११२८च्या पूर्वी सुमारे तीनशे वर्षांपर्यंत मराठी भाषेचा प्रचार महाराष्ट्रात असावा, असे निश्चयाने म्हणता येते…’
आपल्या या निष्कर्षाचे राजवाड्यांनी लगेच स्पष्टीकरणही दिले. त्यांनी लिहिले, ‘कारण मठ बांधणारा जो चांगदेव त्याने आपल्या पूर्वीच्या आठ पिढ्या दिल्या आहेत… (१) कविचक्रवर्ती त्रिविक्रम (मूळ पुरुष), शक ८३०-८७० (२) भास्करभट्ट भोजराजा धारकर याचा विद्यापति, शक ८८०-९२२ (३) गोविंद सर्वज्ञ, शक ९२० (४) प्रभाकर, शक ९५० (५) मनोरथ, शक ९८० (६) कवीश्वर महेश्वराचार्य, शक १०१० (७) प्रसिद्ध भास्कराचार्य ज्योतिर्विद, शक १०३६-११०५ (८) लक्ष्मीधर, जैनपालाचा मुख्य पंडित, शक १०६०-११२८ (९) चांगदेव, सिंघण चक्रवर्तीचा मुख्य ज्योतिषी, मठ बांधणार, शक ११२८ (या सर्व शकांमध्ये ७८ मिळवले की इसवीसन समजतील) ह्या नावांपैकी चांगदेव सिंघण राजाच्या पदरी होता व सिंघण राजा शक ११३२पासून ११७०पर्यंत राज्य करीत होता. शिवाय चांगदेवाने आपला आजा जो प्रसिद्ध भास्कराचार्य, त्याचे ग्रंथ पढविण्याकरिता मठ बांधिला, तेव्हा त्याचा काल तर निश्चित आहे. भास्कराचार्य शक १०३६त जन्मला व त्याने आपला ‘करणकुतूहल’ हा ग्रंथ शक ११०५मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी लिहिला, हे सर्वजनश्रुत आहे…’
या तपशीलवार माहितीच्या आधारे मराठी भाषेची कालनिश्चिती करण्याच्या प्रयत्नात राजवाड्यांनी त्या शिलालेखाच्या संस्कृत भागाचाही आधार घेतला व त्यासाठी भाऊ दाजी व किलहॉर्न यांचाही हवाला दिला. त्यांनी लिहिले, ‘भास्कराचार्य ज्योतिष्याचा पांचवा पूर्वज जो भास्करभट्ट तो भोजराजाचा विद्यापति होता, असेे प्रस्तुत शिलालेखाच्या संस्कृत भागांत म्हटले आहे. हा भोज म्हणजे धारचा भोज राजा होय, असे भाऊ दाजी म्हणतो. तो अंदाज खरा धरल्यास भास्करभट्ट विद्यापति शक ९००मध्ये हयात होता, असे मानावे लागते, कारण धारचा भोज राजा त्या वेळी राज्य करीत होता, हे सर्वमान्य आहे…’
पुढे राजवाड्यांनी लिहिले, ‘शक ९९०मध्ये विद्यापति होण्यास भास्करभट्टाचे वय निदान तीस वर्षांचे तरी असावे, असे मानल्यास त्याचा जन्म ८७०त पडतो. भास्करभट्टाचा पिता त्याच्या जन्मकाळी तीस वर्षांचा असावा, असे अनुमान केल्यास कविचक्रवर्ती त्रिविक्रमभट्ट शक ८४० किंवा ८३०च्या सुमारास हयात असावा, असे मानणे उचित वाटते. आणि हे मत जर सयुक्तिक असेल व आठ पिढ्या एकाच देशात अव्याहत राहणार्या एकाच कुटुंबाची भाषा (धर्मांतरादि विपरीत कारणे नसल्यास) एकच असते, हा सिद्धांत गृहीत धरला, तर महाराष्ट्रात राहणार्या त्रिविक्रमभट्टाचे कुटुंब शक ८३०च्या सुमारास मराठी भाषा बोलत असले पाहिजेत, हाही सिद्धांत ग्रहण करावा लागतो.’ मराठी भाषेच्या आदिकालाची निश्चिती करण्याच्या उत्कट इच्छेपोटी राजवाड्यांनी आरंभलेला कल्पनाविलास तेथेच थांबला नाही, तो अधिक मागे जात राहिला.
