मुक्तेश्वराने आपल्या काव्यात विविध लोकसमूहांचे जे उल्लेख केले होते, ते पूर्णत: काल्पनिक नसून वस्तुनिष्ठ असल्याचे आपले मत ठामपणे मांडत राजवाड्यांनी आपल्या त्या लेखात पुढे म्हटले, ‘इंग्रेजदिकांविषयी लिहिताना विघ्नकर्ते, दंडेले, जलतस्कर, मांसाशी वगैरे विशेषणे कवीने योजलेली आहेत. मुक्तेश्वराने केलेला या दंडेलीचा उल्लेख काल्पनिक नसून अत्यंत खरा असल्याचे पुढील उतार्‍यावरून दिसून येईल.

मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचा एकेकाळी व्हाइसप्रेसिडेंट असलेल्या फिलीप अंडर्सन याने ‘द इंग्लिश इन वेस्टर्न इंडिया’ या नावाचे एक पुस्तक पन्नास वर्षांपूर्वी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या ६८-६९ पानांवर हा मजकूर आहे…’ असे म्हणून राजवाड्यांनी तो मोठा इंग्रजी उतारा उद्धृत केला.

‘साहसी इंग्रजांची संख्या जरी वाढत गेली, तरी त्या प्रमाणात इंग्रजांची प्रतिष्ठा मात्र सुधारली नाही, कारण कंपनीच्या जहाजांचे कप्तानसुद्धा उघडउघड डाकूगिरी करण्यास कचरत नसत, फक्त जबरदस्त प्रत्याघाताची शक्यता नाही, याबद्दल आधी त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली जात असे’, असे त्यात म्हटले होते, काही प्रत्यक्षदर्शी अधिकार्‍यांच्या समकालीन नोंदींमुळे त्या निरीक्षणाला दुजोरा मिळत असल्याचे नमूद केले होते आणि हिंदू-मुसलमानांच्या दृष्टीने इंग्रज म्हणजे आपल्या बापालाही फसवायला मागेपुढे न पाहणारे क्रूर कपटी लोक असल्याचा शेराही मारलेला होता.

अंडर्सनच्या पुस्तकातील ते उद्धरण देऊन झाल्यावर राजवाड्यांनी लिहिले, ‘ही हकीकत इ. स. १६३० च्या सुमाराची आहे. या सुमारास सुरत, सुपार, ठाणे, वाळुकेश्वर, दाभोळ, कारवार, मलबार वगैरे प्रदेशांतून हिंडताना मुक्तेश्वराला या म्लेच्छ लोकांच्या दुष्ट स्वभावाची माहिती प्रत्यक्ष व कर्णोपकर्णी झाली, यात संशय नाही.

ज्या अनेक म्लेच्छ लोकांची नावे मुक्तेश्वराने दिली आहेत, त्यांच्यापैकी कित्येक त्याने सुरत, दाभोळ वगैरे बंदरांत पाहिले असावेत, असे दिसते… १६६१मध्ये राजापुराहून ज्यांना शिवाजीने हाकून काढिले, त्या इंग्रजांहून हे १६३० ते १६४० मधील इंग्रज मुक्तेश्वराला जास्त माहीत होते, हे वरील उतार्‍यावरून स्पष्ट आहे, कारण १६६०च्या सुमाराला इंग्रज सभ्यपणा व माणुसकी जास्त दाखवू लागले, असे अंडर्सन लिहितो… तेव्हा मुक्तेश्वराने आपले भारत १६५०च्या सुमारास लिहिले, असे ठाम विधान करण्यास हे सबळ कारण आहे…’

मुक्तेश्वराने (महा)भारत इ. स. १६५० पूर्वी लिहिले असावे, या आपल्या तर्काधारित विधानाला आणखी एका काव्यांतर्गत आधार आहे, असे राजवाड्यांनी सांगितले. आदिपर्वाच्या दोन अध्यायांतील नऊ ओव्या उद्धृत करून त्यांनी लिहिले, ‘या उतार्‍यात निरनिराळ्या देशांतील युद्धपद्धतींचे वर्णन केले आहे. मराठा क्षत्रिय लांब भाल्यांनी लढत, असे त्रेपन्नाव्या ओवीत म्हटले आहे.

महाराष्ट्रातील लोक शत्रूचा सूड उगवण्याच्या कामी विशाल पैज मारतात. पैज मारून लखलखीत पाणीदार तरवारींनी लढतात आणि खंडताही खंडले जात नाहीत, असा अर्थ चौपन्नाव्या ओवीचा होतो. तेलंगी लोक धनुष्याने, बर्बर लोक वाघनखांनी व फिरंगी लोक गलबतांवरील तोफांनी झुंजतात, असा पुढील ओव्यांचा अर्थ आहे. आता शिवाजीने १६६०च्या पुढे गलबत्ते, तोफा, घोडे, गड, वाघनखे, तरवारी, भाले व क्वचित तीरकामठे या सर्वांचा उपयोग केलेला प्रसिद्ध आहे.

१६६०च्या पुढे, जर मुक्तेश्वर असता, तर महाराष्ट्रयुद्धाचे त्याने दिले आहे त्यापेक्षा निराळे वर्णन दिले असते. शिवाजीच्या उदात्त पराक्रमाची वार्ता जर त्याच्या ध्यानात येण्यासारखी मोठी असती, तर तिचा उल्लेख त्याच्या काव्यात सहेतुक विशेषणांच्या रूपाने किंवा तुलनेच्या ओघात नि:संशय आला असता. सारांश, मुक्तेश्वराचे भारत १६५०च्या आधी लिहिले गेले, यात बिलकूल संशय नाही…’

राजवाड्यांनी जाता जाता दिलेला आणखी एक पुरावा म्हणजे ‘इंग्रज, डच, फिरंगी (पोर्तुगीज) यांचा उल्लेख मुक्तेश्वर जसा वारंवार करतो, तसा फ्रेंच लोकांचा एकदासुद्धा करीत नाही,

कारण त्याच्या वेळी फ्रेंच लोक हिंदुस्थानात आलेच नव्हते. त्या लोकांनी आपली पहिली वखार सुरतेस १६६८ मध्ये घातली. त्याअर्थी ते लोक स्थापित होण्यापूर्वी मुक्तेश्वर झाला, असे म्हणणे भाग पडते!’ 

anand47.hardikar@gmail.com