‘१७३१पासून १७४०पर्यंत बाजीरावाची सर्व खटपट याच हिंदुपदबादशाहीच्या स्थापनेप्रीत्यर्थ झाली. दक्षिणेस तुंगभद्रा, उत्तरेस यमुना, पश्चिमेस समुद्र आणि पूर्वेस निजामुल्मुकाचा प्रांत व पूर्वसमुद्र या वाढत्या हिंदुपदबादशाहीच्या सीमा झाल्या. हे एवढे काम करून बाजीराव बल्लाळाने आपला अवतार संपवला’, असा महत्त्वाचा तपशील संक्षेपाने नोंदवून राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेत बाळाजी बाजीरावाच्या (म्हणजेच नानासाहेब पेशव्यांच्या) कारकीर्दीबद्दलचे विवेचन सुरू केले.

१७४० ते १७५० या कालावधीत ‘प्रामुख्याने आधी जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था लावण्यावर त्याचा विशेष भर राहिला व अधूनमधून काशी, प्रयाग, कटक, गढेमंडळ, बहादुरभेंडा इत्यादी प्रदेशांकडे त्याने आपली दृष्टी फेकली. परंतु ही दृष्टी नागपूरकर रघोजी भोसल्यांचा पाडाव करण्यापुरती व दक्षिणेत पूर्वापार चालत आलेले हक्क प्रस्थापित करण्यापुरतीच होती…’

१७५०नंतर मराठेशाहीत एक महत्त्वाचा बदल घडून आला. त्या गुणात्मक बदलाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी राजवाड्यांनी लिहिले, ‘१७५०पर्यंत मराठ्यांचे आधिपत्य सातारच्या छत्रपतींकडे होते. त्यांच्या नावाने हिंदुपदबादशाहीचा प्रसार व स्थापना करण्याची मेहनत बाजीराव बल्लाळाने आणि बाळाजी बाजीरावाने केली. शाहूराजापेक्षा मुत्सद्देगिरीने व पराक्रमाने बाजीराव बल्लाळ अतिश्रेष्ठ होता; परंतु शाहूचे आधिपत्य कमी करण्याकडे त्याचा बिलकूल कल नव्हता. बाळाजी बाजीरावाला पेशवाई मिळाल्यापासून मात्र शाहूचे व त्याच्यानंतर येणार्‍या छत्रपतींचे माहात्म्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. शाहू असेतोपर्यंत बाह्यात्कारे छत्रपतीची सेवा अनन्यभावे करण्याचा बाळाजीने बहाणा केला व तो वारल्यानंतर रामराजा गादीवर आला असता त्याची पायमल्ली बाळाजीने मन:पूत परंतु मोठ्या युक्तीने केली. बाळाजीच्या खर्‍या पराक्रमाला व त्याच्या मनात घोळत असलेल्या अवाढव्य हेतूंना खरे स्वरूप शाहूच्या मरणानंतर म्हणजे १७५०पासून येऊ लागले. त्या वर्षापासून बाळाजी बाजीराव मराठ्यांचा खरा पुढारी झाला व सातारच्या छत्रपतींचे आधिपत्य अस्तास गेले. १७५०पासून १७६१सालापर्यंत सर्व भरतखंड महाराष्ट्रमय करून टाकण्याचा बाळाजीने उद्योग केला. सारांश, १७५० सालापासून ब्राह्मणपदबादशाहीचा प्रारंभ झाला व हिंदुपदबादशाही हा शब्द मागे पडला.’

आपल्या प्रस्तावनेच्या सुमारे सात पानांच्या दोन उपप्रकरणांमधून राजवाड्यांनी १७५० ते १७६१ या कालावधीत मराठेशाहीत घडून आलेल्या त्या ‘क्रांती’चे संदर्भ देत देत स्पष्टीकरणही दिले. बाळाजी बाजीरावाच्या राजनैतिक धोरणाचे त्यांनी केलेले पृथक्करण असे होते-

‘(अ) हिंदुस्थानात पश्चिमोत्तर दिशेने उत्तर रजपुताना, अंतर्वेद, रोहिलखंड, मुलतान, लाहोर, ठठ्ठा व भकर या प्रांतांत अंमल बसवावयाचा. (ब) हिंदुस्थानात पूर्वेकडे काशी, प्रयाग, अयोध्या, बंगाला इत्यादी प्रदेशांवर मोहीम करावयाची. (क) दक्षिणेत पूर्वेकडे सलाबतजंगाचा प्रदेश घ्यावयाचा, ऐन कर्नाटकात श्रीरंगपट्टणाला हिंदू राजांच्या ताब्यात ते होते तोपर्यंत अंकित करून टाकावयाचे व पुढे मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर जिंकून घ्यावयाचे. (ड) कोकणात सुरत, जंजिरा वगैरे ठिकाणे खालसा करावयाची. (ई) खुद्द महाराष्ट्रात सातारची व कोल्हापूरची गादी एक करावयाची. (फ) आणि सरदारांची व्यवस्था लावावयाची…’

राजवाडे बाळाजी बाजीरावाच्या मनसुब्यांचे असे पृथक्करण करून थांबले नाहीत, तर त्यांनी उपलब्ध कागदपत्रांचे संदर्भ देत मराठे आणि अब्दाली यांच्यातील वितुष्टाबद्दलचे ग्रांट डफचे म्हणणे खोडून काढण्याचे धारिष्ट्यही दाखवले. ‘रघुनाथरावाने १७५८मध्ये लाहोर घेतले, त्यामुळे अब्दाली चवताळला व मराठ्यांच्या अंगावर पानिपतचा घोर प्रसंग आला, असे डफ म्हणतो; ते फारसे विश्वसनीय नाही’, असे त्यांनी म्हटले. ‘दिल्लीच्या पातशहाने पश्चिमोत्तर दिशेकडील प्रदेश १७५० मध्येच मराठ्यांना बहाल करून टाकले होते, त्याच वेळी अबदालीला तंबी देण्याचे वचन मराठ्यांनी पातशहाला दिले होते. तेव्हापासूनच अबदालीचा व मराठ्यांचा सामना होणार, हे ठरून गेल्यासारखेच होते, त्यामुळे रघुनाथरावाला विनाकारण दोष देण्यात अर्थ नाही, अशी खात्री होईल’, हे राजवाड्यांनी विविध कागदपत्रांचे संदर्भक्रमांक देत ठामपणे म्हटले. बाळाजी बाजीरावाने आपल्या पूर्वनियोजित धोरणानुसार १७६०पर्यंत लाहोर, मुलतान, ठठ्ठा, भकर, अंतर्वेद, रोहिलखंड, कटक, नागपूर, माळवा, गुजराथ, काठेवाड, खानदेश, औरंगाबाद, विजापूर, कोकण व किल्ले कोपलपर्यंतचा सर्व मुलूख मराठ्यांच्या साक्षात अमलाखाली आणला, याचा तपशीलही त्यांनी आपल्या विवेचनात समाविष्ट केला.