पानिपत मीमांसेवरील चर्चा आवरती घेणे भाग ठरणार आहे. तरीही त्र्यं. शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या लेखनावर आक्षेप घेताना मांडलेल्या काही मुद्द्यांची चर्चा करणे मात्र टाळता येणार नाही.
शेजवलकर हेसुद्धा राजवाड्यांप्रमाणेच, किंबहुना भूगोलाची इतिहासाशी सांगड घालून दाखवण्याबाबत राजवाड्यांच्याही चार पावले पुढची मजल मारणारे थोर इतिहासकार होते. राजवाड्यांचे मराठेशाहीबद्दलचे विवेचन बहुतांशी प्रमाण मानून दुसरे प्रसिद्ध इतिहासलेखक गोविंद सखाराम तथा ‘रियासत’कार सरदेसाई यांनी आपल्या नानासाहेब पेशव्यांच्या चरित्रात एक प्रकरण लिहिले होते- ‘हिंदुपदपातशाहीची सिद्धता’. त्या प्रकरणात त्यांनी म्हटले होते, ‘शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच मराठ्यांचे धोरण या देशात हिंदूंची सार्वभौम सत्ता स्थापण्याचे होते… रजपूत राजांशी स्नेह ठेवून स्वधर्मरक्षणाकरता सर्व हिंदूंनी एक होण्याची जरुरी केवढी आहे, ही गोेष्ट शिवाजीने आपल्या राजकीय पत्रांतून व्यक्त केलेली आहे… पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्यासाठीच विशेष निष्ठेने हिंदुपदपातशाहीचा उद्योग आरंभिला…’
सरदेसाईंच्या १९२५ मध्ये प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकाला प्रस्तावना होती शेजवलकरांची. अवघ्या तिशीत असताना शेजवलकरांनी ३६ पृष्ठांच्या त्या दीर्घ प्रस्तावनेत मूळ पुस्तकातील प्रतिपादन खोडून काढण्याचा जो प्रयत्न केला, तो बौद्धिक साहसाचा उत्कृष्ट नमुनाच ठरला. सबंध मराठेशाहीच्या एकंदर वाटचालीवरच टीका करणारे भाष्य होते ते. ते फक्त सरदेसाईंनाच नव्हे, तर थेट राजवाड्यांनाही आव्हान होते. त्या प्रस्तावनेमुळे प्रकाशझोतात आलेले शेजवलकर ‘पानिपत १७६१’ या पुढे कित्येक वर्षांनी प्रकाशित झालेल्या आणि आजही महत्त्वाचा संदर्भस्रोत म्हणून प्रचलित असलेल्या ग्रंथामुळेसुद्धा आपल्या सध्याच्या संदर्भात दखलपात्र ठरतात.
‘इतिहाससंशोधक राजवाड्यांनी आपल्या पहिल्या खंडाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत पेशव्यांचा हेतू हिंदुपदपातशाही स्थापण्याचाच होता, असे खोटे प्रतिपादन मोठ्या कुशल वावदूकतेने केले. ही गाजलेली प्रस्तावना सबंध मराठ्यांचा इतिहास दूषित करण्यास समर्थ ठरली आहे’, अशा कडवट व कठोर शब्दांत शेजवलकरांनी राजवाड्यांच्या त्या प्रस्तावनेवर आपल्या पुस्तकात टीका केली.
‘राजवाडे विचारदर्शन’ या समीक्षाग्रंथात डॉ. प्र. न. जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ग्रंथकारापेक्षा (‘रियासत’कार सरदेसाईंपेक्षा) जरा जास्त उंचीवर चढून, जरा खोल बुडी मारून मराठ्यांच्या इतिहासाचा पट डोळ्यांसमोर आणून शेजवलकरांनी ही चिकित्सा केलेली असल्यामुळे तिला महत्त्व आहे… एखादे प्रमेय तावून सुलाखून घ्यावे, ऐतिहासिक साधनांच्या निकषांवर घासून घ्यावे, हे योग्यच आहे. परंतु राजवाडे यांनी मांडलेल्या प्रमेयांचा सारा पटच उधळून लावण्यातील कसब शैलीच्या दृष्टीने मोहक असले, तरी विचारांच्या बैठकीवर कितपत टिकेल, हे पाहणे इष्ट ठरेल.’
‘शेजवलकरांच्या मते मराठे, विशेषत: पेशवे सतत चुकतच गेले. दक्षिणेतील निजामाचा समूळ मोड न करता त्यांनी उत्तरेत स्वार्या केल्या, हे चुकले. सारी दक्षिण मोकळी असताना पेशवे नर्मदेच्या पलीकडे गेले, हेही त्यांच्या मते बरोबर नाही. पेशवे उत्तरेत गेेले तरी कशासाठी? महाराष्ट्रधर्माच्या प्रसारासाठी? हिंदुपदपातशाहीची स्थापना कशासाठी? की दिल्लीच्या मोगल बादशाहीच्या संरक्षणासाठी? ‘मराठा तितुका मेळवावा’ हा शिवाजीचा गुरुमंत्र पुढे लक्षात रहिला नाही का? थोडक्यात मराठ्यांना उत्तर भारतात जाण्याचे काही कारणच नव्हते, त्यांना तसा हक्कच नव्हता…’ तथापि मराठेशाहीच्या राजवाडेकथित इतिहासावर असे टीकास्त्र सोडणारे शेजवलकर अबदालीला मात्र झुकते माप देताना आढळले आणि हा विरोधाभास लक्षात आणून देताना डॉ. जोशींनी शेजवलकरांवर केलेली टीकाही तितकीच बोचरी होती. त्यांनी लिहिले, ‘मराठ्यांना उत्तरेत जाण्याचा अधिकार नव्हता असे म्हणणारे शेजवलकर अबदाली हिंदुस्थानवर कोणत्या हक्काने स्वारी करतो, देवळे लुटण्याचा व निरपराधी लोकांच्या कत्तली करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला, हा प्रश्न मात्र कधीच विचारीत नाहीत, उलट अबदालीलाच ‘अफगाण शिवाजी’ हा किताब बहाल करतात!’… आश्चर्यकारकच नाही का?
