ऐतिहासिक साधनांचा आणखी एक खंड राजवाड्यांनी १९०१ साली कोल्हापूरहून प्रकाशित केला. त्याला त्यांनी तिसरा क्रमांक दिला. एकूण ५२२ पानांच्या त्या मोठ्या खंडामध्ये एकंदर ५६८ पत्रे संकलित स्वरूपात छापली होती. कान्होजी आंग्रे यांच्या उदयापासून संभाजी आंग्रे यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे साधारणत: १६८० पासून १७४२ पर्यंत कोकणपट्टीतील राजकारणाबद्दलची चर्चा राजवाड्यांनी आपल्या या खंडाच्या प्रस्तावनेत केली असली, तरी ती चर्चाविषय ठरली वेगळ्याच वादामुळे.

या खंडाच्या प्रकाशनापूर्वी सुमारे दोन वर्षे दत्तात्रय बळवंत पारसनीस या इतिहासकारांनी धावडशीच्या ब्रह्मेंद्र्रस्वामींची सुमारे ३७५ पत्रे साक्षेपाने गोळा केली होती. ती पत्रे महत्त्वाची होती, तथापि त्या पत्रांपैकी बर्याच पत्रांच्या तारखा ठरवल्या नसल्यामुळे आणि ज्या काही पत्रांच्या तारखा पारसनीसांनी आपल्या मनाने ठरवल्या होत्या, त्या चुकल्यामुळे कोकणातील आंग्रे, सिद्दी वगैरेंच्या हालचालींचा वृत्तांत त्यातल्या गुंतागुंतीसह नीट उलगडून दाखवणे त्यांना शक्य झाले नाही. एकीकडे त्यांनी त्या पत्रांबद्दलच्या अपूर्णतेची कबुली दिली, परंतु दुसरीकडे ती पत्रे ग्रंथरूपाने छापताना ब्रह्मेंद्रस्वामींची स्तुती करणार्या चरित्राची त्याला जोड दिली. त्यांच्या पुस्तकाचे नावच मुळी होते- ‘महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर : चरित्र व पत्रव्यवहार’. आपण जी पत्रे प्रसिद्ध करीत आहोत, त्यांच्या आधारे स्वामींचे मोठेपण सहजासहजी सिद्ध होण्यासारखे नाही; उलट ते दुष्ट, कारस्थानी खलपुरुष होते, असे दुसर्या टोकाचेच चित्र उभे राहते आहे, याची यत्किंचितही पर्वा न करता पारसनीसांनी ब्रह्मेंद्रस्वामींना समर्थ रामदासांच्या उंचीवर नेऊन ठेवले होते.

या विसंगतीवर राजवाड्यांनी टीकास्त्र सोडले. त्यांनी स्वत: ब्रह्मेंद्रस्वामींची दोन-अडीचशे पत्रे मिळवली. ती आपल्या तिसर्या खंडामध्ये समाविष्ट केली आणि प्रस्तावनेमध्ये पारसनीसांना ‘ब्रह्मेंद्रस्वामींचा बगल्या वकील’ अशी शेलकी उपाधी प्रदान करून ते मोकळे झाले. राजवाडे यांनी केलेल्या या वैयक्तिक टीकेपेक्षाही ती प्रस्तावना अधिक लक्षवेधी ठरली, ती एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन कसे करावे, याबद्दल त्यांनी केलेल्या विवेचनामुळे.

राजवाडे यांनी खुलासेवार लिहिले, ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाच्या गुणदोषांचे जे चित्र काढावयाचे असते, ते दस्तऐवजी पुराव्यांवरून काढावयाचे असते. रा. पारसनीसांनी ब्रह्मेंद्रस्वामींचे जे चरित्र स्वामींच्या पत्रव्यवहाराला जोडले आहे, त्यात या दोन्ही गोष्टींचा त्यांनी विचार केलेला दिसत नाही. त्यांनी छापलेले दस्तऐवज पाहावेत, तर त्यांत स्वामींचे जे चरित्र दृश्यमान होते, ते या गृहस्थांनी लिहिलेल्या चरित्राशी बिलकूल जुळत नाही. एखाद्या बगल्या वकिलाने एखाद्या कुळाचा कज्जा घ्यावा, न्यायाधीशापुढे आपल्या कुळाच्या नालस्तीचे तेवढे दस्तऐवज रुजू करावे आणि तोंडाने मात्र कुळाच्या साळसूदपणाचे पोवाडे गावे, तशातलाच प्रकार प्रस्तुत इतिहासपटूचा झाला आहे!… शिवाय ज्या नायकाचे किंवा नायिकेचे चरित्र लिहावयाला घ्यावयाचे, तो नायक किंवा ती नायिका रणपटू, विद्यापटू, दानपटू, शौर्यपटू अथवा सर्वगुणपटू दाखवणे आपले कर्तव्यच आहे, असे या इतिहासपटूला वाटत असल्यामुळे त्याच्या हातून हे असले बगल्या वकिलाचे अर्धवट मासले लोकांच्या पुढे मांडले जातात. पारसनीसांनी अस्सल लेख छापले नसते आणि स्वामींचे चरित्र लिहिले असते व त्यात स्वामी सर्वगुणसंपन्न असल्याचे विधान केले असते, तरीदेखील मनुष्यमात्राच्या ठायी अशा सर्वगुणसंपन्नत्वाचा आरोप करणे अवास्तव आहे असे म्हटल्यावाचून राहवले नसतेच; पण पारसनीसांनी तर अस्सल लेख छापून सर्वगुणसंपन्नतेचा समारोप स्वामींवर केलेला आहे. त्यामुळे रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टग्सिं वगैरे इंग्रज राजकार्यधुरंधरांच्या मेकॉले वगैरेंनी काढलेल्या मलिन चरित्रपटांवर सफेतीचा हात फिरवणार्या कित्येक आधुनिक इंग्लिश इतिहासपटूंचे स्मरण होते!’

‘राष्ट्रीय नीतिमत्तेच्या दृष्टीने ब्रह्मेंद्रस्वामींचे वर्तन आक्षेपार्ह, निषेधार्ह होते, याचे दाखले पदोपदी सापडत असतानाही पारसनीस त्यांना नीतिमत्तेचा केवळ पुतळा बनवतात, असा वस्तुविपर्यास करण्यात त्यांचा काय बरे हेतू असेल, त्यांनाच ठाऊक’, असे म्हणून राजवाड्यांनी तो विषय संपवला होता.