कॉम्रेड डांगे यांनी राजवाड्यांसाठी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत खेतवाडीतील मुद्रणालयाचा पत्ता दिला होता, तथापि काही दिवसांनी त्यांनी आपले मुद्रणालय तेथून हलवून ठाकुरद्वारला ‘इंदुप्रकाश’च्या आवारात आणले होते. एवढी माहिती देऊन डांगे यांनी पुढे लिहिले, ‘त्या बदललेल्या पत्त्याचा शोध काढून एक दिवस शुभ्रवेषधारी तापसीवत् दिसणारे दोन धिप्पाड पुरुष माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यातले एक होते वि. का. राजवाडे व दुसरे शं. रा. (म्हणजेच ‘आहिताग्नि’) राजवाडे’. त्यावेळी मी त्यांच्या पहिल्या लेखाचे इंग्रजी भाषांतर करत होतो. त्याची प्रुफे माझ्यासमोर होती. त्या पहिल्या लेखाचा मराठीत छापलेला सोळा-पानी फॉर्मही टेबलावर पडला होता. राजवाडे मला म्हणाले, ‘‘तुमची चिठ्ठी मिळाली. तुम्ही हा ग्रंथ पुढे छापू इच्छिता असे म्हटले होते, म्हणून नीट चौकशी करण्यासाठी आलो आहे’’…’

‘त्यांनी असे म्हणताच मी त्यांना मराठीतील फॉर्म दाखवला आणि या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करून छापण्याचाही माझा विचार आहे, असे सांगून माझ्या ‘सोशॅलिस्ट’ मासिकाच्या पानांची गॅलीप्रुफे त्यांच्यापुढे धरली. राजवाड्यांच्या रागीट स्वभावाची ख्याती मला माहीत होती म्हणून मी हे सर्व भीतभीतच करीत होतो. तोपर्यंत स्वत: राजवाडे आणि त्यांच्याबरोबर आलेले आहिताग्नि राजवाडेसुद्धा खुर्चीवर बसले नव्हते. तसा मीही अर्थातच उभा होतो. नंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही बरेच धाडसी दिसता. हा ग्रंथ छापलात तर कर्मठ मंडळी तुमचा छापखाना जाळतील. पण तुमचा निश्चय असल्यास मी एक तोड सुचवितो. मी हा ग्रंथ अद्याप पूर्ण लिहिलेला नाही. तेव्हा मी त्याचे क्रमश: सोळा पानांचा फार्म होईल, असे एक एक प्रकरण तुमच्याकडे पाठवीन. तुमच्याकडून छापील फॉर्म आला नाही, तर मी समजेन की हा ग्रंथ तुम्हांलाही झेपत नाही. हे समजून मी पुढचे प्रकरण लिहिणारही नाही आणि पाठवणारही नाही. ही योजना तुम्हांला पसंत आहे का?’’ मी उत्तर दिले की, ‘‘काहीही झाले तरी हा ग्रंथ छापण्याचा मी निश्चय केला आहे. या ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात माझ्या मार्क्सप्रणीत इतिहासाला बळकटी आणण्यासारखा मसाला मला हिंदुस्थानाच्या इतिहासातून तुम्ही दाखवला व पुढेही तो तसाच मिळेल. म्हणून मी हा खटाटोप करीत आहे…’’

‘त्यावर राजवाडे माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘म्हणजे तुम्ही हे तुमच्या शास्त्रासाठी करणार आहात, असे दिसते म्हणूनच एखाद्या व्यापार्‍यासारखी तुम्हांला दिवाळे निघण्याची भीती वाटत नाही’’…’ डांगे यांनी प्रस्तावनेत आवर्जून नमूद केलेला हा संवाद दोन्ही महापुरुषांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगून जातो.

खरे म्हणजे राजवाड्यांनी त्यापूर्वी इतिहासविषयक जे काही लेखन केले होते, त्यामध्ये कुठे काही मार्क्सवादाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भलावण केलेली नव्हती. परंतु स्वदेशाभिमान जागवणार्‍या त्यांच्या लेखनाचा डांगे यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. तो इतका होता की, १९२० साली त्यांनी काही दिवस इंग्रजी मिशनर्‍यांच्या एका शाळेत मास्तरकी केली होती, तेव्हा मॅट्रिकच्या इतिहासवर्गाच्या तासाला पाठ्यपुस्तक बाजूस सारून शिवछत्रपतींच्या स्वराज्य-स्थापनेचा इतिहाससारांश राजवाडे यांच्या प्रतिपादनानुसार सांगितला होता. त्यांचे हे चाकोरीबाहेरचे शिकवणे शेजारच्या वर्गातून आडून प्रिन्सिपलबाईंनी ऐकले. त्या इंग्रज होत्या. त्यांचा तिळपापड झाला. डांगे यांना ताबडतोब बोलावून घेत, झाल्या दिवसांचा पगारही न देता, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यापर्यंत त्या बाईंची मजल गेली होती. (डांगेचरित्रात एरवी सहसा न आढळणार्‍या या घटनेचा उल्लेख त्यांनीच या प्रस्तावनेच्या प्रारंभी केला होता.)

राजवाडेलिखित ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथातील सामग्री वाचून डांगे यांना असा विश्वास वाटू लागला होता की, कम्युनिस्ट तत्त्वज्ञान-प्रस्थापक कार्ल मार्क्स व त्यांचे सहकारी फ्रेडरिक एंगल्स ह्यांनी लिहिलेल्या ‘कुटुंबसंस्था, खाजगी मालमत्ता व शासनसंस्था’ नामक ग्रंथाला संपूर्ण पूरक असा खात्रीलायक पुरावा भारतीय शास्त्रातून व इतिहासातून राजवाड्यांच्या ग्रंथामुळे आपल्याला मिळेल. त्यामुळे त्यांनी हा ग्रंथ राजवाड्यांकडून पूर्ण करून घेण्यासाठी ते साहसी पाऊल उचलले.