गोविंद बल्लाळ खेर ही व्यक्ती राजवाड्यांच्या पानिपतविषयक समीक्षालेखनामधली एक प्रमुख व्यक्तिरेखा. तिच्याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिणे स्वाभाविक होते. ‘१७३३मध्ये गोविंदपंत बुंदेलखंडात आले, हे अनेक ग्रंथांवरून दिसते म्हणून रा. पारसनीस म्हणतात, तो त्यांचा गैरसमज आहे.

बाजीराव १७४०मध्ये वारल्यावर बुंदेले हिस्सा देण्यास तक्रार करू लागले, त्या वेळी गोविंदपंतांची नेमणूक बुंदेलखंडाच्या कमविसीवर झाली. (‘या संबंधात बाजीरावाच्या मृत्यूचा सन १७३९ म्हणून ‘भारतवर्ष’कार देतात, तोही चुकला आहे. ‘काव्येतिहाससंग्रहा’तले क्र.११चे पत्र चिमाजीअप्पाने २९ सप्टेंबर १७४०ला लिहिले आहे, तर क्र.४९चे पत्र बाळाजी बाजीरावाने १७४१च्या जानेवारीत धावडशीच्या स्वामीला लिहिले आहे. त्या पत्रात ‘बाजीरावाला मरून आठ महिने झाले न झाले तोच चिमाजी अप्पा वारले’, असा उल्लेख आहे. त्यावरून बाजीराव मे १७४०मध्ये वारला, हे स्पष्ट आहे…’ अशा दुरुस्त्यासुद्धा राजवाड्यांनी जाताजाता सुचवल्या.)

जैतपूरची लढाई झाल्यावर १७४६मध्ये बुंदेलखंडाची बुंदेल्यांनी कायमची वाटणी करून दिली व १७४७मध्ये गोविंदपंताची बुंदेलखंडातील मातबर मामलतीची कारकीर्द सुरू झाली…’

‘गोविंदपंत फौजफाटा ठेवून बुंदेलखंडात अंमल बसवू लागला. पुढे तो १७५४मध्ये बराच वजनदार मामलतदार झाला; पण १७५७च्या सुमारास पेशव्यांना त्याच्याविषयी संशय येऊ लागला. तो आपल्या मामलतीत पैशाची अफरातफर करतो, असा संशय आल्यावरून पेशव्यांनी त्यावर्षी येरंडे व कानिटकर हे दोन दरकदार (सरकारी अधिकारी) त्याच्याबरोबर दिले. त्यांनी गोविंदपंताबद्दल केलेल्या तक्रारी सदाशिवरावभाऊंपर्यंत पोचल्या…’ ही सारी हकीकत राजवाड्यांनी सांगितली.

साधनखंडामधील क्र. १४१चे पत्र पुराव्यादाखल उद्धृतही केले. ‘गोविंदपंतांनी शिबंदीप्यादाचा खर्च जास्त वाढवला. पाच प्यादे होते, तेथे पंचवीस ठेवले… फौज मन मानेल तशी ठेवून खर्च बहुत करतात… भेटी व नजराणे अंतस्ते घेतात (स्वत:कडे ठेवतात)… कलमरुजुवात होत नाही (हिशोब/ जमाखर्च जुळत नाही)… यांच्या दहशतीमुळे रयत किंवा जमीदार कोणी आम्हांस भेटत नाही… जेथे शिबंदी बहुत नलगे ते परगणे शिंद्याकडे देतात व बहुत शिबंदी लागती ते परगणे सरकारात ठेवतात…’ वगैरे वगैरे नऊ तक्रारी त्या पत्रात नमूद केलेल्या होत्या.

राजवाड्यांनी आणखीही कागदपत्रे संदर्भादाखल पुढे केली. क्र. १३३ ते १५०, क्र. २०१, २११, २१६, २१७अ, २२४, २२७, २२९, २३०, २३७, २३९, २४२, २५७, २५९, २६८ ही एवढी पत्रे अवश्य वाचण्याची शिफारसही त्यांनी केली. या पत्रांमधील मजकुरावरून हे स्पष्ट होत होते की, येरंडे-कानिटकर या दोन दरकदारांनी केलेल्या तक्रारी सदाशिवरावभाऊंनी गोविंदपंताचा पुण्यातील वकील बाबूराव नरसी यास दाखवल्या.

बाबूरावाने तक्रारींची यादी जशीच्या तशीच गोविंदपंताकडे पाठवली. ती पाहून त्याचे धाबे दणाणले व तो येरंडे-कानिटकर यांची आपल्यास सांभाळून घ्या म्हणून विनवणी करू लागला. गोविंदपंत अफरातफर करीत असे, याची शाबिती त्याने आपली आपणच करून घेतली. हिशोब समजून देण्याकरता येरंडे गोविंदपंताला आपल्याकडे बोलावत असता तो सबबी काढून भेटायला येण्याचे कसे लांबणीवर टाकत होता, हे या पत्रांवरून कळत होते.

तीन वर्षांचा हिशोब एरंडेला न दाखवता गोविंदपंतानेे कागदपत्रे रुमालात बांधून आपल्याबरोबर घेऊन जाण्याचा प्रकार घडल्यावर संशय येऊन येरंडे गोविंदपंताचा जमादारखाना जप्त करू लागला, तेव्हा त्याच्यावर रागवायलाही गोविंदपंताने कमी केले नाही. नंतर खुशामतीच्या मार्गाचाही त्याने अवलंब करून पाहिला. १७६०च्या एप्रिलपासून सदाशिवरावभाऊ उत्तरेतच होते, त्यांनाही गोविंदपंताने येरंड्याप्रमाणेच फसवले. पेशव्यांची त्याच्यावर गैरमर्जी होणे अपरिहार्य होते, अटळ होते. त्याची दखल घेऊन आपले वर्तन सुधारण्याऐवजी गोविंदपंत पेशव्यांचा द्वेष करू लागला. त्याचे ते नैतिक अध:पतन मराठ्यांना प्रचंड हादरा देणारे ठरणार होते!

anand47.hardikar@gmail.com