साधनांच्या शोधात पायपीट करणार्‍या संशोधकाला शारीरिक श्रम काय करावे लागतात व मानसिक विकारांवर कशी मात करावी लागते, हे सांगितल्यावर राजवाड्यांनी संशोधकाच्या बौद्धिक तयारीचा मुद्दाही मांडला. त्यांनी लिहिले, ‘संशोधनाचे काम चोख होण्यासाठी संशोधकाला आपल्या कामाची व्याप्ती कळली पाहिजे. ती विशिष्ट विद्वत्ता असल्यावाचून कळणार नाही. प्रथम इतिहासाचा प्रांत कोणता व केवढा त्याची अटकळ संशोधकास पाहिजे. या संसारात प्रवृत्तीच्या ऐलथडीपासून निवृत्तीच्या पैलथडीपर्यंत व्यक्ति, कुल, समाज, देश, राष्ट्र व मानवजाति यांच्या सर्व प्रकारच्या ज्या असंख्य घडामोडी, त्यांची कालदेशानुसार जी व्यवस्थित हकीकत, तिचे नाव ‘इतिहास’ आणि त्या घडामोडींची जी फुटकळ प्रमाणे, त्यांचे नाव ‘इतिहासाची साधने’. त्या साधनांचा शोध हे संशोधकाचे काम’.

त्यानंतर अधिक स्पष्टता यावी म्हणून राजवाड्यांनी साधनांच्या वर्गीकरणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी लिहिले, ‘घडामोडी असंख्य असतात. त्यांचे व्यवस्थित आकलन व्हावे, म्हणून वर्गीकरण आवश्यक ठरते. काही घडामोडी धर्मासंबंधी असतात; काही राजकारणविषयक असतात. काही केवळ समाजविषयक असतात; काही विद्याविषयक असतात; काही कलाविषयक असतात व काही केवळ व्यापारविषयक असतात. या सहा मुख्य वर्गांचे पुन्हा शेकडो उपवर्ग आहेत. त्या सर्वांवर शोधकाची दृष्टि असली पाहिजे. राजकारणविषयक साधने तेवढी घ्यावयाची व इतर सोडावयाची, असे करून चालावयाचे नाही. मानवी संसारात – व्यक्तींच्या, राष्ट्राच्या व अखिल जगाच्या – जे जे लहानमोठे व्यवहार घडतात, त्यांच्यावर प्रकाश पाडणार्‍या मिळतील त्या सर्व साधनांचा संग्रह करण्याची तयारी व दक्षता संशोधकाला असली पाहिजे.’

साधनसंग्रह करणार्‍या संशोधकाला अनुभवायला मिळेल, अशा एका चमत्काराची पूर्वकल्पना देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘इतिहासाच्या एखाद्या शाखेची किंवा प्रसंगाची साधने मिळवण्याच्या इच्छेने विवक्षित स्थळी जावे, तर तेथे इष्ट साधने मिळोत न मिळोत, निराळीच एखाद्या काळाची साधने उपलब्ध होतात. पेशवाईच्या इतिहासाची साधने मिळवावयाला जावे आणि शिवप्रभूंच्या इतिहासाची साधने उपलब्ध होतात किंवा व्यापाराच्या इतिहासाची साधने हुडकण्याच्या बुद्धीने जावे आणि चालुक्यांचा किंवा सीरियन यहुदी लोकांचा ताम्रपट सापडावा, असा चमत्कार होतो. अशा आकस्मिक उपलब्धीकडे संशोधकाने दुर्लक्ष करू नये. ऐतिहासिक कागद पाहताना संस्कृत वा मराठी पोथ्या असल्यास त्यांचा संग्रह मुद्दाम करावा. बाडे तर बिलकुल वगळू नयेत. एखाद्या बाडात हजार, पाचपाचशे वर्षांच्या जुन्या पोथ्यांचे प्राकृत भाषांचे उतारे असतात किंवा इतिहासप्रसंगांच्या मित्या दिलेल्या असतात किंवा पुरातन गुरुशिष्यपरंपरा लिहिलेल्या असतात. तेव्हा शोधस्थळी व्यापकष्टीदृप्रमाणेच ही सूक्ष्मदृष्टिहि ठेवणे अवश्य आहे.’

संशोधकाने पुढे काय करावे, याचे मार्गदर्शनही राजवाड्यांनी केले. त्यांनी लिहिले, ‘संशोधकाने उपलब्ध साधनांच्या प्रामाण्याप्रामाण्यासंबंधाने चौकशी करावी. त्यासाठी त्याला इतिहासपद्धतीची चांगली ओळख असली पाहिजे. जशा इतर शास्त्रांना व कलांना पद्धती आहेत, तशीच इतिहासशास्त्रालाही पद्धति आहे. प्रमाण काय, अप्रमाण काय, अव्वल प्रमाण कोणते, दुय्यम वा तिय्यम प्रमाण कोणते, याची संशोधकाला माहिती असली पाहिजे. ती माहिती पद्धतिग्रंथांचे अवलोकन केल्याने सहज होईल. इतिहास साधनांच्या प्रामाण्याप्रामाण्यासंबंधाने पद्धतिग्रंथ इंग्रजी भाषेत जवळजवळ नाहीच. सशास्त्र व पद्धतशीर संशोधनाच्या कामी फ्रेंच, जर्मन व अमेरिकन लोक इंग्रजांच्या बरेच पुढे गेलेेले आहेत. त्यातल्या त्यात जर्मन लोक सूक्ष्मदृष्टि असून व्यापक शोध करणारे आहेत; अमेरिकन लोक शास्त्रांचे गूढ अवडंबर न माजवता सर्वसामान्यांना कळेल अशा विस्ताराने लिहिणारे आहेत आणि फ्रेंच लोक आटोपशीर व नीटनेटकी मांडणी करणारे आहेत.’ ही तौलनिक माहिती देऊन राजवाड्यांनी आपला व्यासंग किती व्यापक व सखोल आहे, हे तर दाखवलेच; पण लगेच या बाबतीत महाराष्ट्रीय संशोधकांना उपयोगी पडेल, अशा फ्रेंच भाषेतील एका ग्रंथाचा ‘इण्ट्रोडक्शन टु द स्टडी ऑफ हिस्टरी’ या नावाने इंग्रजी अनुवादही उपलब्ध असल्याची माहितीसुद्धा पुरवली.