‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातील राजवाडे यांच्या काही निष्कर्षांच्या डॉ. मेहेंदळे यांनी २००८ साली केलेल्या खंडनाचे मोजके नमुने पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा या पुस्तकातील पुढील तीन प्रकरणांचा थोडक्यात परिचय करून घेऊ या. दुसरे प्रकरण होते ‘्त्रिरयांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था’ या शीर्षकाचे. त्या प्रकरणातही प्रारंभी त्यांनी ‘प्राचीन काळी नातेसंबंधच निर्माण झाले नसल्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये अनिर्बंध पद्धतीने समागम केला जात असे’, हा मुद्दा मांडला आणि नंतरच्या काळात समाजाच्या नीतिविषयक कल्पना उत्क्रांत होत जाताना जुन्या कथांमधील गर्हणीय वाटू लागलेल्या घटनाप्रसंगांबाबत मखलाशी केली जाऊ लागली, असे मत मांडले. त्यांनी लिहिले, ‘प्रसिद्ध असे कुंतीचे उदाहरण घेऊ. कुंतीने तीन परपुरुषांपासून म्हणजे स्वत:च्या पतीव्यतिरिक्त अन्य पुरुषांपासून संतती प्राप्त करून घेतली, ही मूळ हकीकत. …व्यासकालीन म्हणजे शकपूर्व चारपाचशे वर्षांपलीकडे झालेल्या महाभारतकालीन नीतीला किंचित गौणत्व व कमीपणा आणणारी भासल्यामुळे व्यासांनी एवढीच दैवी व अद्भुत मखलाशी केली की, कुंतीशी ज्या परपुरुषांनी समागम केला, ते पुरुष… इंद्र, यम, वरुण यांच्यासारखे मोठेमोठे देव होते. ही मखलाशी महाभारतकार व्यासांनीच केली असेल, असेही म्हणवत नाही. पिढ्यानुपिढ्या दंतकथा सांगणार्यांनीदेखील उघड अश्लीलत्वावर झाकण घालण्याच्या सद्बुद्धीने ही मखलाशी केली असण्याचा पूर्ण संभव आहे…’
कुंतीचे हे उदाहरण अपुरे वाटल्यामुळे राजवाडे यांनी पाठोपाठ ख्रिस्तमाता मेरीचेही उदाहरण देऊ केले. त्यांनी लिहिले, ‘पितरांची व त्याबरोबरच आपलीही निंदा केल्याबद्दलची खंत मनुष्यमात्राच्या नीतिमत्तेला वाटलेली सर्वत्र आढळते. याचे अत्यंत ठळक सेमेटिक उदाहरण म्हणजे ख्रिस्ताचे. ह्याची आई जी मेरी तिला साक्षात होली घोस्टकरवी गर्भदान झाले, अशी दंतकथा आहे. मर्त्य पुरुषाच्या समागमाव्यतिरिक्त मर्त्य स्त्रीला प्रजा होणे असंभाव्य आहे, या दृष्टीने पाहता कुमारी मेरी हिला कोण्यातरी पुरुषापासून ख्रिस्त झाला असला पाहिजे. परंतु असले बिगरलग्न प्रजोत्पादन त्याकाळी यहुदी लोकांत नीतिबाह्य दिसत असल्यामुळे दैवी गर्भाधानाची मखलाशी निर्माण करणे आवश्यक झालेले उघड दिसत आहे. पुरुषाशिवाय गर्भधारणेवर (इमॅक्युलेट कन्सेप्शन) कितीतरी पांडित्य ख्रिस्ती पंडितांनी केेलेले जे आढळते, त्यातील बीज इतकेच की, साधुवर्य ख्रिस्ताचा जन्म अधर्म्य व नीतिबाह्य नाही, हे कसेतरी श्रोत्यांना पटवून द्यावे. पुरुषाशिवाय गर्भधारणावाल्या युरोपियनांची जी दुर्दशा, तीच महाभारतकार व्यासांचीही दुर्दशा आहे’
बदलत्या नीतिकल्पनांमुळे कराव्या लागलेल्या मखलाशीचे हे स्पष्टीकरण देऊन झाल्यावर राजवाड्यांनी ‘समाजशास्त्रात प्रजापतिसंस्था कशाला म्हणतात, हे सांगणे आवश्यक आहे’, असे म्हटले आणि तो खुलासा करीत लिहिले, ‘अनियंत्रित स्त्री-पुरुष समागमकाली नाती अस्तित्वात नव्हती. अमुक अपत्य अमुक पुरुषाचे, असे नक्की म्हणण्याची सोय नव्हती. फक्त अमुक मूल अमुक स्त्रीचे इतकेच म्हणता येण्याची शक्यता होती. तीही शक्यता त्याकाळी तत्कालीन अनियंत्रित समाजाने मर्यादित करून ठेवली होती. जेवढ्या म्हणून ्त्रिरया एखाद्या जमावात किंवा कळपात असत, त्या तेवढ्या सर्व ्त्रिरया कळपात जन्मलेल्या सर्व बालकांच्या माता समजण्याची रूढी असे. कार्तिकेय हा सहा किंवा सात आयांचा मुलगा म्हणून वर्णिलेला आहे व प्रत्येक आईने त्याला एकेक अवयव दिला, असे सांगितले आहे. द्वैमातुर, षाण्मातुर, साप्तमातुर वगैरे शब्द व अर्थ ह्या प्राचीन समजुतीचे दर्शक आहेत… मुलांची नावे त्या त्या कळपाच्या नावावरून पडत. त्यांना यूथनामे म्हणत. मूल कोठले असे विचारल्यास ते अमुक अमुक कळपातले, असे सांगण्याचा रिवाज असे. कळपातील सर्व मुलांना यूथनाम एकच असे. एक मूल दुसर्या मुलापासून निवडून
काढण्याला हे यूथनाम उपयोगी पडत नसे. दुसरे एक नाव मुलाचे अन्यव्यक्तिव्यावर्तक (वेगळेपण दर्शवणारे) ठेवीत, ते बापाच्या म्हणजे पुरुषाच्या नावावरून ठेवीत नसत, आईवरून मुलाला नाव मिळे.’ स्त्री या रीतीने केंद्रस्थानी होती, हे राजवाड्यांनी सांगितले.
– आनंद हर्डीकर
