एकेका कागदपत्रासाठी गावखेडी पालथी घालणार्या राजवाड्यांना केवळ कागदपत्रांच्या आधारे इतिहासाचा वेध घेण्यातील मर्यादा माहीत होत्या. ‘विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची इतिहासपूर्व व इतिहासोत्तर उत्क्रांती’ या त्यांच्या दीर्घ निबंधात त्यांनी त्यांचे म्हणणे विशद केले आहे.
हा निबंध मनुष्य आपले विचार अथवा आपल्या इच्छा कळवण्यासाठी हावभावासारख्या ज्या सध्या गोष्टी करतो त्या पासून सुरू होतो आणि तिथपासून ‘देव’ कल्पनेच्या जन्मापर्यंत पोहोचतो. राजवाडे आपला हात धरून ओढ्यातून प्रवास घडवत पुढे आपल्याला विशाल सागराच्या मुखापर्यंत आणून सोडतात.
ध्वनीपासून भाषा, रेखाचित्रांपासून चित्रलिपी आणि अक्षरे, नैसर्गिक हावभावापासून कृत्रिम अभिनय आणि निसर्गात पाहिलेल्या आकारापासून पासून बनवलेली भांडी या चार कृत्रिम कला माणसाने आपल्या अकलेने संपादित केल्या आणि त्यांच्या मते मनुष्याचा सारा इतिहास याच साधनांच्या प्रगतीचा इतिहास आहे. यादृष्टीने, शके १८४० (इसवी सन १९१८-१९) मध्ये – म्हणजे डार्विनचा सिद्धान्त प्रसृत झाल्यानंतर अवघ्या सहा दशकांत लिहिला गेलेल्या या निबंधाच्या शीर्षकातला ‘उत्क्रांती’ हा शब्द लक्षणीय ठरतो. मानवी इतिहासाच्या अभ्यासाचा भाग म्हणून राजवाडे विकारविचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती कशी झाली, याबद्दल काही ठोस अनुमाने मांडत आहेत. वर्गीकरण आणि कालमाननिश्चिती या डार्विनच्या सिद्धान्तातही आढळणार्या पद्धतींशी राजवाडे यांच्या या निबंधातील पद्धतीचे साधर्म्य आहे, हा निव्वळ योगायोग नसल्याचे शीर्षकातून प्रतीत व्हावे. मानवाने या कला ‘आपल्या अकलेने संपादित केल्या’चे सांगून राजवाडे थांबत नाहीत. ते म्हणतात, ‘‘शेकडो टक्केटोपणे (= टक्केटोणपे) खाऊन व हजारो वर्षांच्या प्रयोगात फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परमकष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणार्या देवासुरांनी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला किंवा विश्वकम्यानि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत. या भाकडकथांचा अर्थ इतकाच आहे की, भाषा, अक्षरमालिका. अभिनय व भांडी निर्माण करण्याची परंपरा काय आहे याचा ऐतिहासिक उलगडा करण्याचे ज्ञान पर्वापर्वापर्यंत भारतीय मनुष्यात नव्हते. ज्या बाबींचा उगम, घटना, वृद्धी व परिणती कळत नव्हत्या त्या बाबी कोण्यातरी दैवी शक्तीच्या प्रसादाने प्राप्त झाल्या, असा अर्थ अज्ञ मनुष्य सदैव व सर्वत्र लावीत आलेला दृष्टीस पडतो. हे सर्व आपलेच स्वत:चे कर्तृत्व आहे, हा शोध मनुष्याला परम कष्टाने लागलेला आहे. आता शंकराच्या डमरूचे किंवा देवाच्या विश्वकम्र्याचे किंवा वागधिष्ठाच्या सरस्वतीचे किंवा पशुपक्ष्यांचे नामकरण करणार्या नोहाचे दैवी अर्थाने काहीएक प्रयोजन उरलेले नाही.’’ हे सांगण्यामागे राजवाडे यांचा हेतू मूर्तिभंजनाचा अथवा नास्तिकतावादाचा फैलाव करण्याचा नव्हता, याची निश्चित खात्री पुढल्याच ‘‘ऐतिहासिकदृष्टीने यांच्यातूनही इतिहास निघण्यासारखा आहे’’ या वाक्यातून मिळते. इथे राजवाडे देव आदी कल्पना मानवसमाजात कधी रुळल्या आणि मान्य झाल्या, यालाही इतिहासाच्या कक्षेत आणू पाहातात. संतांच्या गाथा, आरत्या आदींना राजवाडे ‘इतिहासाची साधने’ का मानत होते, याचा उलगडाही इथे व्हावा. हा परिच्छेद ‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केलेल्या संक्षिप्त ‘राजवाडे लेखसंग्रहा’त नाही, परंतु मूळ तर्जुम्यात (खंड ३, पृ. ३०) आहे.
राजवाड्यांच्या वेळी फोटोग्राफी वापरात येऊन बराच काळ झाला होता. त्याला त्यांनी प्रकाश लेखनकला असे म्हटले आहे. त्याचा मागोवा घेताना ते लिहितात मूळ मनुष्याधीन साधन म्हणजे रेखन होय. त्याचे नंतर अक्षर झाले. पुढे त्याचे चित्रात रूपांतर झाले. मग चित्र आणि अक्षर दोन्ही असणार्यां चित्रमय ग्रंथात झाले. पुढे त्याची प्रगती प्रकाशलेखन म्हणजे फोटोग्राफीत झाली. ध्वनीमध्ये ग्रामोफोन, चित्रणात फोटोग्राफी आणि सिनेमा ही जुन्या साधनांची अद्ययावत् रूपांतरे आहेत जी (तत्कालीन) महाराष्ट्रात नाहीत. उरलेली स्थापत्त्य, नाट्य, काव्य इत्यादी साधनांनी महाराष्ट्र संपन्न आहे, त्यांना वाटले की त्याचे इंटरप्रिटेशन होणे आवश्यक आहे. याच निबंधात, उत्तरार्धात त्यांनी ते काही प्रमाणात केलेही आहे.
kravindrar@gmail.com
