‘दामाजीपंत आणि विठ्या महाराची पारंपरिक ऐकीव कथा ही निव्वळ कविकल्पना नाही,’ हे जसे राजवाड्यांनी त्यांना सापडलेल्या एका निवाडापत्राच्या नकलेच्या आधारे दाखवून दिले, तसेच त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला पूजनीय वाटणार्या शिवाजी महाराजांबद्दल अनेक देशीविदेशी इतिहासकारांनी निव्वळ अफवांवर विसंबून केलेल्या लेखनावर कडाडून टीकासुद्धा केली. अशाच मोजक्या टीकालेखांचा आता अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ.
राजवाडे यांनी लिहिलेला ‘शिवाजीचा जन्म, जन्मस्थान व वंशावळ ह्यसंबंधी कित्येक इंग्रजी व पोर्तुगीज लेखकांचे निरर्गल प्रलाप’ या लांबलचक शीर्षकाचा नऊ पानी छापील लेख अनेक कारणांमुळे दखलपात्र ठरला. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या मुंबई शाखेने आपल्या ग्रंथमालेच्या १९०० सालच्या एका जादा अंकात डॉ. गर्सन डिकुन्हा यांचे ‘मुंबईची मूळ पीठिका’ सांगणारे ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ या शीर्षकाचे लेखन प्रसिद्ध केले होते. त्यात चार पानांवर छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचा मजकूर होता, तो राजवाड्यांनी जसाच्या तसा उद्धृत केला आणि त्यातील अत्यंत प्रक्षोभक विधानांचा एकेक करून समाचार घेतला.
राजवाडे लिहितात : ‘पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मा ड गार्डा ह्यने इ.स. १७३० मध्ये शिवचरित्र लिहिले, त्यात तो म्हणतो, ‘वसईजवळचे विरार खेडे शिवाजीचे मूळ गाव होय… … शहाजीच्या बारा मुलांपैकी शेवटला शिवाजी होता, हे मात्र खरे आहे. त्यावेळी तो म्हातारा झाला होता व तंजावरास राज्य करीत होता.’’ (समग्र राजवाडे साहित्याच्या ज्या अकराव्या खंडात हा संपूर्ण लेख समाविष्ट आहे, त्याचे संपादक डॉ.अ.रा.कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्तावनेत दिलेल्या माहितीनुसार त्या पोर्तुगीज इतिहासकाराने ते चरित्र १६९५ च्या सुमारास लिहिले, पण ते त्याच्या हयातीत प्रसिद्ध न होता १७३० साली झाले.) या उतार्यावर टीका करताना राजवाडे म्हणतात : ‘यांतील कोणते विधान निराधार नाही, हेच सांगणे मुष्किलीचे आहे. (१) शहाजीला बारा मुलगे होते; (२) शिवाजीच्या जन्मकाली शहाजी तंजावरास राज्य करीत होता व (३) त्यावेळी तो म्हातारा होता. ह्य तिन्ही विधानांपैकी एकही विधान खरे नाही. शिवाजीच्या जन्मकाली म्हणजे शके १५४९ मध्ये शहाजी ऐन चाळिशीच्या भरात होता, हे प्रसिद्ध आहे. त्या वेळी तो मुळी कर्नाटकात गेलाच नव्हता, मग तंजावरास तो राज्य करील कोठून? तसेच याला बारा मुलगे होते, हेही विधान अश्रुतपूर्वच आहे. सारांश, हा गार्डा अत्यंत अविश्वसनीय लेखक दिसतो.’
एवढाच शेरा मारून राजवाडे थांबले नाहीत, त्या पोर्तुगीज इतिहासकाराचे वाभाडे काढताना त्यांच्या संतप्त लेखणीने यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यांनी लिहिले, ‘हा अविश्वसनीय लेखक होता, इतकेच नव्हे तर त्याने हे चरित्र मराठ्यांना जो अत्यंत पूज्य पुरुष त्याची निंदा करण्याकरिता मुद्दाम लिहिले, असा भास होतो. ह्याच्या पूर्वजांना किंवा याचा ह्याचा आश्रयदाता एरिसेइराचा काउंटच्या पूर्वजांना शिवाजीकडून काही त्रास पोहोचला असेल, तो असो; तसे नसते तर ह्या चरित्रावर काउंटने एवढा असभ्य अभिप्राय दिलाच नसता. काउंट म्हणतो, ‘पोर्तुगालच्या राजाचा व ख्रिस्ती धर्माचा द्रोह करणारा मनुष्य आमच्या कुळातला नव्हता, असे मी आनंदाने म्हटले असते, पण खरे आहे ते बोलले पाहिजे. तो आमच्याच कुळातला होता. युद्धकला व धैर्यशौर्यादि गुण त्याच्या अंगी जे दिसले ते तो आमच्या कुळात जन्मल्यामुळेच दिसले. परकीय लोकांच्या संगतीत लहानपणापासून सर्व आयुष्य गेल्यामुळे तो देेवद्रोही व राजद्रोही बनला’. पोर्तुगीजांना दाती तृण धरावयाला लावून कोकणातून हुसकून देण्यास शिवाजी कारणीभूत झाला, असे एरिसेइराच्या काउंटच्या अभिप्रायावरून स्पष्ट दिसते.
त्यामुळे शिवाजीच्या चरित्रलेखनाचा बहाणा करून गार्डाने नामर्द मनुष्यांच्या सार्वत्रिक रीतीला अनुसरून शत्रूच्या गोटातील अतिपूज्य पुरुषांची गलिच्छ निंदा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने केलेली मन:कल्पित विधाने निखालस खोटी आहेत.’
– आनंद हर्डीकर
