राजवाड्यांनी या लेखमालेतील पहिला लेख ‘चित्रमय जगत’च्या अंकात आपले मित्र वासुकाका जोशी यांच्याकरवी प्रसिद्ध करवला होता, त्या वेळी त्या लेखनातील ‘धक्कादायक’ विधानांमुळे संतापून आपल्या समाजातील काही विद्वानांनी आक्रस्ताळी भूमिका घेतली होती आणि ‘मुद्रणालय जाळून टाकण्याची’ धमकी देऊन वासुकाकांना प्रकाशन बंद करायला भाग पाडले होते. परंतु कॉम्रेड डांगे यांनी नंतर त्या पहिल्या लेखाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला, त्या लेखाचा काही भाग अनुवादित करून ‘सोशॅलिस्ट’ या मासिकात छापलासुद्धा आणि एवढेच नव्हे तर त्या मासिकाच्या मलपृष्ठावर ‘Marriage in Ancient India by V. K. Rajwade, price four annas’ अशी जाहिरातदेखील छापली. त्यासोबत ‘राजवाडे यांच्या काही निष्कर्षांबाबत आपले महत्त्वाचे मतभेदही आहेत, तथापि तूर्त ते आम्ही राखून ठेवीत आहोत’, अशी त्रोटक टीपही त्यांनी छापली.
डांगे यांनी हे जे धाडसी पाऊल उललले होते, त्याची दखल मात्र विरोधकांकडून घेतली गेली नाही; वासुकाकांना जशी धमकी दिली गेली होती, तशी धमकी डांगे ह्यांना दिली गेली नाही. एवढेच नव्हे, तर पुढे राजवाडे ह्यांच्या निधनानंतर त्यांचेच अपुरे राहिलेले कार्य पुढे नेण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभा व राजवाडे संशोधन मंदिर यांच्या ‘संशोधक’ या नियतकालिकामधून लेखमाला प्रसिद्ध झाल्यावरही पूर्वीसारखा निषेधाचा हिंसक पवित्रा घेतला गेला नाही. हे सर्वार्थाने चांगलेच झाले. परंतु राजवाडे ह्यांच्या तोवरच्या इतर लेखनामधील महत्त्वाच्या दाव्यांबद्दल किंवा त्यांनी काढलेल्या निष्कर्षांबद्दल जशी उलटसुलट चर्चा पूर्वीपासून होत असे, तशी या लेखमालेबाबत मात्र घडून आली नाही. त्यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने डांगे यांनी पुस्तक-प्रकाशनाचा योग जुळवला, पण त्या वेळी इतरत्र विविध ठिकाणी आयोजित केेेल्या गेलेल्या समारंभांत किंवा चर्चासत्रांतही ‘त्या’ पुस्तकातील त्यांच्या निष्कर्षांचे रीतसर खंडन करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.
यंदाच्या त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षात मात्र राजवाड्यांच्या त्या पुस्तकातील प्रतिपादनाचे मुद्देनिहाय आणि साधार खंडन आपण विचारात घेऊ शकतो, ही आवर्जून दखल घ्यावी, अशी बाब आहे. राजवाड्यांच्या या लोकप्रिय पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकाशकांनी काढलेल्या आवृत्त्या आता वाचकांना सहजासहजी उपलब्ध आहेत, त्यांच्या मतांचे हे खंडन मात्र तुलनेने फारच मर्यादित अभ्यासकांपर्यंत पोहोचलेे आहे. ते खंडन म्हणजे महाभारताचे गाढे अभ्यासक व त्या महाग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादनकार्यात सहभागी झालेले एक तज्ज्ञ डॉ. म. अ. मेहेंदळे यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’तर्फे ३१ डिसेंबर २००८ रोजी राजवाड्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केलेले भाषण होय. त्या भाषणाच्या आधारे त्यांनी स्वत:च लिहिलेला प्रदीर्घ लेख मंडळाच्या त्यानंतरच्या त्रैमासिकाच्या अंकामध्ये छापण्यात आला, त्यामुळे सम्यक् बुद्धीने अभ्यास करू इच्छिणार्या जिज्ञासूंची चांगली सोय झाली. (त्रैमासिकाचे ८५व्या वर्षाचे १ ते ४ अंक : जुलै २००८ – एप्रिल २००९, शके १९३१)
खरे म्हणजे मेहेंदळे यांनीही राजवाडे यांचे पुस्तक पूर्ण वाचलेेले नव्हते. समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी संपादन करीत असलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकासाठी एका पुस्तकाचे त्यांना परीक्षण लिहावयाचे होते. पुस्तक होते – ‘रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष’ आणि लेखक होते धुळ्याचे डॉ. शरद पाटील. त्या पुस्तकात लेखकांनी राजवाड्यांच्या पुस्तकाचा काही ठिकाणी संदर्भ दिला होता. तेवढ्यापुरतेच राजवाड्यांचे पुस्तक वाचतानाही मेहेंदळे यांना मतभेदाचे अनेक मुद्दे आढळले. योगायोगाने भारत इतिहास संशोधक मंडळाने त्यांना राजवाडे पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानासाठी आमंत्रित केले आणि ‘आपल्या व्याख्यानात राजवाडे यांच्या लेखनाबाबतचे गंभीर मतभेद मोकळेपणाने मांडायलाही हरकत नाही’, असे सांगितले. मग त्यांनी तसे खंडनात्मक व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाचा सारांश पुढील लेखांकांत…
