ऐतिहासिक साधनांच्या आठव्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये राजवाड्यांनी मराठी भाषेच्या विविध कालखंडांमध्ये होत गेलेल्या स्वरूपपरिवर्तनाबद्दल विस्ताराने लिहिले होते. त्यानिमित्ताने त्यांनी इतिहासातील छोट्यामोठ्या घटनांचे उभेआडवे छेद घेऊन केलेेले विवेचन त्यांचा बहुविद्याशाखीय व्यासंग दर्शवणारे होते, तसेच त्यांच्या सर्वसंचारी प्रतिभेचाही आविष्कार घडवणारे होते.
इ.स. १३१८ मध्ये देवगिरी कायमची अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात गेली आणि तेव्हापासून मुसलमानांचे राज्य महाराष्ट्रात सुरू झाले. त्या घटनेचा संबंध राजवाड्यांनी तत्कालीन महाराष्ट्रीय समाजाच्या विशिष्ट प्रवृत्तीशी कसा जोडला आणि त्यासाठी तेराव्या शतकातल्या एका प्रसिद्ध ग्रंथाचा कसा आधार घेतला, हे पाहण्यासारखे ठरते. त्या नमुनेदार परिच्छेदात त्यांनी लिहिले, ‘यादवांच्या आमदानीत म्हणजे इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचे सर्व लक्ष परमार्थाच्या नावावर ऐहिक उपभोग घेण्याकडे लागले होते. त्या शतकातील अत्यंत मोठा असा मानिलेला ग्रंथ म्हटला म्हणजे हेमाद्रीचा ‘चतुर्वर्गचिंतामणि’ हा होय… या ग्रंथात दर दिवसाला व दर तिथीला दहा दहा पाच पाच व्रते सांगितली आहेत व त्या त्या व्रताला कोणत्या देवाची कोणते पक्वान्न करून व किती ब्राह्मण घालून प्रीति संपादन करावी, याचा स्मृति, श्रुति व पुराणे यांतून उतारे देऊन गंभीरपणे निर्णय केला आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडावरून पाहता वर्षाच्या ३६५ दिवसांची एकंदर २००० व्रते व्हावीत, असा अंदाज बांधता येतो. लोकांची व्रते करण्याकडे, ब्राह्मणभोजने घालण्याकडे, पक्वान्ने खाण्याकडे व त्याद्वारे मोक्ष मिळतो, अशा मतांकडे अतोनात प्रवृत्ति असल्याविना हेमाद्रीने ही व्रते केवळ पांडित्य दाखवण्याकरिता किंवा करमणूक करण्याकरिता सांगितली असतील, हे संभवत नाही. तेव्हा व्रते करणे व पक्वान्ने खाणे या दोन गोष्टी लोकांच्या आंगवळणी त्याकाळी फार पडल्या होत्या, हे निश्चित आहे. पक्वान्न आणि व्रत ह्यांची फारकत हेमाद्रीने एकाही ठिकाणी केलेली नाही. एवढी दोन हजार व्रते ज्या ग्रंथात सांगितली आहेत असा पृथ्वीवरील दुसर्या कोणत्याहि भाषेत कोणत्याहि काळी एकहि ग्रंथ अद्यापपर्यंत निर्माण झालेला नाही!’
‘चतुर्वर्गचिंतामणी’चा असा शेलक्या शब्दांत परिचय करून दिल्यानंतर राजवाड्यांनी दोन अनुमाने मांडली. त्यांनी म्हटले, ‘व्रते करण्याकडे ज्याअर्थी महाराष्ट्रातील लोकांची तेराव्या शतकात एवढी बेसुमार प्रवृत्ती वाढली होती, त्याअर्थी त्यापासून दोनच अनुमाने स्थूल मानाने करणे रास्त आहे. एक – लोकांजवळ पैसा अतोनात झाला होता व दुसरे, व्रतांप्रीत्यर्थ खर्च करण्यास लोकांजवळ मुबलक वेळ होता. ह्या दुसर्या अनुमानाचा अर्थ असा होतो की, राष्ट्रातील सुखवस्तू लोकांना व त्यांचे लहान प्रमाणावर अनुकरण करणार्यांना कष्टप्रचुर असे मर्दुमकीचे, मेहनतीचे, यातायातीचे, लष्करी व इतर धंदे करण्यास फुरसत नव्हती. अशी वस्तुस्थिती असल्यावर, म्हणजे परशत्रूपासून व अंत:शत्रूंपासून संरक्षण होण्यास कराव्या लागणार्या मेहनतीपासून लोक परावृत्त झाल्यावर आणि व्रतैकदृष्टि किंवा सुखैकदृष्टि लोकांच्या हाती मुबलक पैसा असल्यावर त्यांच्याकडे बुुभुक्षु, मेहनती, साहसी व निर्धन अशा लोकांचे लक्ष जावे, ह्यंत अजब असे काहीच नाही.’
‘चतुर्वर्गचिंतामणी’च्या लोकप्रियतेचा आपण उलगडून दाखवलेला हा अर्थ वस्तुस्थितीला धरून नाही, असा आक्षेप उदभवू शकेल, हे गृहीत धरून त्याचे निराकरण म्हणून त्यांनी पुढे लिहिले, ‘ही जर वस्तुस्थिती नसती, तर संस्कृतीने कोणत्याहि प्रकारे श्रेष्ठ नसणार्या मुसुलमानांना त्यावेळी मराठ्यांना जिंकताच आले नसते. मराठे जातीचे शूर नव्हते, अशीही स्थिती नव्हती. मराठ्यांच्याकडून माळव्यापासून रामेश्वरापर्यंतचे प्रांत इ.स. १२४०च्या सुमारास सिंघणाने जिंकवले. सतराव्या शतकात जसा शिवाजी, तसा तेराव्या शतकात हा सिंघण झाला. सिंघणाला मरून ५० वर्षे झाली नाहीत तो मुसुलमानांच्याकडून मराठ्यांचा पराजय होतो… अर्थात हा असा चमत्कार होण्यास मराठ्यांच्या शीलात व चालीरीतींत विलक्षण फरक पडला असला पाहिजे. हा फरक कोणता, ते हेमाद्रीच्या व्रतखंडावरून स्पष्ट ओळखता येते. सुखैकपरायणता व विलासमग्नता हीच मराठ्यांच्या नाशाची तेराव्या शतकातली कारणे होती.’
– आनंद हर्डीकर
