‘राजवाड्यांच्या लेखनात कुठेही मला मार्क्सचा उल्लेख आढळला नाही. रामदासाची चर्चा करताना त्यांनी हेगेलचा उल्लेख केला आहे व आणखी एका ठिकाणी सोशॅलिस्टिक हा शब्द वापरला आहे एवढेच… शिवाय त्यांचे जे इतिहासशास्त्र आहे ते स्थल, काल व व्यक्ती या तीन घटकांवर आधारलेले आहे. हे घटक मार्क्सवाद अपुरे समजतो’, अशी काहीशी भिन्न भूमिका असूनही कॉम्रेड डांगे यांनी मोठ्या अपेक्षेने राजवाडे यांचे ते लेख क्रमाक्रमाने छापावयाची तयारी दाखवली आणि दुसर्या बाजूने राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली. त्याबद्दलची माहिती देताना डांगे यांनी प्रस्तावनेत पुढे लिहिले, ‘मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४मध्ये (कानपूर खटल्यात) पकडला गेलो व माझ्या सहकार्यांकडून राजवाड्यांना त्या प्रकरणाची छापील प्रत न मिळाल्यामुळे त्यांनी मग पुढचा भाग लिहिण्याचे सोडून दिले… पुढे मी १९२७साली तुरुंगातून सुटून आलो, तोपर्यंत ते दिवंगत झाले होते.’ साहजिकच पुस्तक तसेच अर्धवट राहिले.
अधिक खुलासा करताना डांगे यांनी लिहिले, ‘चौथ्या प्रकरणाची राजवाड्यांची हस्तलिखित प्रत तशीच पडून राहिली व पुढच्या दंगलीत सगळेच गहाळ झाले. पण राजवाडे आपल्या लिखाणाची एक प्रत स्वत:कडे ठेवीत असत. शिवाय मी पाठवलेले छापील फॉर्म होतेच. ती प्रत पुढे धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभा व राजवाडे संशोधन मंदिर यांच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्या सर्वांना धन्यवाद द्यावयास पाहिजेत. (राजवाडे यांचे निकटवर्ती मित्र) श्री. भास्कर वामन भट यांनी मी कैदेत असताना राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर पत्राने चौकशी केली होती की, त्यांना जी चार प्रकरणांची हस्तलिखिते राजवाड्यांच्या दप्तरात मिळाली त्यापेक्षा आणखी हस्तलिखिते माझ्याकडे पाठविली होती का व ती आहेत का? अर्थात मी नकारार्थी उत्तर दिले.’ अशी आहे ही या अर्ध्यामुर्ध्या पुस्तकाची कथा.
आता राजवाडे यांच्या त्या पुस्तकातील मजकुराचा परिचय करून घेण्यापूर्वी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा ऊहापोह थोडक्यात करणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे डांगे यांचा झालेला अपेक्षाभंग. आपल्या अपेक्षेचे स्वरूप स्पष्ट करताना डांगे यांनी लिहिले होते, ‘स्थळ, काल व व्यक्ती यांच्या अन्योन्यसंबंधांच्या मुळाशी जीवनपोषणार्थ लागणारी अवजारे, हत्यारे व तज्जन्य उत्पादन, वितरण, संभोजन, वर्गसंबंध व जातीसंबंध, तसेच राज्ययंत्रही आहे. आदिकाळापासून तो कम्युनिस्ट समाजरचनाकाळापर्यंत यांची उत्क्रांती-क्रांतीची एक द्वंद्वात्मक गती आहे. तिची फोड मार्क्स व एंगल्स यांनी केली आहे; पण ही शास्त्रपद्धती हिंदुस्थानातल्या हिंदुसमाजाला लागू शकत नाही, असा कम्युनिस्टशास्त्रविरोधकांचा दावा आहे. या दाव्याला व विरोधाला वेदबद्ध, शास्त्रशुद्ध व इतिहासदत्त घटना इत्यादीतून पुरावा देण्याचे काम मी पहिल्यापासून पत्करले होते. त्या कामाला अत्यंत परिपोषक असा हा ग्रंथ आहे, हे मी पहिल्याच लेखावरून ओळखले…’
आणि आपल्या साहसी प्रयत्वाचा अखेरीस कोणता परिणाम अपेक्षित होता, हे सांगताना डांगे यांनी लिहिले, ‘राजवाडे यांच्या चौथ्या प्रकरणाच्या भागात ते स्त्री-पुरुषांच्या सांघिक अशा लैंगिक समागमातून एकपतिपत्नीक पद्धतीचा मोनोगामीचा ऐतिहासिक विकास कसा दाखवतात, याची मला नितान्त उत्सुकता होती; कारण त्या घटनेचा खाजगी मालमत्तेच्या व राज्ययंत्राच्या उदयाशी निकट संबंध आहे. तो अत्यंत महत्त्वाचा तसाच गुंतागुंतीचा प्रश्न चौथ्या किंवा पाचव्या प्रकरणानंतर येणे अपरिहार्य होते. त्याचवेळी मी त्यांना एंगल्सच्या पुस्तकाची प्रत देणार होतो. ते जर मी करू शकलो असतो, तर माझी खात्री आहे की, राजवाडे यांनी आमचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत मान्य केला असता. याचे कारण असे की त्यांच्या विवेचनात हिंदू धर्मभावनेला धर्म या नात्याने कुठेच स्थान नव्हते…’ परंतु डांगे यांची ही रास्त अपेक्षा फलद्रूप होऊ शकली नाही, कारण राजवाडे निधन पावले होते.
