‘शिवरायांच्या साक्षरतेबद्दल शंका घेण्याचे धारिष्ट्य यापुढे कुणीही करणार नाही’, असा विश्वास राजवाड्यांनी आपल्या साधार लेखाच्या शेवटी व्यक्त केला होता खरा; पण पुढे काही वर्षांनी त्यांच्या त्या विश्वासाला तडा गेलाच. सुप्रसिद्ध बंगाली इतिहासकार प्रा. यदुनाथ सरकार यांनी ‘मॉडर्न रिव्ह्यू’ नामक मासिकात आधी लेखमालेच्या स्वरूपात शिवाजी महाराजांचे चरित्र छापले आणि नंतर तेच लेख संकलित करून पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी ‘शिवाजी महाराज निरक्षर होते’, असे विधान केले. त्याचा राजवाड्यांना राग येणे स्वाभाविक होते. त्या आक्षेपार्ह विधानाबद्दल सरकारांना धारेवर धरत त्यांनी लिहिले, ‘शिवाजी महाराजांच्या साक्षरतेबद्दल महाराष्ट्रातील कोणाही इसमास आता शंका राहिली नसून महाराष्ट्रापुरता तरी या मुद्द्याचा कायमचा निकाल झालेला आहे. महाराजांच्या साक्षरतेची सिद्धि ज्या कारणांच्या आधारे स्थापण्यात आली, ती कारणे यदुनाथास मान्य नसल्यास त्यांनी ती खोडून काढावयास पाहिजे होती. परंतु तसे न करता युरोपियन ग्रंथकारांच्या निराधार विधानास चिकटून बसण्यात प्रोफेसरांस अद्याप इतकी गोडी का वाटावी, हेे गूढ उकलणे कठीण आहे.’
सरकारांवरील टीका एवढ्यावरच मर्यादित राहणे शक्यच नव्हते. कारणही तसेच होते. ते स्पष्ट करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘याहिपेक्षा चमत्कारिक असे प्रोफेसरांनी दुसरे एक विधान केले आहे. ‘ ऌी ’ीं१ल्ल३ ल्लः३ँ्रल्लॠ ऋ१ःे ुःः‘२’, शिवाजी महाराजांस ग्रंथद्वारे काहीएक ज्ञान झाले नाही, असा प्रोफेसरांच्या म्हणण्याचा आशय आहे. महाभारत व रामायण या दोन जगद्विख्यात ग्रंथांचा शिवाजी महाराजांचा दांडगा व्यासंग होता, हे आबालवृद्ध महाराष्ट्रीयांस माहीत आहे. महाभारतातील धौम्य, शुक, विदुर इत्यादिकांनी उपदेशिलेल्या नीतितत्त्वांशी शिवाजी महाराजांचा पूर्ण परिचय होता. स्मृतिशास्त्रज्ञ असणार्या ज्या दादाजी कोंडदेवावर बालशिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी होती, त्याने स्मृतिग्रंथांचे ज्ञान शिवाजीस करून दिले नाही व जे व्यवहारनिर्णयाचे ज्ञान महाराजांस असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे ते ज्ञान त्यास ग्रंथपरिचयाखेरीजच प्राप्त झाले, असे विधान करणारा कोणी असेल, तर त्याला वेडगळच म्हणावे लागेल. प्रोफेसर सरकारांचे ते विधान निव्वळ हास्यास्पद आहे, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.’
राजवाड्यांनी ‘इतिहास आणि ऐतिहासिक’ या धुळ्याहून प्रकाशित होणार्या नियतकालिकाच्या अंकामधून प्रोफेसर सरकार यांच्याप्रमाणेच आणखी एका लब्धप्रतिष्ठित इंग्रज इतिहासकारावरही जबरदस्त हल्ला चढवला होता. त्याचे नाव होते व्हिन्सेंट स्मिथ आणि हल्ल्याचे कारण ठरला, ‘ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया’नामक ग्रंथात त्याने लावलेला ‘अजब शोध’! ‘मराठी राज्याचे संस्थापक श्रीशिवाजी महाराज व त्यांचे पश्चातचे मराठी राज्याचे आधारस्तंभ व चालक हे सर्व धंदेवाईक चोरांच्या टोळीपैकी असून त्यांनी कोणत्याहि प्रकारचे हिंदुस्थानचे हित केले नाही, अशा प्रकारचा नवीन अजब शोध स्मिथनी या ग्रंथाद्वारे जाहीर केला आहे. अस्सल पुराव्यांच्या आधारे ग्रंथरचना केल्याबद्दल आणि असत्य विधानांपासून ग्रंथ अलिप्त ठेवण्याची शक्य तितकी खबरदारी घेतल्याबद्दल स्मिथने ग्रंथाचे प्रस्तावनेत प्रतिज्ञा केली आहे आणि तशी प्रतिज्ञा करूनही असे बालिश व सपशेल खोटे विधान करणार्या या जागतिक विद्वान संशोधकास दीडशहाण्यांच्या कोटीत घालावे की मराठ्यांच्या इतिहाससाधनांबद्दलच्या त्यांच्या गाढ्या अज्ञानाबद्दल त्यांची कीव करावी, असा नाजुक प्रश्न उपस्थित होतो…’ असे सांगून संतप्त राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘महाराष्ट्र ही मराठ्यांची मायभूमी आहे. ती परकीयांच्या ताब्यात होती. आपल्या मायभूमी महाराष्ट्राची मुक्तता करणारा व महाराष्ट्रधर्माची स्थापना करणारा पुण्यात्मा शिवाजी कोणत्या तर्कशास्त्राच्या आधारे चोर ठरतो, याची फोड स्मिथने आपल्या ग्रंथात केली असती, तर बरे झाले असते. त्याचा कोटिक्रम ग्राह्य धरला तर वुइल्यम टेल, ग्यारिबाल्डी, म्याझिनी, जॉर्ज वॉशिंग्टन व त्यांच्यासारख्या मायभूमीस स्वातंत्र्याने विभूषित करणार्या अनेक पुण्यश्लोक पुरुषांची चोरांच्या कोटीत गणना करावी लागेल. परंतु कोणत्याहि विद्वानाने तसे केल्याचे आढळत नाही. यावरून स्मिथचे खोटारडे विधान त्याचा मागासलेपणाच दर्शवते!’
