राजवाड्यांनी बरीच वणवण करून आणि तर्कबुद्धी कमालीची ताणून तगर शहराचे स्थान निश्चित झाले आहे, असे मानले खरे; तथापि पुढे त्यांचे ते म्हणणे टिकले नाही. प्रा.ग.ह.खरे यांनी ‘तेर येथील चार शिलालेख’ या आपल्या ११ पानी लेखात राजवाड्यांच्या तर्काचा यथोचित प्रतिवाद केला आणि आता मान्य झालेल्या सिद्धांताप्रमाणे तगर ऊर्फ तेर हे ठिकाण उस्मानाबाद ऊर्फ धाराशिव जिल्ह्यात आहे. राजवाड्यांचा अंतिम निष्कर्ष अधिक व्यापक व सखोल संशोधनानंतर जरी चुकीचा ठरला, तरी त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत त्यांनी दाखवलेली शोधक वृत्ती खचितच अनुकरणीय होती. त्यांच्या त्याच वृत्तीचा निदर्शक ठरलेल्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या आणखी एका लेखाकडे आज लक्ष वेधायचे आहे. ‘दामाजीपंत आणि विठ्या महार’ हा तो लेख.
सातारकर महाराजांच्या दफ्तराची छाननी करीत असताना राजवाड्यांच्या हाती योगायोगाने एका दस्तऐवजाच्या नकलेची नक्कल लागली. तो दस्तऐवज म्हणजे एक निवाडापत्र किंवा महजर होते, त्या महजरामध्ये महारांचे हक्क, महार-मांगांचे तंटे याबद्दलचा तपशीलवार उल्लेख होता. ‘पूर्वीच्या काळी गावगाड्यामध्ये महार हा एक वतनदार होता. गावच्या पाटील-कुलकर्णी इत्यादि वतनदारांप्रमाणे त्याला गावाच्या सामाजिक जीवनात विशिष्ट स्थान होते आणि त्याला काही हक्कसुद्धा बहाल करण्यात आले होते. त्याबद्दलचा तो महजर म्हणजे निवाडा अस्सल नव्हता, मूळ महजराचा सारांशरूप खर्डा होता. मूळ महजर बेदरची पातशाहत असताना झाला होता, तो खुद्द दामाजीपंत मंगळवेढकर यांच्या हातचा होता. मूळ सनद पैठणात देवाचे राऊळात झाली’, अशी माहिती सांगून राजवाड्यांनी म्हटले, ‘एकनाथस्वामींच्या मृत्यूनंतर पैठणास त्यांच्या देवालयात पुन्हा मूळ महजराची उजळणी झाली. त्या संस्करणाच्या नकलेची ही नकल आहे. अक्षर दीडशे वर्षांपलीकडचे नाही.’
त्या महजरातील हकीकतीचे सुसंगत कथन करीत राजवाड्यांनी मग दामाजीपंत व विठ्या महाराबद्दल लिहिले, ‘मंगळवेढ्यास दामाजीपंत कारभारी ऊर्फ कमावीसदार असताना विठ्या नावाचा महारही तेथे होता. देशात कडाक्याचा दुष्काळ पडला, तेव्हा दामाजीपंताने लोकांकडून धान्याची सरकारी कोठारे लुटविली. त्याकाळी वसूल धान्याच्या रूपाने घेत असत व धान्य विकून येईल तो पैका रसद म्हणून राजधानीस पाठवीत. कोठारे लुटविल्यानंतर रसदीचे पैसे राजधानीस पाठवण्यास दामाजीपंताजवळ नव्हते. तशातच चुगलखोरांनी कोठारे लुटवल्याची बातमी बेदरास पातशाहापर्यंत पोहोचवली. रसदीकरता पातशाहाचे धरणे दामाजीपंतावर येऊन बसले. द्रव्य कोठून आणावे, अशा विवंचनेत दामाजीपंत पडले. पंताच्या संकटाचा साक्षीदार मंगळवेढचा विठ्या महार होताच. त्याच्याजवळ बापजाद्यांनी पुरून ठेवलेले किंवा इतर कोणत्यातरी कारणाने जमा झालेले द्रव्य होते व ते कर्मधर्मसंयोगाने रसदीची फेड करण्याइतके होते. ते द्रव्य विठ्ठलरूपी परमेश्वराचा मंगळवेढच्या विठ्या नामक महाराच्या अंगात संचार होऊन दामाजीपंताकडील रसद म्हणून बेदरास सरकारात भरण्याची विठ्यास प्रेरणा झाली. तो मजल दरमजल बेदरास पोचला, त्याने पातशहाच्या कचेरीत दामाजीपंताकडील म्हणून रसदेचा भरणा केला, पावती घेतली व ती दामाजी पंतास आणून दिली अर्थात दामाजीपंताचे संकट वारले व धरणेही सुटले.’
लेखाचा समारोप करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘य:कश्चित कमावीसदाराने कोठारे लुटविणे, पातशहाकडील धरणे येऊन बसणे, महाराने गुपचूप जाऊन रसद भरणे वगैरे सर्व प्रकार वास्तविक घडला होता, तरीही आश्चर्योत्पादक होता. कवींनी लाघव करून या ऐतिहासिक हकीकतीला काव्यरूप दिले व भक्तवत्सल श्रीविठ्ठलाने महाराचे रूप घेऊन दामाजीची रसद भरली व त्याच क्षणी महाररूपी परमेश्वर पातशाहाच्या डोळ्यांदेखत गुप्त झाला वगैरे कविकल्पना रचल्या. परमेश्वर महाराच्या हृदयात शिरून एका दयार्द्र गृहस्थाचा बचाव झाला, ही खरी ऐतिहासिक हकीकत हा महजर सापडला नसता, तर कल्पनाकोटीतीलच असावी, असा जसा आजपर्यंत आपण तर्क करीत होतो, तसाच पुढेही करीत राहिलो असतो!’
