आज गणेशचतुर्थी आहे. यंदा तर गणेशोत्सव चक्क बारा दिवसांचा आहे. या उत्सवामध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मांडवांमध्येही मोठ्या श्रद्धापूर्वक पुजला जाणारा देव म्हणजेच श्रीगजानन. एरवीदेखील आपल्या आयुष्यात असंख्य वेळा ज्याचे शुभंकर म्हणून स्मरण केले जाते, त्या या देवाचा नेमका काळ कोणता, असा प्रश्न विचारला, तर मात्र बहुतेकजण बुचकळ्यात पडतील, निरुत्तर होतील. योग असा की, या प्रश्नाचा राजवाड्यांनी धांडोळा घेतला होता आणि त्याबद्दलचे त्यांचे स्फुट लेखनही समग्र राजवाडे साहित्याच्या तेराव्या खंडामध्ये (प्रस्तावना : डॉ. अशोक कामत, संपादक : डॉ. मु. ब. शहा) उपलब्ध आहे. ‘सरस्वती मंदिर’ नावाच्या धुळ्याहून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्या १९०५ सालच्या एका अंकात राजवाड्यांचा प्रसिद्ध झालेला पहिला लेख अगदी छोटा आहे.

‘विविधज्ञानविस्तारा’त एक उतारा त्यावेळी प्रकाशित झाला होता, त्यात गणपती ही देवता सुमारे तेराशे वर्षांचीच जुनी आहे, असे म्हटले होते. ते विधान राजवाड्यांच्या दृष्टीने चुकीचे होते म्हणून त्यांनी पुरावा देत प्रतिवाद केला, तो असा –

‘(अ) बाणाच्या हर्षचरित्रात गणपतीच्या देवळाचा एके ठिकाणी उल्लेख आढळतो. ‘गीताप्रथमयामश्च गणपतेर्भवने परिकल्पितं शयनीयमसेवत।’ तृतीय उल्लास, पृष्ठ ९३. द्वितीयावृत्ती. गणपतीचे देऊळ ज्याअर्थी होते, त्या अर्थी देवळातील देवाची पूजा होत होती, हे उघड आहे. ती पूज्य देवता त्याकाळी नव्हती’, हे म्हणणे अर्थात निराधार आहे. हर्ष शक ६० (म्हणजे सन १४८) मध्ये होता…’

राजवाड्यांनी दुसरा पुरावा सादर केला. तो गाथासप्तशतीचा. त्यांनी लिहिले, ‘गाथासप्तशतीच्या पाचव्या शतकाची तिसरी गाथा प्राकृतात अशी –

हेलाकरग्गअठ्ठिअजलरिक्क्रं साअरं पआसन्तो ।

जअइ आणिग्गअवडवग्गिभरिअगगणो गणाहिवई ॥३॥

हेलाकराग्राकृष्टजलरिक्तं सागरं प्रकाशयन्।

जयत्यनिग्रहवडवाग्निभृतगगनो गणाधिपति: ॥३॥

(टीका) गणाधिपतिर्विनायको मंडलनायकश्च ॥

या गाथेत गणपतीला सोंड आहे व त्याचा जयजयकार असो, हे म्हटलेले आहे. गाथासप्तशती शालिवाहन शकाच्या पहिल्या, दुसर्‍या किंवा तिसर्‍या शतकात झाली म्हणजे गणपति १५०० पासून १८०० वर्षांचा जुना झाला…’

राजवाड्यांनी आणखी एक पुरावा देत लिहिले की, ‘आपस्तंबांच्या नारायणांत खालील श्रुति आहे- ‘तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति: प्रचोदयात।’ ही ज्याअर्थी श्रुति आहे, त्याअर्थी तिचा काल शालिवाहन शकाच्या पूर्वी पाचसातशे वर्षांपलीकडील आहे, हे सर्वत्र मान्य आहे. म्हणजे एक दाताचा गणपति २३०० पासून २५०० वर्षांचा प्राचीन ठरतो. ‘एकदंताय विद्महे’ असे गणपत्यथर्वशीर्षांतहि म्हटले आहे… यावरून ‘विविधज्ञानविस्तार’कर्त्यांनी पुढे आणलेल्या उतार्‍यातील मत किती पोचट आहे, हे वाचकांनीच ठरवावे…’

खरे म्हणजे राजवाड्यांनी आपल्या प्रतिपादनामध्ये तीन प्रमाणे देऊन गणपतीचे प्राचीनत्व सिद्ध केल्यावर बहुसंख्य वाचकांचे समाधान झाले होते; पण सर्वांचे झाले नाही. काही शंकासुर निघालेच. तथापि त्यामुळेच राजवाड्यांना या विषयाचा सविस्तर ऊहापोह करणे भाग पडले.
आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com