प्राचीन काळी आपल्या समाजात स्त्रीपुरुष समागमविषयक ज्या चाली प्रचलित होत्या, असे राजवाड्यांना संशोधनामध्ये आढळले होते, त्यांच्याबद्दलची अधिक माहिती देताना त्यांनी लिहिले, हरिवंशाच्या तिसर्या अध्यायात असे नमूद केले आहे की, ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रह्मदेवाला दिली व तिजपासून प्रसिद्ध नारद झाला… हे विचित्र संबंध वर्णिलेले आणि तेहि इतिहासकार व्यासांनी व वैशंपायनांनी वर्णिलेले ऐकून सध्या आपल्याला जे आश्चर्य वाटते, तेच आश्चर्य जनमेजय राजाला पाच हजार वर्षांपूर्वीहि वाटले आणि आज आपण जो प्रश्न करू, तोच प्रश्न जनमेजयाने वैशंपायनाला केला.
जनमेजयाने विचारले, ‘वैशंपायनहो, हे असले अधर्म्य संबंध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता, याचा अर्थ काय?’ तेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की, ‘पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म ऊर्फ समाजरूढी सर्वमान्य होती. वर्तमानकाली समाजशास्त्रदृष्ट्या आपण जे उत्तर देऊ तेच उत्तर वैशंपायनांनी दिले.’
अशाच प्रकारच्या आश्चर्यकारक चाली महाभारतात वर्णिलेल्या आहेत, त्यांचा दाखला देत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘महाभारताच्या आदिपर्वाच्या ४५ व ४६व्या अध्यायांत अर्जुन आणि ऊर्वशी यांच्या भेटीचा वृत्तान्त दिला आहे. ऊर्वशी ही पौरववंशाची जननी आणि अर्जुन हा तिचा वंशज. असे असूनही भेटीच्या वेळी ऊर्वशीने अर्जुनाजवळ भोगयाचना केली, ती अर्जुनाने फेटाळली; कारण अर्जुनाचा पूर्वज जो ऊर्वशीपती पुरूरवा त्याच्या काळच्या नीतीत व अर्जुनाच्या काळच्या नीतीत बहुत अंतर पडून प्रगती झाली होती.
ऊर्वशी अर्जुनाला म्हणाली की, ‘तू मला असा फेटाळू नकोस. पुरूच्या वंशातील आमचे जे पुत्र व पौत्र येथे इंद्रलोकी येतात, ते आमच्याशी रमतात आणि त्यांना कोणी दोष देत नाहीत, तेव्हा तूही मजशी रमलास तर तुलाही त्यात काही दोष लागणार नाही.’ ही पुरातन नीति यद्यपि ऊर्वशीने आपल्या वंशजाला सांगितली तरीहि नीतिसुधारक अर्जुनाने ती मान्य केली नाही. तेव्हा संतप्त होऊन ऊर्वशीने अर्जुनाला शाप दिला की, ‘तू माझा आदर केला नाहीस, सबब वर्षभर षंढ होशील’… अशा उदाहरणावरून एवढे स्पष्ट होते की प्राचीन काळी विविध नाती उत्पन्न झालेली नव्हती.’
आपल्या पुस्तकाच्या (खरे म्हणजे लेखमालेच्या) पहिल्या लेखांकात राजवाड्यांनी आणखीही काही प्राचीन काळच्या निंद्य चालींचा उल्लेख केला होता. त्यांनी लिहिले, ‘महाभारतातील कर्णपर्वाच्या ४० ते ४६ या अध्यायांमध्ये कर्ण व शल्य एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढीत आहेत. त्यात शल्यावर वाक्प्रहार करताना त्याच्या राज्यातील लोकांच्या निंद्य – म्हणजे आर्यावर्तातील लोकांच्या दृष्टीने निंद्य -चालींसंबंधाने कर्ण म्हणतो, ‘शल्या, तुझ्या मद्रदेशांत पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू, अन्य बांधव, सोबती, पाहुणे व दासदासी ही सर्व जण सरमिसळ व्यवहार करतात. स्त्रिया कोणत्याहि पुरुषाशी – मग तो ओळखीचा असो वा नसो – स्वेच्छेने समागम करतात, दारू पितात आणि अर्धवस्त्र वा विवस्त्र नाचतातहि.’ ही वर्णनमाला हवी तितकी आणखी वाढवता येईल…
अतिप्राचीन काळी दिवसाढवळ्या उघड्या हवेत स्त्रीपुरुष समागम होण्यात काही नीतिभंग होतो, असे वाटत नसल्याचा पुरावा आदिपर्वाच्या १०४व्या अध्यायात आढळतो. …आणखीही एक वन्य चाल म्हणजे आपल्याहून कर्तृत्वाने, ऐश्वर्याने जो समाज अतीच अती श्रेष्ठ असेल, त्या समाजातील पुरुषांशी स्वस्त्रियांचा समागम झाल्यास भूषण मानणारे काही निकृष्ट समाज पूर्वी होते… पूर्वी कन्या कौमारावस्थेपासूनच पतिमर्यादेचा अतिक्रम करीत व तो अधर्म समजला जात नसे. हाच प्राचीन समाजमान्य धर्म बालपणीच कुंतीला सूर्यनारायणाने सांगितला होता. (वनपर्व, अध्याय ३०७). ‘हे कुंती, स्त्रीपुरुषांमध्ये आडपडदा नसणे ही स्वाभाविक स्थिती असून विवाहादि संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर, नंतरहि तू पुनरपि कुमारीच म्हणजे अक्षतयोनीच राहशील’… इत्यादि.
anand47.hardikar@gmail.com
