‘समाजाच्या चरित्रातील गत गोष्टींची जी हकीकत ती इतिहास होय. मग ती गोष्ट होऊन एक दिवस झालेला असो किंवा हजार वर्षे झालेली असोत. मानवसमाजाचे अखिल चरित्र हा इतिहासाचा विषय व वर्तमान क्षणाच्या पाठीमागील सर्व गतकाल हा त्याचा प्रांत… राजकीय उलाढाली घ्यावयाच्या व सामाजिक सोडावयाच्या किंवा हजार वर्षांपलीकडील हकीकत द्यावयाची व पाच वर्षां-अलीकडील टाकावयाची, असा संकुचित भेदभाव राहात नाही’ हे स्पष्ट झाल्यावर राजवाड्यांनी दुसरी बाब चर्चेसाठी आणली. ती बाब होती स्थलविषयक.

त्या संदर्भातील इतिहासकारांचा कोटिक्रम कसा असतो, हे स्पष्ट करताना त्यांनी लिहिले, ‘एकंदर मानवसमाजाचे वसतिस्थान ही विस्तीर्ण पृथ्वी आहे. तेव्हा त्याच्या इतिहासाच्या कक्षेत पृथ्वीवरील सर्व समाज आले पाहिजेत; मग ते समाज पूर्वेकडील असोत किंवा पश्चिमेकडील असोत. तत्त्वत: हे विधान सर्व इतिहासकारांस मान्य असते. परंतु कृतीत फारच फरक दिसतो. जगाचा इतिहास लिहिताना अथवा इतिहासाच्या तत्त्वांचे स्पष्टीकरणासह विवेचन करताना पौर्वात्य व पाश्चात्त्य असे समाज जमेत घेण्याचा आव हे इतिहासकार आणतात आणि साक्षात् कृतीत पाहावे, तर जुन्या व नव्या दहा पाच पाश्चात्त्य राष्ट्रांच्या इतिहासापलीकडे जात नाहीत. पूर्वेकडचे समाज स्थाणू (स्थिर) आहेत, त्यांना इतिहासच नाही, त्यामुळे त्यांना प्रागतिक देशांच्या इतिहासात गणता येत नाही, असा या लोकांनी लढवलेला कोटिक्रम असतो.’

त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘गति दोन प्रकारची असते – अधम किंवा उत्तम. पैकी जी गति उत्तम तिला प्रगति म्हणतात. समाजाची उत्तम गति म्हणजे आत्यंतिक नीतिमत्तेकडे, आत्यंतिक बुद्धिमत्तेकडे व आत्यंतिक संपन्नतेकडे समाजाची जी प्रवृत्ति ती. या तीन मत्तांकडे जो समाज जात असतो, तो समाज प्रागतिक व जो जात नाही, तो अप्रागतिक. प्रागतिक अवस्था संपादन करण्याला मुख्य साधने पाश्चात्त्य समाजात दोन मानिली जातात – एक युयुत्सुता (=युद्धसज्जता) व दुसरे सुयंत्र राज्यव्यवस्था. ही दोन साधने ज्या समाजाने संपादिली नाहीत, त्या समाजाला प्रगतीच्या मार्गाला लागता येत नाही, अर्थात त्याला प्रागतिक म्हणताही येत नाही.’

पाश्चिमात्य इतिहासकारांनी केलेली ‘ही व्याख्या भारतवर्षातील लोकांना काही अश्रुतपूर्व (पूर्वी कधी न ऐकलेली) नाही’, असे सांगून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘राज्ययंत्र उत्तमोत्तम ठेवून व सैन्याच्या जोरावर अंत:स्थ व बहि:स्थ शत्रूंचा नाश करून धर्म, न्याय, नीती व स्वास्थ्य यांचा लाभ करून घेण्याकरता भारतीय आर्यांनी चातुर्वण्र्याची पद्धत काढली, हे सुप्रसिद्ध आहे. क्षत्रियांनी व ब्राह्मणांनी सैन्याच्या जोरावर अंत:स्थ व बहि:स्थ शत्रूंचा नाश करून राज्ययंत्र काही काळ इतके सुव्यवस्थित ठेवले होते की सर्व शास्त्रांत गहन विचार करणारे तत्त्ववेत्ते आणि अखिल प्राणिमात्राला समबुद्धीने लेखणारे स्थितप्रज्ञ या पवित्र भूमीत उत्पन्न होऊन ऋद्धि व सिद्धि साक्षात अवतीर्ण झाल्या. समबुद्धीचा प्रकर्ष आर्यभूमीत त्या काळापासून इतका झाला की, शत्रू व मित्र यांच्याशी एकसारखे वागण्याचे वळण देशातील सर्व लोकांना लागले. त्यामुळे अपरिमित नुकसान झाले… परंतु सर्पाला दूध पाजून थोर नीतिमत्तेचा, अचाट बुद्धिमत्तेचा व अपार संपन्नतेचा घात होत आहे, असे अनुभवास आल्यावर कृतघ्न सर्पाचे दात पाडावयालाही आर्यांनी कमी केले नाही.’

सारांश सांगत मग राजवाड्यांनी लिहिले, ‘उत्तम गतीकडे म्हणजे प्रगतीकडे जाण्याचे पाश्चात्त्य लोकांचे जे आधुनिक मार्ग आहेत, त्यांहून बरेच निराळे परंतु अत्यंत उदात्त मार्ग पूर्वेकडील भारतीयांचे फार पुरातन कालापासूनच आहेत. बौद्ध संस्कृती अंगात भिनलेल्या जपानी लोकांनी तर युरोपीय लोकांच्या लष्करवादी प्रगतीचा मार्ग अलीकडे फारच सुधारलेला आहे. अशा स्थितीत या पौर्वात्य देशांतील इतिहासाची गणना केल्याशिवाय इतिहासशास्त्राला संपूर्णता येणार नाही व इतिहासाचे समग्र तत्त्वदर्शनही होणार नाही.’

आनंद हर्डीकर