अकराव्या खंडाच्या दहा पानी प्रस्तावनेमध्ये राजवाड्यांनी प्रारंभी समाधान व्यक्त केले की, ‘दिवसेंदिवस इतिहासाच्या अभ्यासाची गोडी महाराष्ट्रातील मध्यम स्थितीतील लोकांच्या ठायी वृद्धिंगत होत आहे. निवृत्तिमार्गापासून प्रवृत्तिमार्गाकडे म्हणजे प्रपंचाकडे लोकांची विचारप्रवृत्ति आस्ते आस्ते चालली आहे. ही प्रपंचप्रवृत्ति उसनी नसून जातिवंत आहे. इतिहास म्हणजे गतचरित्राची स्मृति. ती राष्ट्राला होत चालली आहे आणि ज्यापक्षी स्मृतीचा उदय होतो आहे, त्यापक्षी मोहाचा नाशही उदयाच्या प्रमाणानेच होत असला पाहिजे.’ नंतर त्यांनी स्मृतीचा तो उदय फारच मंद गतीने होत असल्याबद्दल खंतही व्यक्त केली. ‘आधीच्या १५ वर्षांत साधनांचे त्यांच्यासह खरे-पारसनीस वगैरे इतर अभ्यासकांकडूनही मिळून जेमतेम २५ खंडच प्रसिद्ध झाले आहेत आणि दर खंडास ५०० पत्रे याप्रमाणे छापावयाचे झाले, तर निदान १४६ खंड छापले पाहिजेत, एवढी ऐतिहासिक साधनसाम्रगी साठली आहे. एवढे खंड छापायचे कसे व केव्हा?’ हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुढे वैयक्तिक बाजू स्पष्ट करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘माझी स्वत:ची गोष्ट पुसाल, तर सुधारकउद्धारक, गरीबश्रीमंत, ब्राह्मणक्षत्रिय, वैश्यशूद्र, सर्व जातींचे, मतांचे, पंथांचे व चालींचे मध्यम वर्गातील स्त्रीपुरुष मला परोपरीने मदत करीत आहेत. त्यांच्या साहाय्याच्या मानाने माझ्या हातून उठावे तसे काम उठत नाही, हे पाहून मला क्षणोक्षणी खेद होतो. या आपल्या थोर देशात साहाय्याची व सहानुभूतीची कमतरता नाही. कमतरता योग्य काम योग्य सामथ्र्याने वठवणार्या कर्तबगार कामकर्यांचीच आहे.’ आणि त्यानंतर कर्तबगार कामकरी कोण, हा प्रश्न उपस्थित करून त्याच्या उत्तरादाखल त्यांनी लिहिले, ‘देशाच्या सध्याच्या विपन्नावस्थेत कर्तबगार कामकरी तो की, जो इतरांना द्रव्याची बिलकुल तोशीस न लावता देशाची सेवा करण्यात स्वत:च्या उत्तमोत्तम शारीरिक व बौद्धिक सामथ्र्याची सुखाने पराकाष्ठा करतो. स्पष्टीकरणार्थ एक काल्पनिक कर्तबगार व्यक्ती घेतो आणि त्याने इतिहाससाधनांच्या संशोधनार्थ व प्रकाशनार्थ काय खटपट करावी, ते सांगतो.’
‘समजा, एखाद्या बी.ए. किंवा एम.ए. पदवीधरास मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार करण्याची चुकून उत्कट इच्छा झाली; पण त्याच्या घरी अठराविश्वे दारिद्य्र आहे, मग त्याने काय करावे बरे? स्पष्ट शब्दांत सांगावयाचे म्हणजे ओली किंवा कोरडी भिक्षा मागून इतिहाससाधनसंशोधनाचे व इतिहासलेखनाचे काम त्याने जोराने व उत्साहाने चालवले पाहिजे. हा मार्ग काही नवीन नाही. आपल्या भारतवर्षात तो फार पूर्वीपासून प्रचलित आहे. दरिद्री विद्वानाला निर्वाहापुरते अन्न मिळण्याची सोय आज शेकडो वर्षांपासून वाडवडिलांनी करून ठेवली आहे, तिचा फायदा आपल्या इकडील महत्त्वाकांक्षी विद्वानांनी यथेष्ट घेतला पाहिजे.’
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करू इच्छिणार्यांनी ‘ॐ भवति’च्या मार्गाने जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, ही कल्पना देऊन राजवाडे थांबले नाहीत; त्यांनी मनोनिग्रह व इंद्रियनिग्रहाची गरजही अधोरेखित केली. आजच्या काळात कदाचित त्यांचे ते म्हणणे अतिरेकी कठोर किंवा हास्यास्पदही वाटू शकेल; परंतु काही ज्येष्ठश्रेष्ठ इतिहासकारांनी राजवाड्यांचे म्हणणे प्रमाण मानून हयात घालवली, हे लक्षात घेतले म्हणजे राजवाड्यांच्या अपेक्षेतला व्रतस्थपणाचा आग्रह समजू शकेल. त्यांनी लिहिले, ‘कनक व कांता या दोहोंचा मोह मोठा कठीण आहे. ‘ॐ भवति’पक्षीय विद्वानाने स्वत:च्या चैनीकरता एका पैचाही संग्रह करता कामा नये; आणि सर्व स्त्रियांना मातेसमान लेखिले पाहिजे. या दोन मोहांपासून अलिप्त राहणे म्हणजे ब्रह्मचर्याचा निव्वळ ओनामा होय. तो साधल्याने चित्तवृत्ति निष्कलंक राहून ज्ञानज्योतींचे निर्लेप स्फुरण होईल. परंतु हा योग सोपा नाही. प्रारंभी अज्ञ लोकांकडून टीका होण्याचा संभव असतो. कोणी अशा विद्वानाला एककल्ली म्हणेल, कोणी भ्रमिष्ट म्हणेल, कोणी ढोंगी म्हणायलाही कमी करणार नाही. पण त्या वटवटीला भीक घालता कामा नये. आपले व्रत एकनिष्ठेने चालवले पाहिजे, अशा विश्वासाने की, कालांतराने का होईना, लोकांना सत्यमार्गाची ओळख पटेल!’
