आनंद हर्डीकर
‘भाषांतर’ मासिकाच्या अंकांमधून प्लेटो-आरिस्टॉटल वगैरेंच्या ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध करणे चुकीचेच आहे, असे काही विद्वान सातत्याने सांगत राहिले होते. त्यांच्या त्या टीकेची दखल घेऊन राजवाड्यांनी १८९४च्या अखेरीस नोव्हेंबर-डिसेंबरच्या जोडअंकात एक १४ पानी लेख लिहिला होता. ‘गतवर्ष’ या शीर्षकाच्या त्या लेखात आपल्या संपादकीय भूमिकेचा पुनरुच्चार करताना त्यांनी जे मुद्दे मांडले होते, ते यापूर्वी आपण लक्षात घेतले असल्यामुळे त्यांची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. त्याऐवजी त्याच लेखामध्ये दिसलेल्या त्यांच्या वेगळ्या पैलूचा छोटासा नमुना (भाषांतरकर्त्या राजवाड्यांचे दर्शन घडवणारा) इथे उल्लेखिला, तर ते अधिक औचित्याचे ठरेल.

आरिस्टॉटलच्या माहात्म्याचे पुण्यातील एका पाठशाळेच्या उपगुरूंनी केलेले एका दीर्घ परिच्छेदातले वर्णन राजवाड्यांनी आपल्या त्या लेखात उद्धृत केले होते. एफ.डब्ल्यू.बेन यांनी ‘बॉडी ॲण्ड माइंड’ नावाच्या पुस्तकामध्ये ‘Science,  thy name is Aristotle!’ अशा निष्कर्षापर्यंत वाचकांना आणून ठेवणारे एक लंबचौडे वर्णन केले होते. सुमारे पाऊण पान भरेल अशा त्या इंग्रजी उद्धरणाच्या राजवाड्यांनी केेलेल्या भाषांतराचा हा अंश पाहण्यासारखा आहे.

‘आरिस्टॉटलच्या प्रचंड मनाचा मेज कोण घेणार? आकाशातील मूठभर तार्‍यांच्या निव्वळ, निरपेक्ष, निरुपाधिक संबंधांची अटकळ करण्याचे टाळून सजीव सृष्टीतील करोडोगणती शक्तींचा खेळ ज्याने समजून घेतला; मानवी मनाच्या तसेच सृष्टीच्या व्यवस्थेच्या अगाध तळाचा (पूर्वी) कधी न लागलेला ठाव ज्याने काढिला; तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र, गर्भशास्त्र आणि जीवशास्त्र, व्यवहारनीती आणि राजनीती यांच्यातील भेद दाखवून व त्यांच्या व्यवस्थित रचना करून, अज्ञानांधकाराऐवजी सनातन प्रकाशाची स्थापना ज्याने केली; ज्याने शास्त्रांच्या रहस्यांचा शोध लावला, सृष्ट पदार्थांची परंपरा हस्तगत करून घेतली; त्या या पुरुषाच्या गुणांचा यथोचित परामर्श आपण घेणार तरी कसा?…’

‘…अशी कृती करणारा पुरुष त्याच्या आधीही कोणी झाला नाही व त्याच्या मागूनही कुणी झाला नाही… सर्व काळांतील सर्व तत्त्वज्ञांना- मग ते जीवशास्त्रज्ञ असोत किंवा तर्कशास्त्रज्ञ असोत, व्यवहारनीतिज्ञ असोत किंवा राजनीतिज्ञ असोत- एका पोत्यात घाला, त्यांना खालवर हलवा, वाकडेतिकडे घोळवा, त्यांना खलबत्त्यात कुटा व त्यांचा अर्क काढा; पण इतके सारे करूनही आरिस्टॉटलच्या नखाचीही सर त्यांना यावयाची नाही… आरिस्टॉटल हा मानवी शक्यतेच्या शिखराला जाऊन पोहोचला होता… पदार्थांचे शास्त्र खेरीज करून इतर एकूणएक शास्त्रांत नि:संशय हाच तेवढा एकटा खरा गुरू आहे. हे शास्त्रविद्ये! आरिस्टॉटल हे नाव तुला खासे शोभते…’

बेनच्या इंग्रजी उद्धरणाचे असे भाषांतर देऊन राजवाड्यांनी पुढे म्हटले होते, ‘आम्ही पसंत केलेल्या ग्रंथकारांच्या योग्यतेबद्दल असे हजारो दाखले देता येतील; परंतु त्यांच्या गुणांची यथार्थता सिद्ध करण्यासाठी शिफारशींची मुळीच गरज नाही. त्यांची योग्यता स्वयंसिद्ध आहे.’ त्या आढाव्यात नंतर त्यांनी वर्षभरात लहानमोठे सहा ग्रंथ छापल्याचे आणि तीन मोठ्या ग्रंथांसह आणखी नऊ ग्रंथांची भाषांतरे चालली असल्याचे नमूद केले होते.

अर्थात ही सगळी भाषांतरे राजवाड्यांनी एकट्याने पार पाडली होती, असा याचा अर्थ नाही. शिवराम महादेव परांजपे, काशीनाथ खंडेराव गर्दे, गंगाधर वामन लेले प्रभृती सहकार्‍यांनी काही ग्रंथांची भाषांतरे केल्याचे उल्लेख आढळतात. परंतु या संदर्भातली एक महत्त्वाची बाब इथेच संक्षेपात नोंदवावीशी वाटते. ‘भाषांतर’ मासिक एकंदरीत ३७ महिने चालले. १८९७च्या फेब्रुवारीत ते बंद पडले. तथापि त्या मासिकाच्या तिन्ही वर्षांच्या सलग फायली समग्र राजवाडे साहित्याच्या संकलक-संपादकांना उपलब्ध झाल्या नव्हत्या. मर्यादित साधनांच्या आधारे त्यांनी जी शोधमोहीम सुमारे ३० वर्षांपूर्वी अमलात आणली, तिला पुण्याच्या शासकीय विभागीय ग्रंथालयात काही अंक मिळाले, तर आणखी काही अंक ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’त मिळाले होते. त्यामुळे व इतरही काही व्यावहारिक अडचणींमुळे बाराव्या खंडात सगळी ‘भाषांतरे’ समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने राज्यातील इतर जुन्या, संदर्भसंपन्न ग्रंथालयांच्या सहकार्याने ही उणीव भरून काढता आली, तर किती चांगले ठरेल! anand47.hardikar@gmail.com