‘कर्तबगार कामकर्या’ने संशोधनाच्या कार्याचा प्रारंभ करतानाच त्याचे एकूण स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे, असे समजून राजवाड्यांनी स्पष्टीकरण देताना लिहिले, ‘हे काम जितके नाजूक, तितकेच श्रमाचे आहे. मराठ्यांच्या साम्राज्यात ग्वाल्हेरपासून तंजावरपर्यंत व राजपुतान्यापासून कलकत्त्यापर्यंत असे एकही गाव नाही की, जेथे काही ना काहीतरी ऐतिहासिक सामग्री नाही. कोठे कागदपत्रांची दफ्तरे आहेत; कोठे महारांचांभारांजवळ ताम्रपत्रे आहेत; कोठे भटांभिक्षुकांजवळ पोथ्यापुस्तके आहेत; कोठे व्यापार्यांजवळ नाणी आहेत; कोठे देवळांमशिदींत शिलालेख आहेत. आणि कोठे पुरातन इमारती आहेत… इतकेच नव्हे, तर शहरे व गावे सोडून संशोधक जर अरण्यांत व डोंगरांत भटकला, तर तेथे मोडलेली शहरे, गावे, किल्ले व लेणी त्याची वाट पाहात आहेत. अद्याप डोंगरडोंगरीच्या शेकडो गुहा शोधावयाच्या आहेत आणि जमिनीत गाडली गेलेली शहरे उकरावयाची आहेत. संशोधक जर पाणबुड्या व्हायला तयार असेल, तर जुन्या पुष्करण्या, तलाव व कुंडे जुन्या संस्कृतीची अवशिष्ट भांडारे त्याच्यापुढे खुली करण्यास सज्ज आहेत. अशी ही इतिहाससामग्री अपार आहे!’
साधनसामग्री शोधण्याचे, संकलित करावयाचे काम कसे करावे लागते, याबद्दलचा प्रचंड अनुभव गाठीशी बांधलेल्या राजवाड्यांनी पुढे त्याबद्दलचाही व्यवस्थित खुलासा केला. ‘बिचार्या दरिद्री संशोधकाच्या पायांचे घोडे खंबीर पाहिजेत; तक्रार बिलकूल उपयोगाची नाही. माहिती मिळाली की, इष्ट स्थानाला जाण्यासाठी ताबडतोब घोडे जुंपले पाहिजेत. इष्ट स्थळी थडकल्यावर, घोड्यांची कामगिरी संपली.’
अशा स्थितीत अतिशय उपयुक्त ठरेल असा व्यावहारिक सल्ला देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘इष्ट स्थळी ज्या गृहस्थाकडे इतिहाससामग्री असते, त्याची ओळख संशोधकाला नेहमी असतेच, असे नाही. सबब त्या ठिकाणच्या कोण्या ओळखीच्या संभावित गृहस्थाला ओळख पटवण्याकरता घेऊन जावे लागते. तो गृहस्थ बरोबर आला म्हणजे एक मोठे काम होते. आपण कोण, कोठले याची सविस्तर हकीकत सामग्रीवाल्यास परस्पर कळते व त्या परिचिताची भीडही त्याला मोडता येत नाही. परंतु एवढ्याने किल्ला सर झाला, असे उतावीळपणे समजू नये.’
‘आपण अजूनही गडाच्या पायथ्याशीच आहोत, हे नीट लक्षात ठेवावे’, असे होतकरू संशोधकांना बजावून राजवाड्यांनी आणखी पुढचाही सल्ला दिला. ‘महाराष्ट्रात असा कोण महापुुरुष आहे की, ज्याचे भाऊबंदकीचे तंटे नाहीत? तेव्हा सामग्रीवाल्याला अशी शंका येते की, हा नवखा दिसणारा लुच्चा प्रतिपक्षांकडून आपली छिद्रे धुंडाळावयाला तर आला नाही ना? अर्थात या शंकेचे निराकरण व्हावयाला कमीत कमी एकदोन दिवस लागतात. सचोटीचे कूळ आहे, अशी खातरजमा झाली की गोड बोलायला सुरुवात होते. मग उद्या दफ्तर किंवा कागद किंवा ताम्रपट किंवा पोथ्या जे काही असेल ते दाखवण्याचे आश्वासन मिळते. प्रत्यक्षात उद्या गेल्यावर समन्स लागल्यामुळे बुवा तालुक्याच्या कचेरीस पहाटेच निघून गेले, ते दोन दिवसांनी येतील, असे कळते. दोन दिवसांनी गेल्यावर बुवांच्या घरी श्राद्ध निघते… नंतर सबब निघते की दफ्तरे माळ्यावर अडगळीत पडलेली आहेत, तेव्हा उद्या येण्याची तसदी मेहरबानी करून घ्या. तशी मेहरबानी करावीच लागते. संशोधक दुसर्या दिवशी हजर होतो तो इनामदारांचा शिपाई नाहीसा होतो.
संशोधक विनवतो, इनामदारसाहेब, धुरळा अंगावर पडला तरी चालेल, आम्हीच दफ्तरे काढतो व तपासून होती तशी ठेवून देतो. निरुपायास्तव ते परवानगी देतात. इतके दिवस व एवढे गोते खाल्ल्यावर दफ्तर एकदाचे खुले होते. ते काढले, झाडले, कागद तपासले, निवडले तो दोन-चार दिवस लागतात. नंतर मालक विचारात पडतो, द्यावे की न द्यावे? शेवटी मध्यस्थाच्या भिडेखातर व संशोधकावर उपकार म्हणून एकदोन दिवसांनी कागद हस्तगत होतात. इतका प्राणायाम एकेक दफ्तर मिळवण्यासाठी करावा लागतो. या व्यापक कार्यात आर्जव हा बहुमोल गुण संशोधकाने टिकवावा लागतो.’
