राजवाड्यांनी ‘ग्रंथमाले’च्या सप्टेंबर १९०३च्या अंकामधून एक जुने महानुभावी (अपभ्रंशाने मानभावी) काव्य प्रकाशात आणले होते. ते त्रुटित (=अर्धवट) स्थितीत असूनही उपलब्ध झाल्यावर फारसा वेळ न दवडता त्यांनी ते प्रकाशित केले आणि त्याबद्दलची माहिती देत लिहिले, ‘पेशावरास मानभावांचे कित्येक अर्वाचीन लहानसहान ग्रंथ छापलेले विकत मिळतात; परंतु शालिवाहनाच्या बाराव्या किंवा तेराव्या शतकांतील मानभाव लोकांचा एकही ग्रंथ अद्याप प्रकाशला गेलेला नाही.
याचे कारण दुसरेतिसरे काहीएक नसून प्राय: आपली अनास्था आहे… मानभाव लोक आपले ग्रंथ इतर लोकांस बघूदेखील देत नाहीत, आपले ग्रंथ गुप्त राहावेत, अशी त्यांची समजूत आहे, बहुतेक मानभावी ग्रंथ गुप्तलिपींत लिहिलेले आहेत, ती गुप्तलिपी त्या पंथांतील विद्वान शास्त्र्यांखेरीज इतरांना शिकविली जात नाही’… वगैरे अनेक कुत्सित कल्पना आज कित्येक वर्षे प्रचलित आहेत. परंतु माझा जो काही थोडासा या लोकांशी परिचय झाला त्यावरून या कल्पनांना काही आधार आहे, असे बिलकुल दिसले नाही.
मानभाव लोक आपले बहुतेक ग्रंथ पंथाबाहेरच्या लोकांनाहि दाखवितात, इतकेच नव्हे तर ते प्रसिद्ध करणारा कोणी भेटल्यास त्यात ते समाधानच मानतात. त्यांच्या पंथांतील गुप्तलिपींत लिहिलेले बीजात्मक जे ग्रंथ आहेत, ते मात्र पंथाबाहेरच्या लोकांना ते दाखवीत नाहीत, बाकीचे कोणतेहि ग्रंथ कोणाहि योग्य श्रद्धावान हिंदूला दाखविण्यास त्यांची यत्किंचित अडचण नाही…’
महानुभाव पंथाबद्दलचा असा अनुकूल अभिप्राय स्वानुभवांच्या आधारे देऊन झाल्यावर राजवाड्यांनी त्या ग्रंथांचे दुहेरी माहात्म्य सांगितले. त्यांनी लिहिले, यांचे माहात्म्य दोन प्रकारचे आहे. अर्वाचीन मराठी भाषेचे बरेच जुने मासले म्हणून या जुन्या ग्रंथांचे महत्त्व जितके मानावे तितके थोडेच आहे. हे ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या बहुतेक समकालीन असल्यामुळे त्या थोर ग्रंथाचे भाषाशास्त्राच्या दृष्टीने विवेचन करण्यास या ग्रंथांचे बरेच साहाय्य होणार आहे आणि या मानभावी ग्रंथांची भाषा त्यावेळच्या मराठीच्या अनेक पोटभेदांपैकी असल्यामुळे कोंकणी, देशी, वर्हाडी वगैरे पोटभाषांशी तुलना करण्यास हे ग्रंथ साधन होणार आहेत…’
‘या ग्रंथांचे दुसरे माहात्म्य धर्मविषयक आहे. श्रीमत् शंकराचार्यांनी पंचायतपूजेचा प्रघात पाडून शैव, वैष्णव, शाक्त वगैरे एकेक देवतांच्या उपासकांस इतर देवतोपासकांशी स्पर्धा व द्वेष न करण्याचे शिकविले. परंतु आचार्यांच्या नंतर काही शतकांनी केवळ शिवाचीच उपासना करणारा असा बसव ब्राह्मणप्रणीत लिंगायतपंथ निघाला. प्रारंभी या बासवी पंथांत जातिभेद बिलकूल नव्हता. त्यामुळे ब्राह्मण- क्षत्रियेतर जातींतील अनेक लोक या पंथाचे अनुयायी झाले. शिवाय, जातिहीन असे जैन, बौद्ध वगैरे लहानमोठे पंथ ब्राह्मणक्षत्रियेतर लोकांत प्रचलित होतेच.
लिंगायत, जैन वगैरे पंथांनी महाराष्ट्रातील खालच्या प्रतीचे लोक आकर्षिलेले पाहून कृष्णोपासक व दत्तोपासक अशा कित्येक ब्राह्मणांस स्वदैवतोपासनावर्धनार्थ जातिहीन असा एक नवीनच पंथ काढण्याची आवश्यकता भासली. तोच हा महानुभाव किंवा अपभ्रंशाने मानभाव पंथ होय. लिंगायत पंथ निघाल्यावर थोड्याच कालाने हा कृष्णोपासक व दत्तोपासक पंथ निघाला. महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात जे अनेक जातिहीन पंथ आहेत, त्यांपैकीच हाहि एक असल्याने व या पंथाचा प्रारंभ साडेसहाशे वर्षांच्या पलीकडील नसल्याने, एका जातिहीन हिंदुधर्मपंथाचा आद्यन्त इतिहास तपशीलवार समजला असता, तो स्वदेशातील विचारी लोकांस फारच उपयुक्त ठरेल. धर्मदृष्ट्या या पंथाचे माहात्म्य असे आहे…’
हे दुहेरी माहात्म्य लक्षात घेऊन आपण इतर ग्रंथांबरोबरच महानुभावी ग्रंथांचाही शोध घेत राहिलो आणि आपल्या त्या मोहिमेत हाती आलेले हे काव्य जुन्या मानभावी काव्याचा नमुना म्हणून छापत आहोत, असे राजवाड्यांनी त्यानंतर स्पष्ट केले आणि त्याचबरोबर हाही खुलासा केला की, या काव्याचा कर्ता कोण ते माहीत नाही. काव्याचे पहिले साडेसतरा श्लोक आणि शेवटचे पाचदहा तरी श्लोक उपलब्ध नाहीत आणि तरीही आपण ते २६७ पर्यंतचे श्लोक आवर्जून छापत आहोत.
anand47.hardikar@gmail.com
