‘स्वराज्य व स्वराष्ट्र ह्यांचा नि:सीम अभिमान बाळगणारे लोक शहाजीकाली फारच विरळा असत. त्याकाळातील मराठे केवळ आयुधोपजीवी बनले होते. स्वराष्ट्रसंरक्षक क्षत्रियत्वाचे वारे त्यांच्यातून लुप्त झाले होते. मुसुलमान किंवा हिंदु अशा वाटेल त्या धन्याची सेवा करण्यात हे सारखेच राजी असत. ह्या मराठ्यांना यवनाची सेवा मनापासून आवडत असे, असा मात्र या राजीपणाचा अर्थ केल्यास ती चूक होईल’, अशा शब्दांमध्ये राजवाड्यांनी स्वकीयांच्या मानसिकतेचे मूल्यमापन केले आणि पुढे लिहिले, ‘विजयानगरच्या राजघराण्याचा अस्त झाल्यावर, स्वतंत्र हिंदुराज्य स्थापण्याची शक्यता नसल्यामुळे, यवनसेवा केल्यावाचून या अगतिक लोकांना गत्यंतरच राहिले नव्हते… दहापाच हजार पाईक पोशील किंवा पाचचार हजार बारगीर बाळगील अशा तोलाचा मराठा क्षत्रिय शक तेराशेपासून शक पंधराशेपर्यंत एकही नव्हता. मनुष्यबल, द्रव्यबल व ज्ञानबल या तिन्ही बलांचा अभाव प्रकर्षाने मराठ्यांच्या ठायी जाणवत असल्याने ते करू नये ती यवनसेवा पोटाची खाच भरण्याकरिता पतकरीत असत. असल्या हतभाग्यांना कोठला स्वधर्म व कोठले स्वराज्य! इतकी तीनशे वर्षे ते जिवंत राहिले, हेच नशीब!’
मराठ्यांच्या ‘अगतिक’ मानसिकतेची ऐशीतैशी केल्यानंतर राजवाड्यांनी मुसलमानांच्या स्थितीचे वर्णन केले. त्यांनी लिहिले, ‘त्याकाली महाराष्ट्रांत तीन प्रकारचे मुसुलमान असत. इराण, तुराण, अरबस्तान व अफगाणिस्तान यांतून येणार्या मुसुलमानांना अस्सल समजत. तो झाला पहिला वर्ग. ह्या अस्सलापासून येथील शूद्रातिशूद्र स्त्रियांच्या ठायी झालेल्या लेकवळ्या मुसुलमानांचा दुसरा वर्ग. आणि येथीलच खाटीक, हलालखोर, तांबोळी, पटवेगार, मोमीन, रंगरेज, लोहार, बोहरी इत्यादि बाटलेल्या जातींचा तिसरा वर्ग. ह्या तिसर्या वर्गातील लोकांची राजकीय दृष्टीने गणती करण्याची गरज नाही. मुसुलमानी रिवाजात मूळच्या जाती नाहीत, तेव्हा येथील ्त्रिरयांच्या पोटून त्यांना जी मिश्र संतती झाली, ती त्यांच्या दृष्टीने पूर्णत: मुसुलमानच ठरते. हे लोक येथे स्थायिक होऊन कित्येक पिढ्या झालेल्या होत्या व ह्यांना दक्षिणी अथवा दख्खनी असे नामाभिधान पडले. इराण, तुराण, अरबस्थानातून जे नवीन मुसुलमान येत, त्यांना परदेशी ही संज्ञा असे. ह्या दक्षिणी व परदेशी मुसुलमानांतूनच निजामशाही व आदिलशाही राज्यांत मुत्सद्दी व लष्करी अंमलदार मिळत. त्यांच्या कर्तबगारीवर राज्याची स्थिरस्थावरता अवलंबून असे. निजामशाही व आदिलशाही रिसायतीच्या प्रारंभीच्या पन्नासशंभर वर्षांत दक्षिणी-परदेशी असा भेद त्या मुसुुलमानांत उद्भवला नव्हता. सर्वच मुसुलमान परदेशी होते. पुढे मात्र दक्षिणी मुसुलमानांचे पिढ्यानुपिढ्या येथे कायम राहिल्यामुळे वेगळे हितसंबंध निर्माण झाले व त्यांच्या हितसंबंधांची पातशाही हितसंबंधांची तेढ पडू लागली.’
मराठेशाहीच्या उदयाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याच्या दृष्टीने अगदी महत्त्वाची अशी ही गुंतागुंतीची तेढ समजावून देत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘ह्या तेढीवर तोड म्हणून पातशाहा परदेशी नवीन मुसुलमानांना आपल्या दरबारी बोलावीत, कारण नवीन परदेश्यांचे येथे हितसंबंध उद्भवले नसल्यामुळे तेढ नसे. दक्षिणी व परदेशी असे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध चालवून पातशाहा आपल्या हाताखालील अंमलदारांना दाबांत ठेवण्याचा प्रयत्न करीत. मनुष्यांना वागवण्याची नाजूक करामत ज्या सुलतानाला साधे त्याच्या हाती हा प्रयत्न फलप्रद होई; परंतु एखादा सुलतान कमअक्कल किंवा दुर्बल किंवा पोरसवदा निपजला म्हणजे हे दोन्ही पक्ष उरमट होऊन सुलतानाच्या कह्यात न वागता त्याच्यावरच कुरघोडी करीत. अशा स्थितीत एकच तोड शिल्लक राही. ती ही की, नवीन तिसरा पक्ष उभा करून पूर्वीच्या दोन पक्षांना दाबात ठेवावयाचे… शहाजी जेव्हा मालोजीच्या जहागिरीचा मालक होऊन निजामशाही दरबारात वावरू लागला, त्यावेळी म्हणजे शक १५४३मध्ये त्या दरबारातली ही दक्षिणी व परदेशी मुसुलमानांतील तेढ, त्या दोन पक्षांमधील बंडाळी ऐन रंगात येऊन टोकाला पोचली होती.’
त्यावेळी निजामशाहीच्या तख्तावर सुलतान म्हणून बसलेल्या मूर्तिजाने तिसरा पक्ष निर्माण केला. तो पक्ष म्हणजे मराठ्यांचा पक्ष. शहाजीच्या कर्तृत्वाला वाव मिळाला, तो तेथून…
– आनंद हर्डीकर
