वाईच्या दोन मोडी मराठी ताम्रपत्रांबाबत राजवाड्यांनी जो विस्तृत लेख लिहिला, तो त्या दोन्ही पत्रांमधील शब्दांच्या स्वरूपवैशिष्ट्यांबाबत जसा होता, तसाच तो मराठी भाषेच्या स्थित्यंतरांबाबतही होता. अभिलेखशास्त्र (Epigraphy) आणि भाषाशास्त्र (Linguistics) या दोन्ही विद्याशाखांच्या जिज्ञासू अभ्यासकांनी त्या मूळ लेखाचे अवश्य वाचन करावे, इतका तो महत्त्वाचा आहे. ताम्रपत्रांतील जेमतेम १०१ (५२ ४९) ओळींसाठी राजवाड्यांनी ११५ तळटिपा तर दिल्या आहेतच, परंतु सुमारे ११ छापील पाने विविध मुद्द्यांच्या आधारे विवेचनही केले आहे.

‘गेल्या पंधराशे वर्षांत मराठी भाषेची स्थित्यंतरे कसकशी झाली तें स्थूल मानानें खालीं दाखवतो’, असें म्हणून त्यांनी लिहिले, ‘(१) शक २०० : महाराष्ट्री शातवाहनांचें राज्य. देशांत महाराष्ट्री नांवाची प्राकृत भाषा नागर व अनागर लोक बोलत. (२) शक २०० ते शक ५०० पर्यंत : शक दोनशेच्या सुमारास महाराष्ट्री भाषा बोलणार्‍या आंध्रभृत्यांचे राज्य जाऊन देशांत अराजक माजलें. भाषा अनागर लोकांच्या हाती गेली. तिच्यांत अपभ्रंश आतोनात झाला. तो इतका कीं, तीनशें वर्षांनी महाराष्ट्री भाषा जाऊन तिच्या ठिकाणीं मराठी भाषा सुरू झाली. (३) शक ५००-७०० : पूर्वचालुक्यांचें राज्य. मराठी भाषा स्थिर होती. (४) शक ७००-९०० : राष्ट्रकूटांचें राज्य. मराठी भाषा वाढत आहे. (५) शक ९००-११०० : उत्तरचालुक्यांचें राज्य. मराठी भाषा वाढत आहे. (६) शक ११००-१२३९ : यादवांचें राज्य. मराठी भाषा वाढत आहे. (७) शक १२३९-१५०० : मराठी फारशीशीं मिश्र होत आहे. मोगलांचें राज्य. (८) शक १५००-१७३९ : भोसल्यांचें राज्य. मराठी भाषा वाढत आहे. आणि (९) शक १७३९-१८२७ : इंग्रजांचे राज्य. मराठी संकोच पावत आहे. इंग्रजी शब्द मिसळत आहेत.’ याबरोबरच राजवाड्यांनी हेसुद्धा ठामपणे सांगितले की, ‘महाराष्ट्रांत महाराष्ट्री व मराठी ह्याखेरीज दुसरी कोणतीहि भाषा व राष्ट्रभाषा या नात्यानें गेल्या २००० वर्षांत प्रचलित नाही…’

सहज गंमत म्हणून ‘ज्ञानेश्वरकालीन ‘तेयासि’ हें नागररूप जाऊन शक १४५२ मधलें ‘त्यास’ हें अनागर रूप शक १८२८मध्ये नागर लोकांनी कसें उचललें’, त्याबद्दल राजवाड्यांनी केलेेले विवेचन पाहण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले, ‘शक १२१२तला मराठी नागर ग्रंथकार जो ज्ञानेश्वर त्याची समाप्ति झाल्यावर थोड्याच कालाने महाराष्ट्रावर मुसुलमानांचें राज्य झाले व नागर ग्रंथकारांचे तेज कमी पडत चाललें. शक १२१२ पासून शक १४००पर्यंत म्हणजे जनार्दन दासोपंत, एकनाथ वगैरे नागर ग्रंथकार उदयास येईतोपर्यंत मराठींत सुमारे १७५ वर्षे नागर ग्रंथरचना फार अत्यल्प झालेली आहे. पुढारी उदासीन झाल्यावर, अनागर लोकांचा भाषाव्यवहार व उच्चारव्यवहार उच्छृंखल होऊन, त्याला परकीय फारशी भाषेचा स्पर्श झाला. ‘तेयासि’ या रूपांतील अंत्य व मध्य स्वर लुप्त होऊन ‘त्यास’ हें रूप शक १४५०च्या सुमारास अनागर लोकांत प्रचलित झालें. पुढें जे नागर ग्रंथकार झाले ते ‘तयासि’ असा एकारविरहित व इकारसहित उच्चार पूर्वपरंपरा म्हणून व अनागर लोकांच्या बोलण्यांत ‘त्यास’ हें जें रूप बेमालूम बसलें होतें, त्याच्या जवळचें म्हणून योजूं लागले. कालांतरानें ‘त्यास’ हें अनागर रूप नागर समजलें जाऊ लागले, तेंच अनागर रूप शिवाजीच्या कालानंतर मराठींत सर्वमान्य झालें… मुसुलमान राज्यकर्त्यांना नागर व अनागर अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा जर शक १२१२ नंतर थोड्याच वर्षांनी उच्छेद करता आला असता, तर मराठी भाषा मृत झाली असती आणि ‘तेयासि’ हेंच शेवटलें रूप झालें असतें. उलट कालांतरानें मराठ्यांचें वजन वाढून मुसुलमानी पातशाह्यांचाच समूळ उच्छेद झाला. त्यामुळे मराठी भाषेचा लोप झाला नाही, पण अनागर लोकांच्या उच्चारांचे प्राबल्य वाढल्यामुळें ‘त्यास’ हें रूप सर्वत्र रूढ झालें.’
anand47.hardikar@gmail.com