‘राजवाडे ज्या पद्धतीने (कालप्रवाहात) मागे जात जात त्रिविक्रमाची आणि त्याच्या आजाची भाषा मराठी असावी, असे अनुमानितात, त्याच पद्धतीचा अंगिकार करून मराठी भाषेचा आरंभकाळ मानववंशाच्या आरंभकाळापर्यंत मागे नेता येणेही शक्य आहे, कारण एकदा राजवाडे यांचा सिद्धांत मान्य केला की मग त्रिविक्रमाच्या आजापर्यंतच जाऊन का बरे थांबायचे, हा प्रश्न उत्पन्न होतो’, अशा शब्दांत ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे लेखक डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी राजवाड्यांच्या पाटण येथील शिलालेखावरील भाष्यावर टीका केली. डॉ. पां. दा. गुणे यांनीही ‘ही शिडी अशीच मागे मनूपर्यंतसुद्धा पोहोचवता येईल’, असा शेरा मारून राजवाड्यांच्या विवेचनाची व त्यांच्या निष्कर्षाची टर उडवली. या दोन विद्वानांनी राजवाड्यांवर टीका केली असली, तरी ती यथायोग्य नसून राजवाड्यांवर अन्याय करणारी आहे, असे स्पष्ट मत डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी समग्र राजवाडे साहित्याच्या चौथ्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेत मांडले आहे. ‘राजवाड्यांनी आपल्या विवेचनाच्या समर्थनासाठी जी शिलालेखांची वा ताम्रपत्रांची यादी दिली होती, तिच्याविषयी तुळपुळे यांनी व्यक्त केलेला संशय अनाठायी आहे, एखादा अपवाद वगळल्यास ते सर्व स्रोत अस्सल आहेत’, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आणि स्वतंत्रपणेही अन्य काही पुरावे देऊन राजवाडेमत हास्यास्पद नसून गांभीर्याने व सहृदयतेने विचारात घेण्याजोगे असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
राजवाड्यांचा कल्पनाविलास बाजूला ठेवून त्यांचे इतर विवेचन पाहिले, तर त्यांची मराठीच्या ऐतिहासिक स्वरूपाचे परिपूर्ण आकलन करून घेण्याबाबतची तळमळ स्पष्टपणे जाणवते. उदाहरणार्थ हे विवेचन पाहण्यासारखे. ‘शक ६०२पासून शक ११०२पर्यंतचे (इसवी सन ६८० ते ११८०) जे तेरा लेख नमूद केले आहेत, त्यांत मराठी शब्द व उच्चार येण्याचे कारण असे की, यद्यपि हे लेख संस्कृतांत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तत्रापि अक्षरे कोरणारे जे कारागीर व मसुदा तयार करणारे जे अधिकारी होते, त्यांच्या बोलण्यांत व लिहिण्यांत प्रचलित लोकभाषेतले प्रचलित उच्चार नेहमी येत. हे लोक गाढे संस्कृतज्ञ नसत, अर्थात त्यांच्या संस्कृतांत लौकिक उच्चार, शब्द व रूपे अपरिहार्यत्वाने सहजासहजी येत. हे त्यांचे अज्ञान भाषाशास्त्राला फार उपयोगाचे झालेले आहे. त्यामुळे त्याकाळी लोकभाषेत उच्चार, रूपे व शब्द कसे असत, ते समजण्यास अल्प मार्ग झाला आहे. एपिग्राफिया इंडिका, इंडियन अँटिक्वारी, एशियाटिक सोसायट्यांची मासिक पुस्तके यांत प्राचीन लेख छापणारे युरोपियन व हिंदू विद्वान त्या लेखांखालील टिपांत मूळ लेखांतील लौकिक उच्चार, रूपे व शब्द चुकीचे समजून शुद्ध संस्कृत उच्चार, रूपे व शब्द कोठेकोठे देण्याचा प्रयत्न करतात. परंतु सदर उच्चार, रूपे व शब्द लौकिक भाषानुसारी आहेत, हे जर लक्षांत घेतले, तर शुद्ध करण्याचा उद्योग किती अप्रस्तुत आहे, ते स्पष्ट लक्षांत येईल.’
गंमत म्हणजे पाटणच्या शिलालेखावरील आपल्या लेखाचा समारोप करताना मात्र राजवाड्यांनी पुन्हा एकदा अनुमानांचीच चवड रचली. त्यांनी लिहिले, ‘सारांश, शक ६०२पर्यंत अर्वाचीन मराठी भाषेची आदि नेण्यास सबळ कारणे आहेत, असे दिसते. परळच्या शिलालेखावरून, ११०२ पाटणच्या शिलालेखातील वंशावळीवरून शक ७७० व मागेच दिलेल्या तेरा प्राचीन लेखांतील मराठी शब्दांवरून शक ६०२ अशा मराठी भाषेच्या चरित्रातील कालसीमा दिसतात. शक ६०२च्या पूर्वी महाराष्ट्री भाषा १२००/ १३०० वर्षे प्रचलित असावी म्हणजे गौतमबुद्धाच्या वेळी महाराष्ट्री नावाची प्राकृत भाषा सुरू झाली असावी. त्यापूर्वी बाराशे वर्षे म्हणजे शकापूर्वी १८०० वर्षे पाली भाषा प्रचलित असावी आणि त्याच्या पाठीमागे वैदिक आर्ष भाषा आर्य लोक बोलत असावेत. म्हणजे शकापूर्वी ३००० वर्षांपलीकडे आर्ष भाषेचा प्रचार आर्य लोकांत असावा. हा काल भारती युद्धाचा होय… परंतु हे सर्व अंदाज झाले. शक ६०२मध्ये मराठी आपण बोलतो ती मराठी महाराष्ट्रांत सामान्य लोक बोलत, हे मात्र निश्चित आहे!’
