नार्मन-फ्रेंच भाषेच्या दडपणाखाली साक्सन भाषेची तीनशे वर्षांत कशी दुर्दशा झाली, याबद्दलचा खुलासा केल्यानंतर राजवाड्यांनी मराठी-फारशी संबंधांतील तणावांबद्दल निरीक्षणे नोंदवली- ‘मराठीला १३१८ पासून १६५६पर्यंत फारशीच्या वर्चस्वाचा त्रास सहन करावा लागला. नुसते शब्द व प्रयोग जोपर्यंत फारशीतून येत, तोपर्यंत मराठीच्या अंत:स्वरूपाला फारसे भय नव्हते; परंतु उभयान्वयी व शब्दप्रयोगी अव्यये घेण्याचा आणि विभक्तिप्रत्यय व उच्चार फारशीच्या धर्तीवर बदलण्याचा जेव्हा मराठीत क्रम सुरू झाला, तेव्हाच तिचे अंत:स्वरूप बदलण्यास प्रारंभ झाला… हा बदल सतराव्या शतकात मराठ्यांनी स्वातंत्र्यार्थ जे प्रयत्न केले, त्यामुळे जास्त व्हावयाचा थांबला. जर मराठ्यांची राज्यक्रांति न होती, तर थोड्याच दिवसांत मराठी उर्दू झाली असती.’

शिवरायांनी घडवलेल्या राज्यक्रांतीमुळे मराठी भाषेचे कसे संरक्षण झाले आणि त्याचा इतर भारतीय भाषांवरही किती चांगला परिणाम झाला, याचे वर्णन करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘जशी महाराष्ट्रात सतराव्या शतकात क्रांति झाली, तशी उत्तर हिंदुस्थानात मुुसुलमानी रियासतीच्या अव्वलीपासून अखेरीपर्यंत म्हणजेच बाराव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत केव्हाहि न झाल्यामुळे, हिंदी भाषेची उर्दू बनली. व्यवहाराकरता उर्दू भाषा मुद्दाम बनविली, असा कित्येकांचा समज आहे, पण तो खोटा आहे. मुद्दाम भाषा बनवणे व ती बनवून प्रचारात आणणे या गोष्टी मानवी इतिहासात सर्वस्वी अशक्य आहेत. कोणतीही भाषा आपोआप बनत जाते व ती बनण्याची कारणे त्या भाषेच्या बाहेरची असतात. येथे कोणी असा प्रश्न करील की, हिंदीची जर उर्दू बनली, तर अद्याप हिंदी भाषा चालू कशी राहिली? तर त्याला उत्तर आहे. उर्दू भाषा बनत बनत जो जोमात येते आणि हिंदी मागासत जाते, तो मराठ्यांच्या राज्यक्रांतीने मुसुलमानांच्या सत्तेला, संस्कृतीला व भाषेला जबरदस्त खो बसला व सर्व हिंदुस्थानातील भाषा बंधमुक्त झाल्या. सिंधी, पंजाबी, हिंदी, मारवाडी, बंगाली, भोजपुरी, रांगडी, गुजराथी, मैथिली, ओडिया वगैरे उत्तर हिंदुस्थानातील भाषा जर मुसुलमानांचे राज्य आजपर्यंत राहते, तर नि:संशय मृत्युपंथास लागल्या असत्या. सारांश, मराठ्यांनी जुलमी फारशी व उर्दू यांना उखडून पाडल्यामुळे हिंदुस्थानातील देशी भाषांना जीवदान मिळाले…’

मुसलमानी अंमल सुरू झाल्यावर सरकारी दफ्तर फारशीत लिहिले जाणे स्वाभाविक होते, परंतु गावे, पुरुष, स्त्रिया, शेते वगैरेंची विशेषनामे फारशीत लिहिल्यामुळे फार घोटाळा होऊ लागला. त्या ऐतिहासिक वास्तवाचा उल्लेख करून मराठी दरबारात टिकून कशी राहिली, ते सांगताना राजवाड्यांनी पुढे म्हटले, ‘फारशी अक्षरमालिका अत्यंत अपूर्ण आहे. तिच्यात काही उच्चारांना फाजील अक्षरे आहेत आणि बर्‍याच उच्चारांना अक्षरेच नाहीत. फारशी शिकस्ता लिहिताना कोणत्या अक्षराला कोणता स्वर लावावयाचा, हे ठरवता येत नाही. हा दोष परभाषेतील विशेषनामे लिहिताना फारच जाणवतो. उदाहरणार्थ- सफर अशी तीन अक्षरे जर फारशीत काढली व त्यांचा एक शब्द बनवला, तर त्याचे सफर, सिफर, सफिर, सुफर, सफुर, सिफिर, सुफिर, सिफुर, सुफुर असे अनेक उच्चार होतील. मराठी विशेषनामे लिहिताना ही अडचण फार येऊ लागल्यामुळे दरबारी जाहीरनामे, निवाडे, दानपत्रे वगैरे लिहिताना वर फारशी आणि खाली मराठी भाषेचा उपयोग होऊ लागला. मराठीच्या देवनागरी लिपीचे फारशीहून जास्त असणारे श्रेष्ठत्व अनुभवास आले व दरबारी लिहिण्यातही मराठीचा प्रवेश झाला. त्यामुळे तिच्यात पुष्कळ फारशी शब्द शिरले, हे खरे; परंतु एक फायदाही झाला. एकीकडे कोपर्‍यात कुजत पडण्याऐवजी केव्हातरी ऊर्जित होण्याची शक्यता तिच्यात कायम राहिली. मराठ्यांनी सतराव्या शतकात स्वराज्य स्थापिले व सर्वत्र मराठीत लिहिणे सुरू केले, त्यावेळी दरबारातील सर्व कामकाज मराठीत लिहिता येण्यास अडचण पडली नाही, कारण सर्व दरबारी शब्द व पद्धती सतराव्या शतकाच्या सुमारास मराठीत रूढ झाल्या होत्या.’

– आनंद हर्डीकर

anand47.hardikar@gmail.com