आनंद हर्डीकर
‘प्लेटोचा शिष्य व शिकंदराचा (अलेक्झांडर द ग्रेट) गुरू आरिस्टॉटल म्हणजे इसवीसनापूर्वी चौथ्या शतकात होऊन गेलेला थोर ग्रीक विचारवंत. त्याच्यासारखी सर्वग्राही बुद्धी ईश्वराने दुसर्‍या कोणासही दिली नाही, असे म्हणतात. तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यनीतिशास्त्र, प्राणिशास्त्र, अध्यात्मविद्या इत्यादींचा मूळ उत्पादक हा आहे. याची विचार करण्याची पद्धत ऐतिहासिक असून व्यापक होती’… या शब्दांमध्ये राजवाड्यांनी आणखी एका ग्रंथकाराची ओळख करून दिली होती. विशेष म्हणजे आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या आणि राजाने कसे चालावे, याचे मार्गदर्शन करणार्‍या ‘शुक्रनीति’, ‘पंचतंत्र’, ‘हितोपदेश’, ‘कामंदक’ वगैरे संस्कृत ग्रंथांची आरिस्टॉटलच्या राज्यनीतिपर लेखनाशी तुलना करून त्यांनी असे स्पष्ट म्हटले होते की, ‘हे सगळे केवळ शिष्टाईवरील ग्रंथ आहेत; परंतु त्यांना शास्त्र ही पदवी शोभत नाही. राज्यनीतीचा (खरा) अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी प्लेटोचे ‘सुराज्य’ (‘रिपब्लिक’), आरिस्टॉटलची ‘राज्यनीति’, मोंटस्कूचे ‘मानवधर्मसार’ इत्यादी ग्रंथ वाचावेत.’ या सर्व ग्रंथांचे मराठी भाषांतर आपल्या मासिकातून प्रकाशित करण्याचा इरादासुद्धा राजवाड्यांनी पाठोपाठ व्यक्त केला होता.

जॉन लॉक (१६३२-१७०४) हा आणखी एक असाच ग्रंथकार. ‘राजा म्हणजे विष्णूचा अवतार’, अशा पारंपरिक प्रतिपादनाविरुद्ध ‘राज्यनीति’ लिहिणारा ब्रिटिश विचारवंत. तो का महत्त्वाचा, तर ‘जुलमाने पीडिलेल्या प्रजेला आपल्यावरील राजसत्ता बदलण्याचा अधिकार आहे’, असे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. ‘धर्मस्वातंत्र्य’ व ‘मानवी बुद्धी’ हे त्याचे अन्य ग्रंथही महत्त्वाचे असल्याचे राजवाड्यांनी म्हटले होते.

त्यांच्या पसंतीला उतरलेला एडवर्ड गिबन (१७३७-१७९४) हा इंग्रज ग्रंथकार म्हणजे ‘रोमन साम्राज्याच्या र्‍हासाचा व नाशाचा’ इतिहास लिहिणारा स्वभाषाप्रेमी विचारवंत होता. ‘ऑक्सफर्ड येथे शिकत असताना त्याने क्याथोलिक पंथाचा स्वीकार केला म्हणून त्याला ते विद्यालय सोडावे लागले होते’, हा त्याच्या आयुष्यातला बारकावा नेमका टिपून राजवाड्यांनी तत्कालीन इंग्लंडमध्ये अँग्लिकन चर्चचा कसा एकछत्री प्रभाव अस्तित्वात होता, इकडे लक्ष वेधले होते आणि पाठोपाठ गिबनच्या ग्रंथलेखनाबद्दलची महत्त्वाची माहितीही दिली होती.

‘इसवीसनापूर्वी ७५३ व्या वर्षी रोम शहर शम्यूलसाने स्थापन केले. पुढे ५०९ व्या वर्षी ते शहर प्रजासत्ताक झाले. सरासरी  ५०० वर्षे तसेच राहून जगप्रसिद्ध सीझरच्या मृत्यूनंतर आक्टोविअस या त्याच्या पुतण्याने ते एकसत्ताक केेले. इसवीसनानंतर १८० वर्षेपर्यंत रोमन पादशाहीची ऐन भरभराट होती. त्यापुढे त्याच्या र्‍हासाला सुरुवात झाली. पुढे लवकरच पादशाहीचे पाश्चिमात्य व पौर्वात्य असे दोन विभाग झाले… अखेरीस १४५३ च्या २९ मे या तारखेस तुर्क लोकांचा सुलतान महंमद याच्या हातून या पादशाहीचा समूळ उच्छेद झाला…’

असा रोमन साम्राज्याचा इतिहास राजवाड्यांनी थोडक्यात सांगितला होता आणि त्याचबरोबर ही माहिती दिली होती की, गिबन एकदा रोमला गेला असताना त्या शहराच्या र्‍हासाचा व नाशाचा इतिहास लिहावा, असे त्याच्या मनात आले आणि पुढे सुमारे तीस वर्षे अभ्यास केल्यानंतर त्याने तो प्रचंड मोठ्या कालखंडाचा (इ.स. १८०-१४५३) इतिहास सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. शेवटी ‘तो ग्रंथ आपल्या सध्याच्या स्थितीत फार उपयोगाचा आहे’, हा त्यांनी व्यक्त केलेला अभिप्राय खूप बोलका होता.

याशिवाय ‘पुरातन पालस्तेन (पॅलेस्टाइन), अथेन्स (ग्रीस), इराण, कार्थेज इत्यादिकांच्या र्‍हासाचा इतिहास व अर्वाचीन ग्रीस, इटली, दक्षिण व उत्तर अमेरिका, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, बल्गेरिया इत्यादींच्या पुनरुज्जीवनाचाही इतिहास अत्यंत अभ्यसनीय आहे. तोही सामथ्र्यानुरूप देण्याचा आमचा विचार आहे’, असा मनोदयही राजवाड्यांनी ‘उपोद्घाता’च्या शेवटी व्यक्त केला होता.

केवढा मोठा जागतिक इतिहासाचा पट राजवाडे आपल्या वाचकांसमोर मांडू पाहत होते! त्यामागचा हेतू हाच होता की, कधी काळी वैभवाच्या शिखरावर नांदणारा स्वदेश गुलामगिरीच्या खाईत का व कसा लोटला गेला, हे समाजाला समजावे आणि उत्थानाचा मार्गही गवसावा… त्या हेतूने त्यांच्या त्या मासिकाने कुठवर मजल मारली, हे पुढील लेखांकात.

anand47.hardikar@gmail.com