ऐतिहासिक साधनांच्या पहिल्या खंडाची छपाई पूर्ण होऊन प्रकाशन व्हायला वेळ लागणार आहे, याची कल्पना आल्यापासून वि. का. राजवाडे यांनी ऐतिहासिक साधनांची समांतर शोधमोहीम हाती घेतली. प्रारंभी ते वाईच्या आसपास फिरताना काकाराव पंडितांना बरोबर घेऊन जात, परंतु प्रत्येक वेळी तसे करणे शक्य होत नाही, असा अनुभव आल्यावर त्यांनी एकट्यानेच फिरायचे ठरवले. ते एकटेच मेणवलीला गेले. नाना फडणीसांच्या वाड्यात त्यांच्या कारकीर्दीबद्दलची जी काही कागदपत्रे असतील, ती पाहायला मिळावीत, या हेतूने त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला; पण त्यांना कुणीच दाद दिली नाही. तणतणत वाईत परतले, तेव्हा त्यांना समजले की, रामकृष्णपंत लेले यांच्या मदतीने ते काम होण्यासारखे आहे. मग त्यांनी लेल्यांना गाठले व त्यांच्या मध्यस्थीने त्यांना कशीबशी परवानगी मिळाली.

‘वाईपासून एका मैलावर पांडवगडाच्या पायथ्याशी, कृष्णा नदीच्या तीरावरच्या त्या सुंदर खेड्यातल्या वाड्यात पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत राजवाडे दप्तरे तपाशीत बसत. मी आणि गोपाळराव रास्ते त्यांना मदत करण्यासाठी अधूनमधून जात असू’, असे काकाराव पंडितांनी पुढे ‘राजवाडे तिलांजलि अंका’मधील आठवणींमध्ये लिहिले होेते, त्यावरून आपण कल्पना करू शकतो. खरोखरच मेणवलीचे ते दप्तर विस्तीर्ण व प्रचंड होते. ‘इतिहासाच्या भोक्त्यांची मनोकामना तृप्त करणारे दप्तर’ म्हणून राजवाड्यांनी १८९७ सालच्या ‘केसरी’मधील आपल्या लेखात त्याचे वर्णन केले होते. तसेच ‘मी शंभर वर्षे जगलो आणि या मेणवलीच्या दप्तर प्रकाशनाचे काम (आत्ता) सुरू केले, तर माझे सर्व आयुष्य खर्च झाले, तरी हे काम तडीस जाणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी त्या दप्तराबद्दलची आपली भावना व्यक्त केली होती.

राजवाडे एखादे दप्तर पाहण्यासाठी बसत, तेव्हा ते नेमके काय करत, हे इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे म्हणून ‘केसरी’मधील त्यांच्या त्या लेखामधील काही भाग इथे उद्धृत करावासा वाटतो. नीट जपून ठेवलेल्या त्या कागदपत्रांचे वर्णन करता करताच आपण केलेल्या कामाचीही नोंद राजवाड्यांनी त्या लेखात केली होती, ती अशी- ‘इ.स. १७७३ ते १८०० या कालखंडातील सर्व खटाटोपीसंबंधीची पत्रे या दप्तरात स्वर्गीच्या चित्रगुप्ताच्या दरबारातील पत्राप्रमाणे क्रमवार सापडतात. हे शंभर रुमाल सोडून आतमध्ये काय काय आहे, हे नुसते वरवर पाहण्यासाठी मला साधारणत: एक आठवडा लागला. पुढे महिनाभर मी त्या कागदपत्रांचे वर्गीकरण केले. एकंदर १६७ पुडकी झाली; प्रत्येक पुडक्यात सुमारे शंभरपासून तीनशेपर्यंत कागद आहेत… या पुडक्यांचे मी मुख्य चार भाग केले आहेत. पहिल्या भागाला दादासाहेब भाग म्हटले आहे. इ.स. १७७३ पासून म्हणजे नारायणरावांच्या मृत्यूपासून १७८४ पर्यंत म्हणजे दादासाहेबांच्या मृत्यूपर्यंतचा हा भाग फार महत्त्वाचा व नाना फडणीस यांची मुत्सद्देगिरी कसास लावणारा आहे. याच बारा वर्षांत नानांनी आपले सारे शत्रू पराजित करून टाकले… दुसरा भाग १७८४पासून १७८७पर्यंतचा प्राय: शांततेचा असून नानांसाठी थोडासा सुखावह व वैभवाचा ठरला… तिसरा भाग १७८७पासून म्हणजे टिपूशी लढाया सुरू झाल्यापासून १७९६पर्यंतचा म्हणजे सवाई माधवरावांच्या मृत्यूपर्यंतचा आहे. या नऊ वर्षांत टिपूशी दोन लढाया झाल्या, तर निजामाशी एक. त्या लढायांबद्दलची सविस्तर माहिती या दप्तरात उपलब्ध आहे. १७९६ पासून १८००पर्यंतच्या चवथ्या भागात अगदीच त्रोटक माहिती आहे. बहुधा या भागातली काही कागदपत्रे कुणी तरी हलवली असावीत.’

‘खरा मित्र कोण, शत्रू कोण, याचा उलगडा या पत्रांत केलेला आढळतो, त्यावेळच्या बहुतेक गुप्त गोष्टी या दप्तरात स्पष्टपणे वाचता येण्यासारख्या आहेत’, असा निर्वाळा देऊन राजवाड्यांनी पुढे त्या लेखात म्हटले होते, ‘मोरोबादादा, सखाराम हरी, चिंतो विठ्ठल, सखाराम बापू, हरिपंत फडके, महादजी शिंदे, तुकोजी होळकर, अलिबहाद्दर, फत्तेसिंग गायकवाड, परशुरामभाऊ पटवर्धन, राघोबादादा, आनंदीबाई, हैदरअली, रुक्नउद्दौवला, साबाजी भोसले, मुधोजी भोसले, आंग्रे, धुळप… मुंबई-मद्रास-कलकत्ता येथील कौन्सिले, डच-जर्मन-फ्रेंच व पोर्तुगीज लोक… सारांश, हिंदुस्थानात त्या वेळी मातब्बर म्हणून गणल्या गेलेल्या सर्वांची हवी तेवढी माहिती या दप्तरात आहे. एकंदरीत ते बिनमोल आहे. ते सबंध प्रसिद्ध केल्याविना नानांचा खरा मोठेपणा कळणार नाही.’