कोल्हापूरहून १९०३ साली प्रकाशित केलेल्या ‘इतिहासाची साधने’ या ग्रंथमालिकेतील आठव्या खंडाला राजवाड्यांनी लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना अनेक वैशिष्ट्यांमुळे दखलपात्र ठरली. या खंडामध्ये शिवाजीची एकूण ३६ पत्रे समाविष्ट झाल्यामुळे तर तो खंड विशेष महत्त्वाचा होताच, पण त्याशिवायही इतरही काही बाबी नावीन्यपूर्ण माहितीमुळे चर्चाविषय ठरल्या. तशी पहिली बाब अक्षरांसंंबंधीची होती. ‘मोडी अक्षर प्रथम इ.स. १२६० पासून १३०९ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणार्या महादेव व रामदेव जाधव यांच्या कारकीर्दीत दफ्तरदारीचे काम करणार्या हेमाडपंताने सुरू केले, अशी फारा दिवसांपासून चालत आलेली ऐतिहासिक कथा आहे व ती खरी आहे, असे दिसते’, हा अभिप्राय व्यक्त करून राजवाड्यांनी पुढे पाच पानांमध्ये मांडलेली कारणमीमांसा अत्यंत रंजक होती.
‘इ.स. १२६० सालापूर्वीचे एकूणएक लेख शिळांवर, ताम्रपटांवर किंवा ताडपत्रांवर लिहिलेले असत. या तिन्ही जिनसांवर प्रत्येक अक्षर हात थांबवल्यावाचून लिहिता येत नाही. अर्थात एका हातासरशी दहापाच अक्षरे जलद लिहिण्याची सोय आपल्या देशांत बाराव्या शतकापर्यंत माहीत होती, असे दिसत नाही. त्यावेळी व्यवहारातील सामान्य पत्रेही ताडपत्रांवर, भूर्जपत्रांवर, कातड्यावर व बर्याच वेळा कापडावर लिहून पाठवीत असत, असे विधान करण्यास हवा तितका आधार आहे’, असे राजवाड्यांनी म्हटले आणि त्यांच्याजवळ असलेल्या ‘पर्शरामोपदेश’ नावाच्या यंत्रग्रंथातील श्लोकांची उद्धरणेही दिली. ‘भूपालवल्लभ’ नामक ग्रंथाचा पर्शराम पंडिताने केेलेला तो सारभूत ग्रंथ इ.स. १३५६ मध्ये लिहिला गेला असावा. त्यात भूर्जपत्रे व कापडाचे तुकडे यावर यंत्रे लिहावीत, असे अनेकदा म्हटलेले आढळते.
‘परंतु या सुमारास म्हणजे १३२६च्या पन्नाससाठ वर्षे अगोदर लिहिण्याकरता दुसरा एक जिन्नस प्रचारात येऊ लागला. तो जिन्नस कागद होय’, ही माहिती देऊन राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘या कागदावर लिहिण्यासंबंधाने ज्ञानेश्वरीत काही दूरचे उल्लेख आहेत… ‘हे बहू असो पंडितू। धरूनु बालकाचा हातू। वोळी लेहे वेगवंतू। आपणचि।।’ या ओवीत पंतोजी जलदीने वोळी लिहितो, असे विधान केले आहे. ताम्रपट, भूर्जपत्रे, ताडपत्रे किंवा वस्त्रपट यांवर जलदीने वोळी लिहिता येणार नाहीत, हे उघड आहे. तेव्हा जलदीने लिहिता येण्यासारखा ज्ञानेश्वरीला माहीत असलेला जिन्नस म्हटला म्हणजे कागदच होय, यात संशय नाही. या नवीन जिन्नसाकडे लोकांची प्रवृत्ति बरीच पडत चालली होती. ती हेमाडपंताच्याही पूर्वी पाचपंचवीस वर्षे होत होती…’
‘अशा वेळी दफ्तरावरील मुख्याधिकारी जो हेमाडपंत त्याने मोडी लिपी महाराष्ट्रात नव्याने सुरू केली. या मोडी लिपीचाही उल्लेख ज्ञानेश्वरांनी त्या ओवीत केलेला दिसतो. पंतोजी अक्षर वेगाने लिहितो, या वाक्यातील वेगाने हे पद विचारणीय आहे. बाळबोध अक्षर वेगाने लिहिता येत नाही, तेव्हा त्यासंंबंधाने वेगवंत हा शब्द योजण्यात काही विशेष अर्थ नव्हता. तो मोडी अक्षरासंबंधाने मात्र सार्थ आहे…’ हे अनुमान मांडल्यानंतर राजवाड्यांनी ऐतिहासिक कालक्रमही मांडून दाखवला. त्यांनी लिहिले, ‘ज्ञानेश्वरीपूर्वी मोडी अक्षर प्रचारात आले होते. ज्ञानेश्वरी लिहिली जाण्यापूर्वी तीसचाळीस वर्षे इ.स. १२६० पासून पुढे हेमाद्रि जाधवांचा दफ्तरदार होता. त्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुसुलमानांचे राज्य सुरू होऊन ऐंशीनव्वद वर्षे झाली होती. सिंघण राजाने विंध्याद्रीपलीकडील प्रांत जिंकले होते. तेव्हा मुसलमानांची ओळख होऊन त्यांची कागद करण्याची कला महाराष्ट्रात सुरू झाली व ती सुरू झाल्यावर मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीला सुचली. त्याने ती मुसुलमानांच्या शिकस्ता नामक लेखनपद्धतीवरून घेतली. फारशीत शिकस्तन् या क्रियापदाचा अर्थ मोडणे असा होतो. जलद लिहिण्यात खडे अक्षर मोडून लिहिण्याच्या वळणाला फारशीत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे. या अर्थाचा वाचक शब्द संस्कृतमध्ये किंवा महाराष्ट्रीत नाही. हेमाडपंताने शिकस्ता या फारशी शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मराठी अक्षरलेखनाच्या पद्धतीला मोडी हा शब्द नव्याने लागू केला.’
