‘‘जलक्रीडा’, ‘पुष्पशय्यारिरंसा’, ‘नखशिखावर्णनं’, ‘षड्ऋतुवर्णनं’ आणि ‘चंद्रोदयसूर्यास्तमयवर्णनं’ या नावांच्या पहिल्या पाच उल्लासांमध्ये म्हणजे भागांमध्ये जयराम पिंड्येने ओज, माधुर्य वगैरे काव्यपरिपोषासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडवीत राधाकृष्णांच्या विलासाचे संस्कृत भाषेत रीतसर वर्णन केले आहे. या चंपूकाव्याच्या प्रस्तावनेमध्ये ‘काव्यप्रकाश’, ‘चंद्रालोक’, ‘काव्यकल्पलता’, ‘काव्यादर्श’ इत्यादी अलंकारग्रंथांचा उल्लेख तर केलेला आहे, परंतु अलंकारशास्त्र पढून कवित्वशक्ती येत नसून मूळचीच प्रतिभा कवीच्या ठायी ईश्वरानुग्रहप्राप्त असावी लागते, असेही म्हटले आहे.

या दृष्टीने पाहता जयरामचा हा प्रयत्न बरा साधला आहे’, असा आपला अभिप्राय राजवाड्यांनी नोंदवला आणि पुढे आणखी खुलासा करीत लिहिले, ‘या काव्यातील आपल्यासाठी खरा इतिहासभाग सहाव्या उल्लासापासून लागतो. तेथून ग्रंथसमाप्तीपर्यंतच्या सबंध भागांत राधाकृष्णांचे नाव नाही, अस्पष्ट उल्लेखसुद्धा नाही; तत्रापि त्या भागांची गणनाहि कवि ‘राधामाधवविलासचंपू’तच करतो. असे करण्यात कवीचा मतलब कदाचित असा असावा की, प्रामुख्याने ग्रंथ मनुष्यस्तुतिपर समजला न जाता ईश्वरस्तुतिपर समजला जावा व मनुष्यस्तुतिपर जो दोनतृतीयांश भाग आहे, तोहि शाहनृपतिरूप कृष्णाच्याच स्तुतिपर असल्याचा समज हवा. ‘नाविष्णु: पृथिवीपति:’ अशी ग्रंथकाराची परंपरागत श्रद्धा होती, तेव्हा राधाकृष्णविलासाला व शहानरेशप्रशंसेला एकाच ग्रंथात कवीने समाविष्ट केले, हेहि त्याच्या मते योग्यच झाले’…

जयरामने शहाजीराजांची भेट कशी मिळवली व पहिल्या भेटीत काय घडले, याचा सविस्तर वृत्तांत राजवाड्यांनी कथन केला. त्यांनी लिहिले, ‘तुळजाभवानीचे व पांडुरंगाचे ध्यान करून कवी महाराष्ट्रदेशातून कर्नाटकात शाहराजाच्या राजधानीत येऊन ब्रह्मविद्यानिष्णात शिवराय गोस्वामी नावाच्या दरबारी विद्वानास भेटला व महाराजांची भेट घेण्याचा आपला मनोदय त्यास निवेदन करता झाला. शिवरायाने ताबडतोब ती गोष्ट राजाच्या कानावर घातली. राजाने मान्यता दर्शवून शिवराय वेदान्ती व कथाकल्पक वीरेश्वर वैद्य यांना कवीस सामोरे जाऊन दरबारात घेऊन येण्यास आज्ञा केली.’

‘शहाजीच्या दरबारी प्रवेश केल्यावर जयरामाने बारा नारळ राजापुढे ठेवले. ‘हे एवढे नारळ आमच्यापुढे का ठेवलेत?’ असे राजाने कौतुकाने विचारिले असता कवीने उत्तर दिले की, ‘संस्कृत, प्राकृत, गोपाचलीय ऊर्फ ग्वालेरी ऊर्फ व्रज (ग्वालिरच्या किल्ल्याला गोपालचल, गोपालगिरि म्हणत), गुर्जर, वक्तर, ढुंढार, पंजाब, हिंदुस्थान, बागुल, यावनी, दाक्षिणात्य-यावनी व कर्नाटक अशा बारा भाषांत काव्यरचना करीत असतो, हे दर्शवण्याकरिता बारा नारळ ठेवले.’

राजाने आज्ञा केली की, ‘तुमची काव्यरीति कशी काय आहे, त्याचा मासला म्हणून काही काव्य रचिले असल्यास पढा.’ तेव्हा हा राधामाधवविलासचंपू कवीने चतुर गायकाकडून राजापुढे सुस्वर गावविला. त्याने राजा सुप्रसन्न होऊन म्हणाला, ‘हे काव्य ठीक आहे, परंतु कवीच्या कवित्वशक्तीची परीक्षा समस्यापूरणात होत असते, सबब, पंडितहो! कवीला आपण सर्व जण एकेक समस्या घालू व तो तिची पूर्ती कशी करतो ते पाहू’, असे म्हणून शहाजीराजाने ‘शतचंद्रं नभस्तलं’ हा संस्कृत चरण समस्यार्थ पढला. त्या समस्येचे पूरण झाल्यावर दरबारातील इतर पंधरा जणांनीही जयरामला संस्कृत समस्या घातल्या. (१५ जणांची नावेही नमूद आहेत.) नंतर प्राकृत भाषाकवींनीहि समस्या घातल्या. त्यांची समाधानपूर्वक पूर्ति झालेली पाहून राजा खूष झाला व त्याने उद्गार काढिले की, आपली कीर्ति गाण्याला हा कवि योग्य आहे, सबब याला आश्रय देऊन आपल्या दरबारी ठेवावा’…

वृत्तांतकथनाचा पहिला टप्पा संपवताना राजवाड्यांनी ‘राजदर्शनसमस्यापूरण’ या सहाव्या उल्लासातील समारोपाची हकीकत सांगितली. ‘राजाने रघुनाथपंत हणमंते यास आज्ञा केली की कविवराची यथायोग्य बरदास्त राखावी.’ पुढे कचेरी बरखास्त झाल्यावर कवीचे नावगाव वगैरे विचारपूस राजाने केली. तेव्हा रघुनाथपंतांनी सांगितले की हा सप्तशृंगीकर गंभीररावाचा मुलगा आहे. ते ऐकून शहाजीराजा म्हणाला, ‘हा दूरचा नाही, आपलाच आहे’ आणि मग त्याने कवीस निरोप दिला…’

anand47.hardikar@gmail.com