राजवाड्यांच्या काही स्फुट लेखांचा परिचय करून घेतल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या इतिहाससंशोधनाच्या कामगिरीसंदर्भात मैलाचा दगड ठरलेल्या महत्त्वाच्या पुस्तकाचा, विशेषत: त्या पुस्तकाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावनेचा आणि त्या प्रस्तावनेतून केल्या गेलेल्या शहाजी-शिवाजी पितापुत्रांच्या ऐतिहासिक कार्याच्या मांडणीचा सविस्तर परिचय करून घ्यायचा आहे. हा ग्रंथ आपल्याला कसा मिळाला, किंबहुना आपण तो कसा शोधून काढला, याबद्दल राजवाड्यांनी त्या प्रस्तावनेत प्रारंभीच दिलेली माहिती खूप बोलकी आहे. त्यांच्या शोधकार्याच्या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन तर त्या माहितीतून होतेच, परंतु आपल्या समाजात ऐतिहासिक साधनांच्या जतन-संवर्धनाकडे किती पराकोटीचे दुर्लक्ष होत होते, याचे विदारक दर्शनही होते.
‘राधामाधवविलासचंपू’ नावाचा तो ग्रंथ राजवाड्यांना ‘चिंचवड येथे विष्णुपंत रबडे यांच्या घरी तिसर्या मजल्यावरील पोथ्यांच्या व कागदपत्रांच्या अस्ताव्यस्त गठाळ्यात कुजत पडलेला आढळला.’ हे वृत्त सांगून त्यांनी पुढे लिहिले, ‘सहा महिन्यांपूर्वी रबड्यांच्या घरी गेलो असता, शेकडो संस्कृत व मराठी पोथ्या तिसर्या मजल्यावरील कौलारू छपराखाली भिजून भाकरीप्रमाणे घट्ट झालेल्या व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेल्या पाहिल्या. त्यांतील पाचपन्नास लहानमोठे ग्रंथ निवडून व झाडूनपुसून एकीकडे बाजूला काढले, त्यांत ही पोथी होती.’
आणि नंतर पोथीचे अगदी चित्रकथी शैलीत बारकाईने वर्णन करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘मूलत: पोथीची एकंदर पाने ५६ होती. पैकी ७वे पान गहाळ होऊन, सध्या ५५ पाने शाबूत आहेत. पहिल्या, दुसर्या व अठ्ठाविसाव्या पानांवर छिद्रे पडून काही अक्षरे फाटून गेली आहेत. बाकी ग्रंथ एथून तिथून सुरक्षिताक्षर आहे. पोथीचा कागद जुना जुनरी असून तिची लांबी साडेनऊ इंच व रुंदी चार इंच भरेल. दर पृष्ठावर नऊपासून बारापर्यंत ओळी असून प्रत्येक ओळीत चाळीसपासून पंचेचाळीसपर्यंत अक्षरे आहेत. अक्षर अडीचशे वर्षांचे मराठी वळणाचे बाळबोध आहे. पोथी सबंध एका हाताने, एकाच शाईने व निदान तीन लहानमोठ्या टोकांच्या लेखण्यांनी लिहिलेली आहे. फक्त शेवटल्या पानांवरील समाप्तीच्या पाच रेघांनंतर ‘इदं पुस्तकं लक्ष्मणसूनोर्मनोहराख्यपौर्णिकस्य’ या वाक्याची शाई, वळण व टाक अशी तिन्ही निराळी आहेत. मनोहर लक्ष्मण पुराणिक याने हे वाक्य स्वत: लिहिलेले आहे व ते शेवटच्या पानाच्या खाली समासावर कोठेतरी एका बाजूस लिहिले आहे.’
ऐतिहासिक साधनांचा अभ्यास कसा करावा, हे जाणून घेऊ इच्छिणार्यांनी ही प्रस्तावना आणि इतर लेखनही बारकाईने का वाचावे, हे त्यांच्या त्या प्रस्तावनेतल्या त्यापुढच्या मजकुरावर स्पष्ट होईल. पोथीच्या ५५ पानांमधल्या अक्षरापेक्षा शेवटच्या पानावर खाली समासात लिहिलेल्या मजकुराचे अक्षर वेगळे आहे, हे सांगून न थांबता राजवाड्यांच्या अन्वेषक नजरेने त्या वेगळेपणाचा अन्वयार्थ उलगडूनही दाखवला. त्यांनी मनोहर पुराणिक हा त्या पोथीचा मूळ लेखक नाही, हे त्या वेगळ्या अक्षरातील नोंदीवरून बरोबर ताडले व त्याबद्दलचा तर्कशुद्ध युक्तिवाद मांडत लिहिले, ‘पोथी मूळ लिहिली गेली, त्याचवेळी हे वाक्य लिहिले गेले असते, तर शेवटच्या ओळीनंतर ओळीला जोडून जेणेकरून ओळींच्या संचाला विद्रूपता न येईल अशा तर्हेने लिहिले गेले असते. परंतु ज्याअर्थी ओळींच्या संचाला विद्रूपता आली आहे व ज्याअर्थी हे स्वामित्व दर्शवणारे वाक्य ओळ सोडून कोठेतरी तिरके लिहिले आहे, त्याअर्थी उघडच होते की मनोहर पुराणिकाच्या ताब्यात ही पोथी कालांतराने जेव्हा आली, तेव्हा त्याने हे वाक्य आपल्या हाताने लिहून ठेवले… शिवाय पोथीच्या पहिल्या पानाला जेथे छिद्र पडून अक्षरे गहाळ झाली आहेत, तेथे मनोहर पुराणिकाने सुडाच्या चौकोनी चकतीचे पानाच्या पाठीमागून काळजीपूर्वक ठिगळ चिकटवले आहे व पोथी जास्त न फाटेल अशी तरतूद केली आहे. अर्थात मनोहर पुराणिकाच्या हातात ही पोथी जेव्हा आली, तेव्हाच ती जीर्ण होऊन छिद्र पडलेली अशी आली, हे स्पष्ट आहे!’
anand47.hardikar@gmail.com
