राजवाड्यांनी ज्या काही अज्ञात कवींच्या रचना कमीअधिक प्रमाणात उजेडात आणण्याचे काम केले, त्यांच्यापैकी रामकवीच्या ‘प्रदोषव्रतमाहात्मा’चा उल्लेख मागे एका लेखांकात वेगळ्या संदर्भात येऊन गेला आहे. चोंभा कवीच्या कालनिश्चितीसाठी या काव्यातील त्याच्या ज्ञानेश्वरादिकांबरोबरच्या उल्लेखाचा राजवाड्यांनी कसा वापर केला, हे त्या लेखांकात नोंदवले होते. तथापि या काव्याची स्वतंत्र दखल घेणेही आवश्यक आहे.

राजवाड्यांनी ‘रामकविकृत प्रदोषव्रतमाहात्मय’ या शीर्षकाच्या १९१४ साली भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्तात प्रकाशित केलेल्या लेखात म्हटले होते, ‘एकनाथानंतर मुक्तेश्वर, तुकाराम, रामदास, वामनप्रभृति थोर संतकवी झाले, त्याच सुमारास होऊन गेलेल्या रामकवीची गणना मात्र संतांमध्ये केलेली कोठे आढळत नाही. तेव्हा कवी या एकाच नात्याने जे दोनचार ग्रंथकार शंभर वर्षांपाठीमागे महाराष्ट्रात उदयास आले, त्यांच्यामध्ये याची गणना होते.

‘प्रदोषव्रतमाहात्म्य’ हे याचे एकच काव्य सध्या सापडले आहे. (याची प्रकरणे एकंदर २३ आहेत आणि ओवीसंख्या ३७३३ आहे.) कर्‍हाड येथील काशीनाथ देव यांच्या संग्रहात हे काव्य होते. इतरत्र महाराष्ट्रात या कवीची काव्ये ज्या अर्थी गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मला सापडली नाहीत, त्याअर्थी हा कवी प्रांतात इतरत्र फारसा माहीत नसावासा दिसतो, तसेच हा कवी कर्‍हाडास किंवा कर्‍हाडच्या आसपास कोठे तरी कृष्णातीरी राहात असावा, असेही अनुमान कर्‍हाडास याचा ग्रंथ सापडला, या बाबीवरून सकृद्दर्शनी करण्याकडे प्रवृत्ती होते…’

राजवाडे पोथी अर्धीमुर्धी असली किंवा संपूर्ण असली, तरी ती ते वाचून काढत व आपल्या टिपणांमधून त्याबद्दलची निरीक्षणेही नोंदवत. ‘प्रदोषव्रतमाहात्म्या’बद्दलचे आपले मत नोंदवताना त्यांनी लिहिले की, ‘नावावरून प्रथमदर्शनी असा समज होण्याचा संभव आहे की हे प्रकरण पौराणिक कथाभागाचे एखादे ओवीबद्ध सामान्य भारूड असावे, परंतु तसा प्रकार नाही.

हे प्रकरण मराठीत जी अनेक उत्तम काव्ये आहेत, त्यांत मोडण्यासारखे आहे… रामकवीच्या या काव्यातून उत्कृष्ट निवडक वेचे देण्याचे हे स्थळ नव्हे, परंतु एवढे सांगितल्यावाचून राहवत नाही की सृष्टिवर्णने व व्यवहारवर्णने या काव्यात फारच कुशलतेने केलेली आहेत, नवरसांचे साधन कवीस आहे…’ एवढी प्रशंसा करून न थांबता राजवाड्यांनी पुढे असेही लिहिले की, ‘भारत इतिहास संशोधक मंडळास मी अशी शिफारस करण्याची परवानगी घेतो की, हे काव्य मंडळाने प्रसिद्ध केल्यास एका उत्तम काव्याचा जीर्णोद्धार केल्याचे श्रेय त्यास मिळेल…’

‘नामदेव व विष्णुदास नामा हे दोघे जातीने शिंपी पडल्यामुळे व दोघेही विठ्ठलभक्त ऊर्फ विष्णुदास पडल्यामुळे त्या दोघांचेही अभंग एकाच व्यक्तीचे समजून छापले गेले आहेत’, ही (इतरांकडून घडलेली) गफलत लक्षात आल्यावर राजवाड्यांनी तिच्याबद्दलचा खुलासा केला, तो असा… ‘आद्याक्षरांत मंत्र गोवायची सवय मोरोपंताला फार होती, पण त्याच्याहीपूर्वी दोनशे वर्षे विष्णुदास नाम्यालाही हा छंद सूक्ष्मपणे होता, असे दिसते. न अक्षर आद्यस्थानी आणताना नामदेवाचा उल्लेख या विष्णुदास नाम्याने ‘नामदेवाचे पवित्र नाम उच्चारी आखंडीत’ असा केला आहे.

एकनाथकालीन विष्णुदास नामा ज्ञानेश्वरकालीन नामदेवाहून निराळा व दोनअडीचशे वर्षे अलीकडला आहे, या विधानाला खुद्द विष्णुदास नाम्याचीच ही साक्ष उपलब्ध झाली आहे आणि तोही नामदेवाप्रमाणेच जातीने शिंपीच होता, याचे प्रमाण कर्‍हाड येथील एका बाडातील अभंगात सापडले आहे.

‘अमंगळु भूमीसी। उगवल्या तुळसी। अपवित्र तयासी। म्हणू नये॥

कागा विष्ठामधी। उगवला पिंपळु। तयासी अमंगळु। म्हणू नये॥

लोखंडाचा वीळा। परिसा लाविला। मागलिया मोला। मांगू नये॥

दासीचिया पुत्रा। राज्यपट आला। मागली उपमा। देऊ नये॥

विष्णुदास नामा। विठ्ठली मिळाला। सिंपी सिंपी त्याला। म्हणू नये॥’…

या विष्णुदास नाम्याची बावनाक्षरी कर्‍हाडास सापडली, तेव्हा हे ध्यानात आले!’

anand47.hardikar@gmail.com