यमयमी संवादात्मक सूक्ताचा ऊहापोह करण्यापूर्वी राजवाड्यांनी अगदी थोडक्यात स्पष्टीकरण दिले की, ‘यम आणि यमी अशी दोन सोदर बहीणभावंडे ऋग्वेदाहूनही प्राचीन काळी आर्षसमाजात होऊन गेली. यम आणि यमी ही व्यक्तिनामे यमाजी व यमूबाई, यमाबाई या रूपाने अद्यापही आपल्या म्हणजे ऋषींचे वंशज जे आपण त्यांच्या समाजात सर्रास प्रचारात आहेत’ आणि नंतर मग त्यांनी तो संवाद उद्धृत करत लिहिले, ‘यमी आपल्या सोदर भावाला म्हणाली की तू माझ्याशी पतिभावाने वाग व आपल्या बापाचा नातू माझ्या ठायी उत्पन्न कर… ओचित् सखायं सख्या ववृत्यां, पितु र्नपातं आदधीत। यमीचे हे म्हणणे यमाला रुचले नाही, तथापि यमी यमाला आग्रहाने म्हणाली की, जायेत पत्ये तन्वं रिरिच्याम विचिद गृहेव रथ्येव चक्रा। इतकेच बोलून यमी गप्प बसली नाही. ती यमाला आणीक असे म्हणाली की, भाऊ असताना बहीण अनाथ राहिली व दु:ख भोगीत पडली, तो भ्राता कसला?

किभ्रताऽसद्यदानार्थ भवति। किमु स्वसा यन्निर्ऋति अर्नि गच्छात्।।

या उद्धरणानंतर संस्कृत व्याकरणाच्या आधारे महत्त्वाच्या शब्दांची रूपे व त्यांचे अर्थ स्पष्ट करत राजवाड्यांनी लिहिले, ‘येथे भ्राता लक्ष्य आहे. भ्रातृ व भर्तृ हे दोन्ही शब्द भृ या भरणे, पालन करणे या अर्थाच्या धातूपासून निघालेले असून दोन्ही शब्दांचा अर्थ पालन करणारा, रक्षण करणारा, भरण करणारा असा आहे. पैकी भ्रातृ हे रूप भर्तृ या रूपाहून जुनाट आहे. बहिणीचे म्हणजे भगिनीचे पतिभावाने भाऊ भरण करीत, सबब भावांना भ्रातृ हे नाव अतिप्राचीन आर्षकाली पडलेले आहे. स्वसृ हा शब्दही हाच इतिहास सांगतो. स्वत:च्या कुळातील भावांना जी अनुसरते ती स्वसृ. ती भ्रातृशी शरीरसंबंध ठेवी व त्या संबंधांमुळे ती सनाथ म्हणजे सुसंरक्षित होई, हा मूळ इतिहास. तात्पर्य, सोदर बहीणभावांचा शरीरसंबंध अतिप्राचीन आर्षकाली होत असे, या (महा)भारतीय ऐतिहासिक विधानाला ऋग्वेदातील वचनांचा दुजोरा मिळतो…’

हा दुहेरी पुरावा मांडल्यानंतर राजवाड्यांनी ह्या अतिप्राचीन आर्ष चालीसंबंधी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. तो असा की, ‘सख्खे, सोदर, चुलत, चुलतापुतणी हे शब्द आणि शरीरसंबंध इतिहासकार जे व्यास व ऋग्वेदकार जे मंत्रकर्ते ऋषी त्यांच्या काळचे आहेत, मूळ ब्रह्मदेव आणि दक्षप्रजापती यांच्या अतिप्राचीन काळचे नाहीत. ब्रह्म व दक्ष यांच्या काली भाऊ, बहीण, चुलता, पुतणी हे संबंध समाजात उद्भवले नव्हते, अर्थात् माहीत नव्हते. फक्त स्त्री आणि पुरुष, दोन संबंध तेवढे समाजाच्या लक्षात आलेले होते… असाही एक प्राचीन काळ होता की, ज्या काळी हा भेद भिन्नलिंगदर्शक शब्दांनी दर्शविण्याची क्लृप्ती आर्यांना सुचली नव्हती. सध्या आपण एवढेच शोधण्याचा व साधार सांगण्याचा यत्न करीत आहोत की, प्राचीन आर्यकाली बहीणभावांचा पतिपत्नीभावाने व्यवहार चालत असे.’

बहीणभावांमध्ये जसे शरीरसंबंध होत असत, तसेच पिता व कन्या ह्यांच्यातही ते होत, हा आणखी धक्कादायक मुद्दा मांडताना राजवाड्यांनी सोदाहरण विवेचन केले. त्यांनी लिहिले, ‘हरिवंशाच्या दुसर्‍या अध्यायात वर्णन आहे की वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शतरूपा ही वयात आल्यावर आपला पिता जो वशिष्ठ त्याच्याशी पत्नीभावाने राहिली. तसेच ह्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात असे विधान केले आहे की, मनूने आपली मुलगी इला हिच्याशी शरीरसंबंध केला. त्याचप्रमाणे इतिहासाच्या (महाभारताच्या) सत्ताविसाव्या अध्यायात असे लिहिले आहे की, जन्हूची मुलगी जी जान्हवी गंगा हिने आपला बाप जन्हू यालाच आपला पती केले. ह्या तीन ऐतिहासिक उदाहरणांचा अर्थ असा की, बाप आणि त्याच्या पोटची मुलगी यांचा शरीरसंबंध अतिप्राचीन काली होत असे व तो तत्कालीन समाजमान्य असल्यामुळे निंद्य किंवा गर्ह्य मानला जात नसे…’