‘मराठ्यांनी दिल्ली घेतल्यापासून हाफीज रहिमतखान, अहमदखान बंगश, सादुल्लाखान, फजुल्लाखान वगैरे रोहिल्यांना अबदालीच्या (अहमदशहा अब्दाली) सामथ्र्याबद्दल संशय येऊ लागला व ते त्याच्यापासून विभक्त होण्याची खटपट करू लागले’, अशी सुरुवात करणार्या राजवाड्यांनी, बदललेल्या परिस्थितीचे मार्मिक वर्णन करून लिहिले, ‘खुद्द सुजाउद्दौल्यालाही आपण अबदालीला मिळालो, या गोष्टीचा खेद वाटू लागला. अबदालीने सुजाउद्दौल्यावर मारेकरी घातले व त्याच्यापाशी तो खर्चासाठी पैसा मागू लागला.
नजीबखानाने सुजाला अबदालीकडे आणला, त्यातील मुख्य हेतू सुजाकडून पैसे काढावयाचे, हाच होता. अबदालीने पैसे मागितल्यावर त्या तरुण व उल्लू माणसाला नजीबखानाच्या संधिसाधू खुनशीपणाचे व अबदालीच्या मतलबाचे इंगित कळले. तेव्हापासून त्याला अबदालीच्या संगतीचा अगदी वीट आला. आपली आई, सदाशिवरावभाऊ, मल्हारराव होळकर वगैरे मंडळींनी अबदालीला न मिळण्याविषयी आपल्याला सांगूनही आपण ऐकिले नाही, हा मूर्खपणा केला व नजीबखानासारख्या लबाड, लुच्चा माणसाच्या नादी लागून फसलो, असे त्यालाच वाटू लागले आणि तोही सदाशिवरावाशी सख्ख्याची बोलणे करू लागला. नजीबखानाच्या नादी लागून व्यर्थ संकटात मात्र सापडलो, असे अबदालीला वाटू लागले.
हिंदुस्थानची पातशाही मिळवून देण्याच्या नजीबखानाच्या गप्पांना भुलून आपण सर्वस्वी नाश करून घेण्याच्या पंथाला लागलो, असे त्याच्या प्रत्ययाला आले. सारांश, अबदालीची अगदी विपन्न स्थिती झाली होती’. राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘खरे पाहिले असता अबदालीला हिंदुस्थानात कायमचे राहावयाचे नव्हते. त्याचे हिताहित हिंदुस्थानात यत्किंचितही नसून त्याचे सर्व काही खैबर खिंडीच्या पश्चिमेकडे गुंतले होते. हिंदुस्थानवर स्वारी करून, दोन-चार महिने राहून, मिळेल ती लूट घेऊन विलायतेस निघून जाण्याचा त्याचा परिपाठ असे.
या खेपेला नजीबखानाच्या आग्रहाला मान देऊन तो हिंदुस्थानात राहिला; परंतु त्या राहण्यापासून फायदा नाही, हे त्याला दिवसेंदिवस जास्त अनुभवास येऊ लागले. त्याचे लोकही हिंदुस्थानात दहा महिने राहून कंटाळून गेले होते. काहींनी तर अफगाणिस्तानचा रस्तासुद्धा सुधारला. काही सदाशिवरावाच्या चिठ्ठ्या घेऊन गोविंदपंताकडे इटाव्याच्या बाजूला मराठ्यांना जाऊन मिळाले… येणेप्रमाणे स्वकीय व परकीय अशा दोन्ही लोकांनी त्याला सोडण्याचा क्रम आरंभला, तेव्हा मराठ्यांशी स्नेह करून स्वदेशास आपणही सुरक्षित निघून जावे, असा अबदालीने निश्चय केला.’
सदाशिवरावभाऊच्या मनात मात्र काही वेगळीच योजना घोळत होती. त्याबद्दल राजवाड्यांनी लिहिले, ‘स्नेहाचे बोलणे करण्याकरिता अबदालीने भाऊकडे वकील पाठवले; परंंतु त्याजकडील राजकारणाचा आपल्या मनाप्रमाणे बनाव बसण्याला बराच अवधी लागेल, हे पाहून भाऊने त्याच्या वकिलांच्या बोलण्याकडे विशेषसे लक्ष दिले नाही… अबदालीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याजोगीच भाऊची त्यावेळची स्थिती होती. अबदालीपेक्षा सर्वतोप्रकारे श्रेष्ठ असे सैन्य भाऊजवळ होते. अबदालीने कधी पाहिला नाही, असा तोफखाना भाऊबरोबर होता… ज्या शिंद्यांना सहा महिन्यांपूर्वी अबदालीने नाडिले होते, त्यांच्याबद्दल यथेच्छ सूड उगवण्याची भाऊच्या मनात सोत्कंठ ईर्षा होती.
अबदालीला सहजासहजी सोडायचा नाही, मनाप्रमाणे त्याने तह केला, तर आणि तरच त्याला देशी सुखरूप जाऊ द्यायचे, नाहीतर अंतर्वेदीत कोंडून किंवा आत तडफडून यमुना उतरून अलीकडे आल्यास बाहेरून गाठून त्याला तंबी द्यावयाची, असा व्यूह भाऊने रचला. तो तडीस नेण्यास लागणारी साधने भाऊजवळ जय्यत तयार होती.’
अर्थात ती योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी थोडे थांबावे लागणार होते, ते पावसाळ्यामुळे. ‘भाऊ आगस्टपासून आक्टोबरपर्यंत दिल्लीस होता.’ त्या काळात सैन्याच्या हालचाली करणे बरेच अडचणीचे होते. ‘तथापि त्या अवधीचा उपयोग करून दिल्लीच्या पातशाहीची व्यवस्था लावण्याचे काम भाऊने मोठ्या अक्कलहुशारीने पार पाडले. त्या पातशाहीवर डोळा ठेवून बसलेल्या अबदालीला त्याबाबतही शह देण्यासाठी भाऊने धूर्तपणाने पावले उचललीदेखील…’ (शुद्धलेखन व व्याकरण मूळ उतार्यांप्रमाणे)
