मालोजीच्या कारकीर्दीचा अगदी थोडक्यात आढावा घेऊन त्याला मिळालेल्या जहागिरीच्या मुलखाचे ऐतिहासिक महत्त्व राजवाड्यांनी अधोरेखित केले. त्यांनी लिहिले, ‘मालोजीला पुत्रलाभ झाला, त्या सुमारास निजामशहाची व मोंगलांची युद्धे नांदेड, बीड वगैरे प्रांतांत सुरू असून निजामशहाचे ठाणे अवश्यास, जुन्नरास व परिंड्यास हलते होते. मोंगलांशी होणार्या युद्धांत पराक्रम करून निजामशहाची व वरकरणी मलिकंबराचीही इतकी मेहेरनजर मालोजीने संपादिली की शक १५२५ मध्ये पंचहजारी मनसब मिळवून तो तोलदार सरकार बनला. नंतर शहाच्या खास मध्यस्थीने शहाजीचा दुसरा विवाह जाधवरावाची कन्या जिजाबाईशी झाला. त्यावेळी मालोजीचे वय त्रेपन्न वर्षांचे असून शहाजी नऊ वर्षांचा व जिजाबाई आठ वर्षांची होती.’
‘पुढे मलिकंबराच्या कारकीर्दीत शक १५४१पर्यंत अनेक मुलुखगिर्या करीत राहिलेल्या मालोजीला रणभूमीवर मृत्यूने गांठिले. मरणसमयी मालोजीचे वय सत्तरीच्या जवळ आले होते… फौजेच्या खर्चाकरिता निजामशहाने मालोजी राजास जी जहागीर दिली, ती बहुतेक निजामशाही, मोंगलाई व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील असून कित्येक परगणे मोंगलाच्या राज्यांतील होते. सरहद्दीवरील ते परगणे देण्याचा स्पष्ट हेतू होता की, निजामशाहीची सरहद्द स्वहितार्थ तरी मालोजीने शाबूद ठेवावी. मोंगलांच्या प्रांतांतील परगणे जहागीर देण्यात मतलब होता की, मालोजीने ते प्रांत कायमचे जिंकून घेऊन निजामशाहीस जोडावेत. देणार्याची दूरदृष्टी व घेणार्याची हिंमत सारखीच वाखाणण्यालायक आहे!’
शिवाजीच्या आज्याचा हा त्रोटक इतिहास सांगून संपवताना राजवाड्यांनी जाता जाता एक नोंद मात्र आवर्जून केली; ती अशी की, ‘शिखरशिंगणापूरच्या निर्जल डोंगरावर विस्तीर्ण सरोवर बांधून व वेरुळाच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून मालोजीने महाराष्ट्रात सर्वतोमुखी कीर्ति संपादन केली.’
‘मालोजीच्या मृत्यूनंतर त्यावेळच्या दरबारी शिरस्त्याप्रमाणे वर्ष- दीड वर्षाने शक १५४३मध्ये दुर्मतिसंवत्सरात (बृहदीश्वरशिलालेखातील उल्लेखाप्रमाणे) शहाजीला मालोजीची सर्व जहागीर व सर्व सैन्य यांचे आधिपत्य प्राप्त झाले. तेथपासून शक १५८५पर्यंतची जी ४२ वर्षे त्यांचा इतिहास आता कालक्रमानुसार मांडावयाचा आहे’, हा आपला उद्देश स्पष्ट करून राजवाड्यांनी त्या इतिहासाचे मुख्य चार भाग पाडले. ‘शक १५४३पासून शक १५५०मधील फतेखानाच्या कैदेपर्यंतचा पहिला भाग. ह्या सात वर्षांत मलिकंबराचा हस्तक म्हणून काही काळ व फतेखानाचा प्रतिस्पर्धी म्हणून काही काळ शहाजीचा गेला… १५४८मध्ये मलिकंबराचा मुलगा फतेखान निजामशाही कारभारी होऊन शक १५५०मध्ये कैद झाल्यापासून शक १५५८मध्ये निजामशाहीचा अंत होईपर्यंतचा आठ वर्षांचा दुसरा भाग. ह्या अवधीत शहाजीचे प्राबल्य अतोनात वाढून त्याच्याच जोरावर निजामशाही काही वर्षे टिकून राहिली… शक १५५८मध्ये शहाजी आदिलशाही सरदार झाल्यापासून शक १५७०मध्ये त्याला अटक होईपर्यंतच्या बारा वर्षांचा तिसरा भाग. ह्या कालावधीत शहाजीचा कर्नाटकात बस बसता बसता तो बहुतेक स्वतंत्र व मुखत्यार असा महाराजा बनत चालला… शक १५७१पासून शक १५८५पर्यंतच्या पंधरा वर्षांचा चौथा भाग. ह्या अवकाशात कर्नाटकात स्थिरस्थावर करून शहाजी स्वतंत्र राजाप्रमाणे बहुतेक किंवा सर्वस्वी राहू लागला. त्याचा सवाई व पराक्रमी पुत्र जो शिवाजी, त्याने सह्याद्रिखंडातील आनंदवनभुवनात स्वतंत्र राज्याची स्थापना केली…’
शहाजीचरित्राचे असे भाग पाडून झाल्यावर राजवाड्यांनी त्या काळातील एकंदर स्थितीचे थोडक्यात चित्रण केले. त्यांनी लिहिले, ‘शहाजीच्या काळी सैन्यात हजारोंनी सामान्य कुणबी शिपाई भरती होत असत. त्यांना मुत्सद्देगिरी, राजकारण वगैरे बडा व्यवहार करण्याची ऐपत नसे. मोसमात शेतकाम करून बाकीच्या काळात शिपाईिगरीवर पोट चालवण्याची धमक या कुणब्यांत उद्भवली होती. जो जास्त पोटगी देईल त्याची शिपाईिगरी करण्यास, त्याचा पाईक होण्यास हा वर्ग उत्सुक असे, मग तो धनी हिंदू असो की यवन असो, देव फोडणारा असो की जोडणारा असो, जुना असो की नवा असो!’ कशाकरिता लढावयाचे व कदाचित लढून मरावयाचे तर केवळ पोटाकरिता, असे मानणारा हा वर्ग होता…’
