‘नाव, आडनाव, कुल, वंश व मातृपितृनामे यांची शहानिशा झाल्यावर आता शहाजीच्या कर्तबगारीच्या रूपरेषेची आखणी करण्यास लेखणी मोकळी झाली आहे’, असे सांगत राजवाड्यांनी मग आपल्या संदर्भस्रोतांची माहिती दिली. ‘बृहदीश्वराच्या देवालयातील शिलालेख, शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप, बसातिने सलातीन (फारसी ग्रंथ) व शहाजी महाराजांची कैफियत या ग्रंथांवरून आणि इतर काही टिपणांवरून व पत्रांवरून ही आखणी (मी) करणार आहे. या साधनांमधील शहाजी महाराजांची कैफियत हे प्रकरण बव्हंशाने ‘बसातिने सलातीना’चाच संक्षेप असल्यामुळे स्वतंत्र साधन म्हणून त्यास यद्यपि फारशी किंमत नाही, तत्रापि शहाजीसंबंधाने इतरत्र न आढळणारी माहिती त्यात आहे. बसातिने सलातीन या फारशी ग्रंथाचा कर्ता शहाजीचे नाव कर्नाटकातील मोहिमांसंबंधात तुरळक काढतो, प्रामुख्याने न काढिता मुसुलमान सेनापतींच्या अनुषंगाने मदतनीस म्हणून गौणत्वाने जरी काढतो तरी मध्येच शहाजी फार शिरजोर झाल्याची तक्रारही करतो. त्यावरून अनुमान करता येते की ह्या कर्नाटकातील मोहिमांत शहाजीचे अंग प्रमुख होते…’

‘शहाजीच्या वरचढ कर्तृत्वाचे दिग्दर्शन शिवदिग्विजय व शिवप्रताप ह्या मराठी बखरींवरून बरेच उठावदार घडते’, असे राजवाड्यांनी त्यानंतर म्हटले खरे, पण पाठोपाठ त्या संदर्भस्रोतांची मर्यादित विश्वासार्हताही स्पष्ट करताना लिहिले, ‘शहाजीचरित्रातील प्रसंग विजयकार किंवा प्रतापकार कालानुक्रमाने, शिस्तवार व कसोशीने न देता मागचे पुढे व पुढचे मागे असे धरसोडीने देतात आणि तेहि देण्यात इतिहासलेखन करण्यातली अनभिज्ञता स्थलोस्थली प्रकट करतात. बृहदीश्वर शिलालेखहि ह्या बखरींच्याच वर्गात पडतो. तो मूलत: बखरच आहे, इतकेच की त्याला दगडावर कोरिला जाण्याचा मान मिळाला आहे. ह्या तिन्ही आधुनिक बखरींमध्ये परंपरागत, कर्णोपकर्णी ऐकलेली व कागदपत्रांवरून काढिलेली जी माहिती दिली आहे, तिला प्रत्यंतर पुरावा दुसर्‍या कोणत्याहि मराठी बाह्य ग्रंथाचा नाही. परंतु लढायांसंबंधाने जी माहिती धरसोडीने दिली आहे तिला बसातिने सलातीनातील किंवा इतर मुसलमानी तवारिखांतील पुराव्याचा पडताळा देऊन पारखिता येते. या साधनांची ऐतिहासिक किंमतही अशी आहे. त्यातून विश्वसनीय भाग निवडून काढून तो कालानुक्रमाने शिस्तवार मांडण्याचा उद्योग आता करावयाचा आहे… पुढे कालांतराने समकालीन कागदपत्रांचा अस्सल पुरावा जेव्हा केव्हा बाहेर येईल तेव्हा येईल, त्यानंतर प्रस्तुत मांडणीत फेरबदल, वाढ किंवा छाट करणे साहजिकच भाग पडेल.’

शहाजींची कर्तृत्वगाथा सांगायला सुरुवात करण्यापूर्वी राजवाड्यांनी अगदी थोडक्यात मालोजीचाही पराक्रम नोंदवला. त्यांनी लिहिले, ‘मालोजी शक १४७२त जन्मला… वयात आल्यावर त्याचा फलटणच्या निंबाळकराच्या मुलीशी विवाह झाला. मवासपणाची (=भाडोत्री सैनिकाची) कवाईत तोे बापापाशी व सासर्‍यापाशी सहज शिकला. शक १४९९ मध्ये, सत्ताविसाव्या वर्षी तो शिलेदार झाला. त्यावेळी मूर्तिजा निजामशहा नगरास राज्य करीत होता. शक १५१० पर्यंतची अकरा वर्षे शिपाईिगरी व शिलेदारी करीत करीत तो पाचचार हजार घोड्यांचा मालक बनला… १५१० साली मूर्तिजा निजाम इभ्राईम आदिलशहाच्या कुतुबशहाची बहीण मलिकाजहान हिच्याशी ठरलेल्या लग्नाच्या आड गेला, म्हणून विजापूरचा सरदार दिलावरखान मूर्तिजावर चालून आला. मूर्तिजा त्यावेळी आवश्याच्या किल्ल्यावर राहात होता व मालोजी त्याच्या तैनातीस होता. दिलावरखानाला मोठ्या सफाईने हरवून मालोजीने मूर्तिजाचा बचाव केला. मालोजीच्या ह्या कर्तबगारीचा उल्लेख बृहदीश्वर शिलालेखकर्त्याने  केला आहे, एवढेच नव्हे तर १४९९ पासूनच अनेक मोहिमांत पराक्रम गाजवल्यामुळे त्याची साख (=पतप्रतिष्ठा) खूपच वाढल्याचेही म्हटले आहे… अशा ह्या मालोजीला शक १५१५ साली भूमिगत द्रव्य सापडले व जगदंबेचा साक्षात्कार होऊन राज्यप्राप्तीचा वरही मिळाला. ऐतिहासिक दृष्टीने पाहता या वराचा अर्थ असा दिसतो की, महाराष्ट्रराज्य स्थापन करावे, अशी महत्त्वाकांक्षा ह्यावेळी मालोजीच्या मनात अत्यंत अंधुकशी उद्भवली. शक १५१६मध्ये मालोजीला वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी शहाजीराजे पुत्र झाला…’ अशा रीतीने काव्यनायकाच्या कर्तबगारीची पार्श्वभूमी राजवाड्यांनी  वाचकांसमोर ठेवली.