‘शक १५४३मध्ये निजामशाही तख्तावर मूर्तिजा, मूर्तजा किंवा मूर्तुजा हा नरम, चैनी, ऐदी व नाकर्ता सुलतान होता. मीर राजूचा सासुरवास दु:सह झाला म्हणजे मलिकंबरची कास धरावी आणि मलिकंबरचा जाच असह्य झाला म्हणजे राजूची पायधरणी करावी, ह्या पद्धतीने काही वर्षे काढल्यावर मूर्तिजाने दक्षिणी व परदेशी मुसुलमानांच्या पीडेतून मुक्त होण्याकरिता तिसरा एक पक्ष निर्माण केला. तो पक्ष म्हणजे मराठ्यांचा पक्ष…’ अशी मांडणी राजवाड्यांनी केली आणि शहाजीराजाचे त्या मांडणीमधले स्थान अधोरेखित करीत पुढे लिहिले, ‘अवश्यास व परिंड्यास असताना मूर्तिजाने मालोजीस जवळ केले होते; शहाजीचे लग्न जाधवरावाच्या मुलीशी जुळवून देण्यात मूर्तिजाचे बरेच अंग होते. त्यामुळे मालोजी उपकारबद्ध झाला व जाधवरावाच्या बरोबरीचा तोलदार सरदारहि बनला. अशा तर्हेने तिसरा पक्ष उभारण्याच्या लायकीचा ठरला. त्या पक्षाचे पुढारपण गाजवीत असताना मालोजी शक १५४१मध्ये वारल्यावर पक्षाध्यक्षत्व शिताफीने गाजवण्यास नाना प्रकारांनी लायक असा आणखी एक पुरुष मूर्तिजाला लाभला. तो कर्ता पुरुष म्हणजे तरुण, महत्त्वाकांक्षी व कर्तबगार शहाजी भोसला हा होय…’
‘शहाजीराजाचे जे गुणवर्णन जयरामकवीने चंपूकाव्यात केलेले आढळते, त्याचाच अनुवाद शिवदिग्विजय व शिवप्रताप ह्या बखरींत सापडतो’, हा अभिप्राय व्यक्त करून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘शूर, गुणज्ञ, जातीने मर्द, युद्धव्यूहकुशल, शहाची मर्जी सांभाळून वागणारा परंतु स्वत:चा कुर्रा जाऊ न देणारा असा गुणगणमंडित जो शहाजी भोसला, त्याच्याद्वारा राज्यात मराठ्यांचा तिसरा पक्ष उभारून दक्षिणी व परदेशी पक्षांना जरबेत ठेवण्याची व्यवस्था मूर्तिजाने केली… दरबारी एकांतात व लोकांतात जाण्यायेण्याची शहाजीला सदर परवानगी असे… शक १५४५मध्ये शहाजीला संभाजी हा प्रथम पुत्र झाला, तेव्हा शाहाने स्वत: मोठा समारंभ करून शहाजीस वस्त्रेभूषणे, अलंकार, परगणे व किल्ला बक्षीस दिला (शिवाजीप्रताप)… मूर्तिजाचा अंत झाला तेव्हा त्याने दक्षिणी व परदेशी मुसुलमानांवर विश्वास न ठेविता मराठा जो शहाजीराजा त्याच्यावर आपल्या बायकापोरांना सांभाळण्याचे काम निरोपाने सोपवले… या बाबी लक्षात घेतल्या म्हणजे शहाजीने बुर्हाणशहाचा केवढा विश्वास संपादिला होता, हे वेगळे पुरावे न देताहि स्पष्ट होते.’
राजवाड्यांनी नंतर ‘शहाजीच्या उमेदवारीच्या काळची’ परिस्थिती स्पष्ट केली. ‘निजामशाहीशेजारी एकंदर चार शाह्या होत्या. उत्तरेस दिल्लीची प्रचंड विस्तीर्ण मोंगलाई, दक्षिणेस विजापूरची आदिलशाही, बेदरची बरीदशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही. पैकी बेदरची बरीदशाही मरणोन्मुख झाली असून कुतुबशाहीहून आदिलशाही व आदिलशाहीहून मोंगलाई एकाहून एक बलिष्ठ होत्या. सर्वांत मोंगलाई बलिष्ठ असून तिचा रोख दक्षिणेतील सार्या शाह्या खाऊन टाकण्याचा स्पष्ट दिसत होता. निजामशाहीचा मुख्य शहा जो मूर्तिजा त्याची मोंगलांनी दिलेल्या पंचवीस वर्षांच्या माराने इज्जत उतरून गेलेली होती. त्याच्याबरोबरच त्याच्या रियासतीचीहि. मोंगलांनी निजामशाहीचे मोठमोठे लचके तोडिले असून ती वारली तर बाकीच्या शाह्या तिचे अनुकरण करतील, असा रंग दिसत होता.’
मग निजामशाहीच्या अखेरच्या काळातील स्थिती चित्रित करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘मूर्तिजाच्या उत्तर अमदानीत मलिकंबरने मीर राजूला जमीनदोस्त करून सर्व सत्ता आपल्या एकट्याच्या हातांत एकवटविली होती व शहाला तो कस्पटासमान लेखीत होता. तो मोंगलांशी व आदिलशहाशी झगडण्यात गुंतला होता, अशा आणीबाणीच्या वेळी शहाजीराजा भोसला तत्कालीन राजकीय आखाड्यात उमेदीने व ताज्या दमाने अवतीर्ण झाला. शहाजी आपला वाली होईल, मलिकंबरच्या प्राणघेण्या मगरमिठीतून आपणास सोडवील, अशा आशेने मूर्तिजाचे होते तेवढे सर्व वजन शहाजीच्या पाठीला होते. त्या वजनाचा पूर्ण उपयोग करून घेऊन निजामशाहीची मोडकळीस आलेली इमारत शहाजीने काही काळ सावरून धरिली आणि इतकेहि करून ती कायमची मोडल्यावर स्वत:चे सामर्थ्य वाढवून, आदिलशाही व मोंगलाई यांची हाडे खिळखिळी करण्याचा मार्ग आपला प्रतापी मुलगा जो शिवाजी त्याला मोकळा करून दिला…’
– आनंद हर्डीकर
