‘हे राजा, तू जे जे देश जिंकलेस किंवा पाहिलेस, त्या त्या देशची भाषा मी शिकलो आहे व मग तुझ्या आश्रयाला आलो आहे’, हे जयरामकवीचे वाक्य राजवाड्यांनी उद्धृत केले आणि चंपूकाव्याची मुख्य भाषा असणार्या संस्कृतशिवाय त्या कवीला अवगत भाषांची गणना केली. ‘मराठी गोपांचलीय, गुर्जर, वक्तर, ढुंढार, पंजाबी, हिंदुस्थानी, बागलाणी, फारशी, उर्दू व कानडी या अकरा मिळून एकूण बारा भाषा जयरामला येत होत्या’, हे नमूद करून पुढे राजवाड्यांनी त्या विधानाची सत्यासत्यता पारखण्याचा घाट घातला. त्या भाषांशी निगडित प्रांतांशी शहाजीचा खरोखरच काही संबंध आला होता का, याचा त्यांनी शोध घेतला.
त्यांनी लिहिले, ‘कानडी आणि मराठी भाषा ज्या कर्नाटक व महाराष्ट्र देशांत बोलल्या जात तेे देश शहाजीने साक्षात् जिंकले व पाहिले होते. संस्कृत पंडितांची भाषा, फारसी दरबारची भाषा, उर्दू लष्करातील भाषा शहाजीच्या नित्याच्या परिचयाच्या होत्या, तेव्हा त्यासंबंधाने जयरामाच्या विधानाला हरकत घेण्याचे कारण नाही. अहमदनगरच्या निजामशाहीची गादी मोगलांच्या तडाख्यातून बचावीत असता बागलाणी व गुजराथी भाषा जेथे बोलतात, त्या प्रांतांत शहाजीला शिरावे लागले, हे सुप्रसिद्ध आहे. सात भाषांचा हिशोब लागला…’
‘बाकी राहिल्या ब्रज, बख्तर, ढुंढार, पंजाबी व हिंदुस्थानी ह्या पांच भाषा व देश. हे देश शहाजीने कधी जिंकले किंवा निदान पाहिले?’ असा प्रश्न उपस्थित करून स्वत:च त्याचे टप्प्याटप्याने उत्तर देत राजवाड्यांनी लिहिले, ‘मलिकंबराची पातशाहा जहांगीर आणि शाहजादा शहाजहान यांच्याशी १५४०च्या सुमारास जी युद्धे झाली, त्या युद्धांमध्ये तरुण शहाजी वृद्ध मलिकंबराबरोबर मांडवगडापर्यंत गेला होता. मांडवगडच्या स्वारीत हिंदुस्थानी, ब्रज, बख्तर व ढुंढार या भाषा जेथे बोलतात, त्या मध्यहिंदुस्थानात शहाजी गेलेला होता. त्या स्वारीत ह्या भाषा शहाजीच्या कर्णपथावरून गेल्या असल्या पाहिजेत.’
‘आता राहिली फक्त पंजाबी. पंजाबात म्हणजे दिल्लीच्या पश्चिमेस व खुद्द शहाजी केव्हा गेला असावा? जयरामाच्या लिहिण्यावर जर विश्वास ठेवला, तर गृहीत धरावे लागते की, जेथे पंजाबी भाषा बोलतात, त्या पंजाबात शहाजी गेला होता. मांडवगडच्या स्वारीत माळव्यामध्ये गेला असता, वाघेलखंड, मथुरा, दिल्ली, लाहोर व काशी वगैरे स्थाने तरुण, उमद्या शहाजीने तह, सल्लामसलत, कुमक वगैरे सरकारी कामांनिमित्त पाहिली असावीत, असे म्हणावे लागते, त्याशिवाय जयराम इतक्या निश्चयाने खुद्द शहाजीच्या तोंडावर असे विधान करणार नाही’… हा निर्वाळा देत राजवाड्यांनी पुढे अधिक स्पष्टीकरणही दिले.
‘निजामशहाच्या व शहाजीच्या लष्करात पंजाबपासून लखनौपर्यंतच्या व हरद्वारापासून इटारसीपर्यंतच्या मुलखातील हजारो हिंदू-मुसलमान लढवय्ये शिपाईिगरी करून असत. त्यांच्या भाषांशी शहाजीचा परिचय झाला असेल, स्वत:च्या लष्करात शहाजी ह्या भाषा सदोदित ऐकत असेल, या बाबीसंबंधाने वाद नाही; परंतु ह्या भाषा बोलल्या जात होत्या, त्या प्रांतांमध्ये शहाजी कधी गेला असेल, हा वादाचा, संशयाचा प्रश्न आहे… नर्मदेपलीकडील मांडवगडच्या स्वारीच्या काळी मलिकंबरबरोबर गेलेला शहाजी ऐन पंचविशीच्या भरात होता, शारीरिक व मानसिक गुणांनी संपन्न असून दहापाच हजार लष्कराचा कप्तान होता. अशा पराक्रमी सरदाराच्या अवलोकनात ते देश त्यावेळी आले असण्याचा संभव आहे, अशी संशयनिवृत्ति होण्यासारखी आहे.’
जयरामकवीला अवगत भाषांचा शहाजीराजाच्या संचारक्षेत्राशी आणि काही अंशी प्रभावक्षेत्राशी संबंध जोडून दाखवण्याचा प्रयत्न करून राजवाडे थांबले नाहीत. त्या चंपूकाव्यात शहाजीच्या कारकिर्दीमधील शक १५७५पासून शक १५८०पर्यंतचीच हकीकत दिली आहे. पूर्वीच्या साठ वर्षांची शक १५१६पासून शक १५७५पर्यंतची व पुढच्या पाच वर्षांची शक १५८०पासून शक १५८५पर्यंतची हकीकत त्यात आलेली नाही. आणि तरीही चंपूकाव्यातील पाच वर्षांतील युद्धोल्लेखांना मागच्यापुढच्या वर्षांतील राजकीय व यौद्धिक हकीकती क्रमवारीने जोडून त्या थोर पराक्रमी पुरुषाच्या कर्तबगारीचा अहवाल जुळवण्याचा त्यांनी चंगही बांधला.
