विवाहसंस्था क्रमाक्रमाने कसकशी बदलत आली, याचे विवेचनात्मक प्रकरण संपवताना राजवाड्यांनी थोडक्यात सारांश मांडला, तो (महा) भारताच्या शांतिपर्वाच्या २०७व्या अध्यायामधील तीन श्लोकांचा आधार घेऊन. त्यांनी लिहिले, ‘पुराणेतिहासज्ञ भीष्मांनी ३७-३८-३९व्या श्लोकांत म्हटले आहे की, (१) कृतयुगी स्त्रीपुरुषांच्या मनात आले की समागम होत असे. आईबाप, भाऊबहीण हा भेद नव्हता. ही यूथावस्था होय. (२) त्रेतायुगात स्त्रीपुरुषांनी अन्योन्य स्पर्श केला म्हणजे समाज तेवढ्यापुरती त्या स्त्रीपुरुषांना समागमाची परवानगी देत असे. ही आवडीनिवडीची किंवा इष्टानिष्टावरणावस्था होय. (३) द्वापरयुगी मैथुन-धर्म सुरू झाला म्हणजे टोळीत जोडप्याजोडप्यांनी स्त्रीपुरुष राहू लागले, परंतु अद्याप त्या जोडप्यांना स्थिरावस्था प्राप्त झालेली नव्हती. (४) आणि कलियुगात द्वंद्वावस्था परिणतीस आली म्हणजे विवाहसंस्था जीस म्हणतात ती उदयास आली… इतक्या प्राचीन काली समाजशास्त्रीय परंपरा इतकी नामी सांगणार्‍या भीष्माविषयी सध्यादेखील परम आदर उत्पन्न होतो…’

राजवाड्यांच्या या अर्धवट राहिलेल्या पुस्तकातील उपलब्ध असणारे शेवटचे ‘अग्नि व यज्ञ’ हे चौथे प्रकरण तब्बल २० पानांचे आहे. भारतीय संस्कृतीत अग्नीला महत्त्वाचे स्थान कशामुळे प्राप्त झाले असावे, या प्रश्नाचा खोलवर जाऊन वेध घेण्याचा त्यांचा हेतू असेलही कदाचित, परंतु या पूर्णपणे निखालस भारतीय संदर्भातल्याच विषयाची मांडणी करताना लेटूर्नोसारखा अलीकडचा किंवा प्लूटार्कसारखा प्राचीन विदेशी लेखक त्यांच्या मदतीला नसल्यामुळे म्हणा किंवा या प्रकरणाच्या लेखनासाठी आवश्यक तेवढा वेळ देता न आल्यामुळे म्हणा, हे प्रकरण त्यांच्याच पूर्वार्जित कीर्तीला साजेसे उतरले नाही. जिज्ञासू वाचकांनी ते मुळातून अवश्य अभ्यासावे; परंतु हिंस्र श्वापदांपासून रक्षण करण्याचे एक साधन या स्थानापासून स्त्रीपुरुषांच्या विवाहावर समाजमान्यतेचे शिक्कामोर्तब केले जातानाचा अत्यावश्यक साक्षीदार या स्थानापर्यंत अग्नीचा झालेला प्रवास रंगवून सांगण्याच्या भरात राजवाडे ह्यांनी पुराव्यांची ओढाताण केली आहे, चुकीची संदर्भनोंदणी केली आहे, मंत्रांचे सोयीस्कर परंतु चुकीचे अर्थ लावले आहेत, वारेमाप शब्दच्छल केला आहे आणि कल्पनाविलासाचे बेलगाम वारू उधळू दिले आहेत, हे चिकित्सकांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. साहजिकच त्यांचे चाहतेदेखील अपेक्षाभंगामुळे निराश होतील.

उदाहरणार्थ, ‘भारतीयांचे रानटी पूर्वज रात्री अग्निकुंडाच्या आसपास सारवलेल्या जमिनीवर झोपून उघड्यावर सरमिसळ समागम करीत असत’, हा आपला निष्कर्ष मांडताना राजवाड्यांनी त्याच्या पुष्ट्यर्थ जरी ‘ऋग्वेदातील ५व्या, ६व्या मंडलातील सहजगत्या आढळलेल्या’ सहा ऋचांचा पुरावा दिला असला, तरी त्यांनी दिलेल्या सहा उदाहरणांमध्ये प्रत्यक्षात पाचव्या मंडलातले एकही नाही आणि ६व्या मंडलातील केवळ एकच आहे. उर्वरित ऋचांपैकी तीन तिसर्‍या मंडलातील तर दोन चौथ्या मंडलातील आहेत. राजवाडे नेमकेपणाविषयी कसे दक्ष राहिले नाहीत, हे यावरून दिसते.

त्याचप्रमाणे यजुर्वेद व इतर काही संहितांचा हवाला देत राजवाड्यांनी ‘यज्ञ’ या शब्दाचा अत्यंत विपरीत अर्थ लावला. ‘जननार्थ समागमक्रिया करणे’ हा अर्थ त्यांनी लावला आणि अश्वमेधाशी तो शब्द जोडून त्यांनी विस्तृत विवेचन केले. मात्र अन्यत्र असे उल्लेख आढळत नाहीत. ‘डॉ. पां. वा. काणे यांच्या ‘धर्मशास्त्राच्या इतिहासा’तसुद्धा अश्वमेध यज्ञासंबंधीच्या विवेचनात अश्लील उल्लेख नाही. म्हणून राजवाड्यांचे हे निराधार लेखन अत्यंत आक्षेपार्ह आहे’, असे परखड मत डॉ. म. अ. मेहेंदळे यांनी आपल्या खंडनपर प्रदीर्घ लेखात व्यक्त केले आहे.

  • आनंद हर्डीकर
    anand47.hardikar@gmail.com