तगर शहर १३०० वर्षे अस्तित्वात होते, असा निष्कर्ष काढून त्या शहराला कालाच्या कैचीत धरल्यानंतर राजवाड्यांनी आपला मोर्चा वळवला तो त्या शहराला दिशेच्या कैचीत पकडण्याच्या आव्हानात्मक कामाकडे. टॉलेमी किंवा पेरिप्लस या दोन्ही स्रोतांकडून तगर शहराच्या दिशेबद्दल मिळालेली माहिती मुळीच ग्राह्य न धरता ते अपरान्तात आहे, एवढेच म्हणणे राजवाड्यांनी मान्य केले आणि शिलाहारवंशीय राजांच्या ‘आपण मूळचे तगरचे राजे होतो’ या दाव्याधारे पुढचा तर्कविलास आरंभला. त्यांनी लिहिले, ‘शिलाहारांनी कोल्हापूर, कर्‍हाड, उत्तर कोंकण व दक्षिण कोंकण या प्रांतांत ६०० वर्षे राज्य केले. हा राजवंश दक्षिणेकडला कोठलातरी आहे व त्यांचे मूळठाण जे तगर शहर ते कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कोठेतरी, अपरान्ताच्या दक्षिण भागात कोठेतरी असावे, असे अनुमान केल्यास ते वावगे ठरणार नाही.’

या दोन अनुमानांपाठोपाठ कैचीत धरण्याचे तिसरे साधन राजवाड्यांनी पुढे केले. ते साधन म्हणजे दुसर्‍या पुलिकेशी चालुक्याने वातापीला असताना तगर शहरी राहणार्‍या ज्येष्ठ नावाच्या ब्राह्मणाला माकरप्पि नावाचा गाव इनाम दिल्याची ताम्रपत्रातली नोंद. ‘वासिष्ठसगोत्राय तैत्तिरीयाय तगराधिवासिने। चतुर्वेदायोंबरखेडकुलनामधेयाय ज्येष्ठशर्मणे। रोल्कूरुक्युत्तरत:कदप्पग्रामदक्षिणत:। माकरप्पिर्नाम ग्राम दत्त:॥’ ही ऐतिहासिक नोंद उद्धृत करून राजवाड्यांनी पुढे खुलासेवजा लिहिले, ‘या ताम्रपटातील विधाने अशी – पुलिकेशी वातापी नगरात होता; ज्येष्ठ नावाचा ब्राह्मण तगरचा राहणारा होता; त्या ब्राह्मणाला पुलिकेशीने माकरप्पि गाव इनाम दिले; माकरप्पि गावाच्या उत्तरेस कदप्प गाव होते व दक्षिणेस रोल्कूरुकी गाव होते. यावरून अशी अनुमाने काढता येतात की, तगर शहर वातापी शहराजवळ कोठेतरी असले पाहिजे, इनाम दिलेले माकरप्पि गाव तगरशहरी राहणार्‍या ब्राह्मणाला चालवेल इतके जवळ असले पाहिजे. वातापी म्हणजे सध्याचे बादामी. तगरशहर ह्या बादामीजवळ व इनाम दिलेल्या माकरप्पि गावाजवळ असले पाहिजे. पैकी बादामी कोठे आहे, हे आपल्याला माहीत आहे. फक्त माकरप्पि कोठे आहे एवढे कळले म्हणजे तगर शहराचा पत्ता लागण्यास साहाय्य होईल. तोपर्यंत कोणाही संशोधकाने माकरप्पि गावाचा माग काढल्याशिवाय तगर शहराचा थांग लावावयाचा प्रयत्न केल्याने अर्थातच यश आले नाही.’

आणि नंतर राजवाड्यांनी गौप्यस्फोट करीत म्हटले, ‘ह्या माकरप्पि गावाचा थांग मला गेल्या वर्षी (१९१७ मध्ये) लागला. बल्लारी जिल्ह्याच्या हुविनहाडगल्ली तालुक्यात माकरब्बी नावाचे गाव सध्या आहे. माकरब्बी हा वर्तमानकालीन उच्चार पुरातन माकरप्पि या उच्चाराचा अपभ्रंश आहे, हे उघड आहे. माकरप्पीच्या उत्तरेचे कदप्प गाव आणि दक्षिणेचे रोल्कूरुकी गाव सध्या उजाड होऊन गेलेले असून त्यांचा आता तेथे मागमूसही नाही. कदाचित चारपाचशे वर्षांच्या एखाद्या जुन्या कानडी यादीत सापडल्यास न कळे. माकरब्बी या नावाचे गाव नर्मदेच्या दक्षिणेस दुसरे एकही नाही. या गावाचा पत्ता नक्की लागल्यामुळे आता निश्चयाने असे म्हणता येते की, तगर शहर विजापूर जिल्ह्यातील बादामी शहरापासून बल्लारी जिल्ह्यातील माकरब्बी गावापर्यंतच्या टापूत कोठेतरी असले पाहिजे.’

नंतर राजवाड्यांनी एका विषमभुज चतुष्कोणाची कल्पना केली, त्याच्या पश्चिमभुजेच्या उत्तर टोकाला बादामी व दक्षिणभुजेच्या पूर्वटोकाला बल्लारी होते. तात्पर्य, बादामी, गदग, बल्लारी व अद्वानी या चौकोनाच्या हद्दीत तगर शहर असण्याचा संभव लक्षात घेऊन त्यांनी मुद्दाम त्या टापूत भरपूर पायपीट केली. बर्‍याच येरझार्‍या घालूनही तगर शहराचा माग प्रथम सापडला नाही. नंतर ते गजेंद्रगडाला गेलेेले असताना मात्र तेथून १५ कोसांवर तवरगिरी नावाचे गाव असल्याचे समजले. तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यावर त्यांचा अंदाज निश्चयाप्रत पोहोचला की, ‘पुरातन तगर शहर म्हणतात ते हेच तवरगिरी गाव होय. ते शिलामय डोंगराळ मुलखात वसले असून शत्रूविरुद्ध लढविण्यास उत्तमोत्तम आहे. तेथे राहणार्‍या इसमास ३०-३५ कोसांवरील माकरप्पि गावाची व्यवस्था पाहण्यात विशेष अडचण नव्हती.’ सोबत त्यांनी त्याभोवतालच्या प्रांताचा स्थूल नकाशासुद्धा दिला.