‘गृहस्थधर्माच्या पालनासाठी आपली पत्नी घरी आलेल्या अनोळखी अतिथीलाही उपभोगार्थ देण्याच्या सत्कृत्यामुळे सुदर्शनाची कीर्ती भुवनत्रयात अक्षय्य पसरली व त्याला इंद्रलोक प्राप्त झाला, असे पितामह भीष्मांनी धर्मराजाला सांगितलेले (महा)भारतात आढळते’, हे जसे राजवाड्यांनी सांगितले, तसेच त्यांनी त्याच महाग्रंथाच्याच हवाल्याने ‘अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करण्याच्या चालीला पुढे आस्ते आस्ते आळा पडल्याचे’ नमूद केले. त्याबद्दलचा खुलासा करताना त्यांनी लिहिले, ‘शांतिपर्वाच्या २६६व्या अध्यायामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेली चिरकारीची कथा पाहावी. चिरकारीचा पिता गौतम अन्यत्र गुंतला असता इंद्र गौतमाश्रमात अतिथी म्हणून आला आणि चिरकारीच्या मातेचा उपभोग घेऊन चालता झाला. हे वृत्त गौतमास कळल्यावर त्याने चिरकारीस आपल्या मातेचा वध करण्यास पहिल्या झटक्यासरशी सांगितले व स्वत: रागाने अरण्याचा रस्ता धरला. इकडे मातेचा वध न करता चिरकारी तसाच बसून राहिला. अरण्यात राग शांत झाल्यावर गौतमाला स्वस्त्रीचा पुत्राने वध केला असेल या निश्चितीने फार वाईट वाटले. अतिथीसमागमाच्या असल्या अस्पष्ट अपराधाकरिता स्त्रीचा वध करणे अधर्म्य होय, असे वाटून, पश्चात्ताप होऊन तो घरी परतला. पुत्राने स्त्रीस ठार मारिले नाही असे पाहून त्या ऋषीने चिरकारीची प्रशंसा केली…’

ही कथा सांगून सुदर्शनाच्या व गौतमाच्या कथांची तुलना करीत राजवाड्यांनी भाष्य केले. ‘सुदर्शन व गौतम दोघेही अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करणे हा धर्म समजत होते. ह्या धर्माने सुदर्शनाला कृतकृत्यता वाटली तर गौतमाला पहिल्या झटक्याला क्रोध आला, विचारांती स्वस्त्रीने अतिथिधर्म पाळण्यात जे केले, ते धर्म्यच केले, असे त्याला वाटले. याचा अर्थ इतकाच की, ही अतिथिपूजनाची चाल समाजात किंचित गर्हणीय समजली जाऊ लागली होती, पण तिचा पगडा व्हावा तितका शिथिल झाला नव्हता’…

या चालीच्या उत्क्रांतीतील पुढची पायरी म्हणजे अतिथीला स्त्रीसमर्पण न करण्याची. ह्या पायरीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून राजवाड्यांनी सर्वप्रसिद्ध जमदग्नीची कथा उद्धृत केली. त्यांनी लिहिले, ‘रेणुका या जमदग्नीच्या बायकोने चित्ररथ गंधर्वाकडे नुसते सकामदृष्टीने पाहिले, तेणेकरून कोपाविष्ट होऊन जमदग्नीने आपला मुलगा परशुराम याजकडून तिला ठार केले. मानसिक व्यभिचारही ज्याला खपला नाही, त्या जमदग्नीने अतिथीला स्वस्त्रीसमर्पण कितपत सहन केले असते, ते वेगळे सांगायला नको. सुदर्शनाच्या कथेत अतिथीला उपभोग देणे हे दोघा नवराबायकोंना संमत होते; गौतमाच्या कथेत स्वस्त्रीदान नवर्‍याला पसंत नव्हते, परंतुु बायकोला व मुलाला पसंत होते; परशुरामाच्या कथेत मात्र बापाला व मुलाला स्वस्त्रीसमर्पण नापसंत होते.’

या चालीबद्दचे विवेचन आटोपते घेताना राजवाड्यांनी पुढील पायरीचा ओझरता उल्लेख केला. ‘ती पायरी राम व सीता यांची. रावण अतिथीचा वेश घेऊन सीतेपुढे आला व तिला तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने घेऊन पळाला. अतिथीला स्वशरीर समर्पण करण्याची चाल जर सीतेला मान्य असती, तर रामायणाचा पुढील कथाभाग घडलाच नसता. रामाला व लक्ष्मणाला आणि तत्कालीन तमाम भारतीय समाजाला स्त्रीसमर्पणाची ही चाल बरीच गर्हणीय वाटू लागली होती, हे स्पष्ट आहे.’

यानंतर राजवाड्यांनी ‘ती’ चाल अस्तित्वात येण्यामागची कारणे स्पष्ट केली. त्यांनी लिहिले, ‘प्राचीन काळी गाई, बैल, घर इत्यादींप्रमाणेच स्त्रीचा जिनगीत समावेश होत असे. स्त्री हा जिन्नस मालकीचा समजला गेल्यावर तिला मित्रास किंवा पाहुण्यांस उपभोगार्थ देऊन टाकण्याचा अधिकार सहजच उत्पन्न होतो… ्त्रिरयांवर पुरुषांची मालकी केव्हा उत्पन्न झाली? तर मनुष्य हा पशुकोटीतील प्राणी आहे व त्याचे अगदी जवळचे सगेसोयरे पशू म्हटले म्हणजे वानर होत. वानरांतील हुप्या इतर लहानमोठ्या वानरांना मारून किंवा हाकलून कळपातील सर्व माद्यांवर प्रजापतित्वाचा हक्क बजावतो म्हणजे हुप्या बहुपत्नीक असतो. पाशवदशेत माणूसही बहुपत्नीक असावा, तो टोळ्या करून राहू लागल्यावर बहुपत्नीकत्व आणि बहुपतित्व टोळ्यांत उत्पन्न झाले असावे, असे उपमानप्रमाणाने म्हणावे लागते’…

  • आनंद हर्डीकर
    anand47.hardikar@gmail.com