‘विचारविकार प्रदर्शनाच्या साधनांची (इतिहासपूर्व व इतिहासोत्तर) उक्रांती’ या निबंधात राजवाडे यांनी मानवी अभिव्यक्ती, संज्ञापन, निर्मिती आणि कलाकृती यांसाठीच्या एकंदर ४० साधनांची यादीच केली आहे. त्यांपैकी २० साधने ‘शुद्ध’ आणि उरलेली २० दुय्यम किंवा ‘शबल’ असे वर्गीकरण त्यांनी केले आहे. त्याचा पाया या साधनांतून व्यक्त होणारा आशय वास्तव आहे की भ्रांत, यांवर आधारित आहे. समजा चित्र हे जर पशुपक्ष्यांचे चित्र असेल तर ते वास्तव, जर राक्षस देव यांचे असेल तर भ्रांत. नृत्य हे वास्तव साधन पण तो नाच जर देवी अंगात येऊन होत असेल तर ते भ्रांत साधन होय. भूमी रचना म्हणजे नगर रचना ज्यात देवळे, शाळा, रस्ते इत्यादी गोष्टी असतात ते वास्तव तर स्वर्ग नरक पातळ लोक वैगेरे भ्रांत साधने होत, असे राजवाडे यांचे वर्गीकरण. मग इतिहासाच्या दृष्टीने राजवाडे भ्रांत साधनांना कितपत महत्त्व देतात?
राजवाडे निव्वळ वास्तवाला थेट महत्त्व न देता प्रश्न निर्माण करतात की, भ्रांत कलांची गरज माणसाला का लागते. ऐकू येणार्या ध्वनीच्या उगमाचा जेव्हा शोध लागला नाही त्यातून पुरातन माणसाला वाटले की हा अर्थातच अदृश्य प्राण्याचा आवाज असावा. तो झाडांच्यावर, मेघामध्ये वा आकशात रहात असावा. मग त्याच्यासाठी देवळे, प्रार्थना, नैवेद्य बळी असे अनेक प्रकार मनुष्याने निर्माण केले, हे सांगून, ‘अज्ञातोद्भव शबल साधने केवळ भ्रांतिकृत असतात, परंतु ती भ्रांतिकृत असतात असे मनुष्य समजत मात्र नाही, वास्तव साधनांच्या व कलांच्या इतकीच किंवा त्याहूनही जास्त खरी ती आहेत असा मनुष्याचा समज असतो.’- असा निष्कर्ष राजवाडे काढतात.
आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी राजवाड्यांनी महाष्ट्राच्या कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर असलेल्या जुन्या पडक्या उद्ध्वस्त देवळाचा परिसर, तेथे आढळणारे वड पिंपळाचे पार, शेंदूर फसलेले म्हसोबा आणि विरोबा. नंतर लागणारी सतीची देवळे. त्याच परिसरात गेल्या एक दोन शतकांत उभारलेले ख्रिस्ती चर्च यांचा सविस्तर फेरफटका घडवून वाचकाला प्रश्न केला आहे- ‘या सर्व देखाव्याचा अर्थ काय? गेल्या तीन हजार वर्षातील महाराष्ट्रातल्या लोकांच्या शबल, काल्पनिक व अवास्तव साधनांचे, कलांचे व मतांचे हे मूर्त प्रदर्शन आहे.
याचा अर्थ तीन तर्हांनी करता येतो. केवळ श्रद्धाळू जे आहेत त्यांना स्वर्गनरक ऊर्फ परलोक यांतील देवादींच्या कृती या देखाव्यात दिसतात व त्या खर्याहून खर्या ते मानतात. केवळ कलेचे व शिल्पाचे जे चुंचू आहेत ते मूर्तीचे डौल, इमारतीचा घाट, चित्रांचा उठाव, रंगाची भरदारी व कल्पनेची भरारी वर्णन करण्यात दंग होतात आणि असले शिल्प आता लोपले म्हणून शोक करतात. इतिहासाचे जे अभ्यासी आहेत त्यांना या देखाव्यात वरील दोघांच्याहून निराळा अर्थ दिसतो. सोंडेचा गणपती, पंखांचे देवदूत, चोचीचा गरुड, शेषशाई नारायण, चतुर्मुख ब्रह्मदेव, दशमुख रावण, घोडमुखे किन्नर, ऊर्ध्वशिख नारद, डोक्याच्यावर असलेला स्वर्ग व पायाच्याखाली असलेले पाताळ, हे सर्व भ्रांत कल्पनेचे खेळ आहेत, हे सर्वथैव खोटे आहेत आणि शुद्ध शास्त्रज्ञान जसजसे वाढत जाईल तसतसा याचा लोप कालांतराने झालाच पाहिजे हे इतिहासकार जाणतो आणि लोप पावत जाणार्या भ्रांत शिल्पाबद्दल हळहळत बसत नाही.’
लाखो वर्षांच्या इतिहासाचा मागोवा अशा शुद्ध आणि भ्रांत साधनांच्या मदतीने घेता येतो, हा राजवाडे यांचा याविषयीचा निष्कर्ष आजच्या मानव्यविद्या, दृश्यसंस्कृती अभ्यास आदी शाखांशी मिळताजुळता, म्हणून महत्त्वाचा आहे. ईश्वर, आत्मा , परमात्मा हे सर्व मनुष्य निर्मित आहेत. भ्रांत आहेत. मनुष्याला देवाचा उपयोग मुख्यत: संकट निवारण्यासाठी असतो. दुसरा जास्त परिणामकारी उपाय सापडला असता असंख्य देवांच्या यादीतून तो एकेक देव कमी करता जातो. मात्र, इतिहासाच्या या भ्रांत साधनांचा लोप होत जाणार याबद्दल इतिहासकाराने हळहळू नये असे राजवाडे सुचवतात का, हे वाचकांना चक्रावणारे आहे.
