‘१५ नोव्हेंबरनंतर दिल्लीकडून मिळणारी रसद दिवसेंदिवस कमी कमी होत गेल्यामुळे मराठी सैन्याची त्यानंतर आस्ते आस्ते उपासमार होऊ लागली, तरीही सदाशिवभाऊची उमेद व हिंमत पूर्वी जशी होती, तशीच कायम होती. २३ नोव्हेंबरला अबदालीचे आणि भाऊचे पहिले म्हणण्यासारखे युद्ध झाले. त्या लढाईत जनकोजी शिंदे याच्या हस्ते अबदालीचा पराजय झाला. त्यांच्याकडील सहाशेपावेेतो माणूस वाया झाले (मरण पावले) व आपल्याकडील दोन अडीचशेपर्यंत झाले. आपल्या सैन्याने त्यांच्या लोकांना त्यांच्या गोटात नेऊन घातले. पुढे दुसरे युद्ध ७ डिसेंबरला अस्तमानी (संध्याकाळी) झाले, त्यातही अबदालीचाच पराजय झाला. त्याजकडील दीड हजार माणूस त्यांच्याच आराब्यापुढे (तोफखान्याची गाडी) पडले होते. आपल्याकडील सुमारे दीडशे माणूस ठार व पाच-सहाशे जखमी झाले होते. त्यावरून त्याही लढाईत मराठ्यांना जय मिळाला होता, हे स्पष्ट आहे. परंतु या लढाईत फार मोठी हानी झाली. बळवंतराव मेहेंदळे ठार झाला. त्यामुळे तिकडील लोकांना फार समाधान झाले…’ अशा शब्दांमध्ये राजवाड्यांनी पुढील घटनाक्रमाचे वर्णन केले आणि अखेरीस गोविंदपंत कसा व का बदलला, हेही सांगितले.
‘आपली मदत नसतानाही, उलट आपण होईल तितकी कुचराई केली असतानाही भाऊसाहेबाचे सैन्य उत्तरोत्तर विजयीच होत चालले आहेे, हे ऐकून गोविंदपंताच्या मनात काही निराळी भावना (निर्माण) होऊन पंतमजकुरांनी चार लाख रुपये घेऊन दिल्लीचा रस्ता धरिला. गोविंदपंताला दिल्लीकडे येण्यास दुसरेही एक कारण झाले. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वत: पंचवीस-तीस हजार फौज घेऊन भाऊच्या साहाय्यास कूच करून निघाले व बर्हाणपुर्यापर्यंत आले, ही बातमी गोविंदपंताला कळली. तेव्हा श्रीमंतांपाशी अब्रू राहावी या हेतूने गोविंदपंत २२ डिसेंबरच्या सुमाराला दिल्लीस आला. बरोबर आणलेली रक्कम नारो शंकराच्या स्वाधीन करून पंताने पानिपतच्या रोखाने गाजुद्दिननगराकडे कूच केले; परंतु त्या शहराजवळ अबदालीचा सरदार अताईखान याने गोविंदपंताला त्याच दिवशी गाठून ठार केले…’ ही बातमी सांगून राजवाडे थांबले नाहीत, गोविंदपंताच्या त्या निधनामुळे युद्धविषयक स्थितीत कोणता निर्णायक बदल झाला, तोही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण शब्दांत मांडला.
‘कोणत्याही हेतूने का होईना, गोविंदपंताच्या हातून यावेळी अबदालीची रसद बंद केली गेली असती, तरीदेखील सदाशिवभाऊचे हित झाले असते. परंतु राजीखुशीने ज्याच्या हातून पूर्वी हित झाले नाही, त्याच्या हातून धन्याच्या भीतीने, लोकांच्या लज्जेने किंवा फलाच्या आशेने आताही हित होऊच नये, असाच ईश्वरी संकल्प होता, असे दिसते. गोविंदपंत जिवंत होता तोपर्यंत अबदालीला शह बसेल व मराठ्यांना कदाचित रसद मिळेल, अशी आशा करण्यास जागा होती. तो वारल्यावर त्या कदाचित शक्यतेचाही लोप होऊन बाहेरून साहाय्य मिळण्याचा फारच थोडा संभव राहिला.’
अशा काहीशा निराशावादी विवेचनापाठोपाठ राजवाड्यांनी अचानक आपली पानिपतविषयक चिकित्सा अपुर्या पुराव्यांमुळे आपण आवरती घेत आहोत, हे सांगून वाचकांना धक्का दिला. जरी त्यांनी प्रामाणिकपणाने त्या साधनग्रंथातील पानिपतविषयक अस्सल पुरावा संपल्याचे सांगितले, तरी तोपर्यंत ज्या रोचक पद्धतीने त्यांनी ऐतिहासिक घटनाक्रमाची मांडणी करत आणली होती, त्यावरून ते आपल्याला १४ जानेवारी १७६१च्या अंतिम समरप्रसंगापर्यंत घेऊन जाणार, अशी रास्त अपेक्षा बाळगून असलेल्या वाचकांचा रसभंग होणे स्वाभाविक होते. तथापि राजवाड्यांचा नाइलाज होता. त्यांनी लिहिले, ‘पानिपतच्या शेवटल्या युद्धासंबंधी आजपर्यंत अस्सल असे एकही चिटोरे उपलब्ध झाले नाही. त्याबाबतचे बरेच प्रश्न सोडवावयाचे आहेत; पण अस्सल कागदपत्र एखादेसुद्धा जवळ नसल्यामुळे व्यर्थ, किंवा फार झाले तर किंचित संभाव्य असा निर्णय काढण्याच्या कोरड्या खटपटीत पडण्याची माझी इच्छा नाही व काही फायदाही नाही. बाकी तो वाद बराच महत्त्वाचा व मनोरंजक होण्याचा संभव आहे…’
