मराठीच्या आरंभकालाविषयीची आपली कल्पनाविलासी मांडणी आणखी मागे नेताना राजवाड्यांनी किलहॉर्नचा आधार घेतला. त्यांनी लिहिले, ‘कीलहार्न म्हणतो की, त्रिविक्रमभट्टाने आपल्या दमयंतीकथा नामक ग्रंथात आपला पिता नेमादित्य अथवा देवादित्य व आजा श्रीधर यांची नावे गोविली आहेत व आपले गोत्र शांडिल्य म्हणून सांगितले आहे. (पाटण येथील) या शिलालेखाच्या संस्कृत भागात त्याला कविचक्रवर्तिही म्हटले आहे. तेव्हा दमयंतीकथाकार जो त्रिविक्रम तोच चांगदेवाचा मूळपुरुष असावा, हे उघड आहे. जर हा त्रिविक्रम मराठी भाषा बोलत असे, तर त्याचा बाप व आजा हेही तीच भाषा बोलत असले पाहिजेत. दर पिढीस तीस वर्षे धरल्यास त्रिविक्रमाचा आजा श्रीधर शक ७७०च्या (इसवी सन ८४८च्या) सुमारास महाराष्ट्रात हयात असून मराठी भाषा बोलत असावा, असे अनुमान करणे प्राप्त होते. अर्थात चाळीसगांव प्रांतांत व महाराष्ट्रात शक ७७०मध्ये भास्कराचार्य, चांगदेव, ज्ञानदेव, एकनाथ व रामदास यांची मराठी भाषा प्रचलित होती, असा सिद्धांत करण्याकडे प्रवृत्ति होते…’
आपण रचत असलेली अनुमानांची परंपरा फारशी सबळ नाही, याची राजवाड्यांना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी पाठोपाठ काही शिलालेखांमधील व ताम्रपटांमधील मराठी शब्दांची यादी सादर केली. त्यांनी लिहिले, ‘शक ११२८च्या ह्या मराठी शिलालेखाच्या पूर्वीचा मराठी शिलालेख म्हटला म्हणजे शक ११०२मधला (इसवी सन ११८०मधला) परळ येथील मराठी शिलालेख होय. त्यापूर्वीचा एकाहून जास्त ओळी मजकूर मराठी भाषेत ज्यांत लिहिला आहे, असा ताम्रपट किंवा शिलालेख अद्याप प्रसिद्ध झालेला माहीत नाही; परंतु ज्यांत मराठी शब्द येतात व जे शब्द मराठी आहेत, प्राकृत किंवा संस्कृत नाहीत, असे निश्चयाने म्हणता येते, असे शिलालेख किंवा ताम्रपट दाखवून देणे शक्य आहे…’ नंतर वेगवेगळ्या पूर्वप्रकाशित नियतकालिकांच्या संदर्भांसह राजवाड्यांनी विविध ताम्रपटांमधील मराठी शब्दांची भलीमोठी यादी दिली. आश्चर्य म्हणजे ती यादी देताना शक १०४९, १०१६, ९२२, ९००, ८१०, ८३२, ७५७, ७३५, ७२८, ६७५, ६२१ आणि ६०२मधील ताम्रपटांचा त्यांनी समावेश केला होता.
जरी त्यावरून त्यांचा दांडगा व्यासंग स्पष्ट होत होता, तरीही त्याबाबतीत त्यांच्याकडून झालेला निष्काळजीपणा मोजक्या जाणकारांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. काहीशा कालांतराने का होईना, पण त्या विशिष्ट विवेचनाच्या ओघात राजवाड्यांकडून झालेल्या गफलती डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी समग्र राजवाडे साहित्याच्या चौथ्या खंडाला लिहिलेल्या अत्यंत साक्षेपी प्रस्तावनेत दाखवून दिल्या आहेत. अभिलेखांच्या जिज्ञासू अभ्यासकांनी त्यासाठी ती प्रस्तावना मुळातून अवश्य वाचावी.
तथापि डॉ. देशपांडे यांनी राजवाड्यांचे त्या विवेचनातील दोष दाखवून दिले असले, तरीही सर्व विवेचनच आक्षेपार्ह मानलेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. राजवाड्यांनी त्या विवेचनात उण्यापुर्या ५०-५२ शब्दांचे व्याकरण तपासून जी काही सावध विधाने केली होती, ती देशपांडे सरांनीही विचारार्ह मानली आहेत.
ती विधाने अशी… ‘शक ११०२मधील परळच्या शिलालेखापासून शक ६०२मधील विक्रमादित्य चालुक्याच्या ताम्रपटापर्यंत मराठी शब्दांची परंपरा वरील यादीवरून अविच्छिन्न लागलेली दिसते. पूर्वचालुक्य (बदामीचे चालुक्य), राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य (कल्याणीचे चालुक्य) व यादव यांच्या रियासतींमध्ये महाराष्ट्रात मराठी भाषा चालत होती, असे विधान करणे शक्य होते… शक ६०२मधील मराठी ज्ञानेश्वराच्या मराठीहून रूपाने प्राचीन असेल, हे तर उघडच आहे… शक ६०२च्या सुमारास हाल सातवाहन वगैरेंची मराठी भाषा सामान्य लोकांच्या बोलण्यातून बहुतेक गेली होती व तिच्याऐवजी मराठी सुरू झाली होती… शक १०००च्या सुमारास मराठी वगैरे अर्वाचीन भाषा सुरू झाल्या, असे डॉ. भांडारकर वगैरे कित्येकजण म्हणतात, ते मत ग्राह्य धरण्यास सबळ कारण अर्थात दिसत नाही… कदाचित पूर्वचालुक्यांच्या रियासतीचा प्रारंभ आणि मराठी भाषेचा प्रारंभ समकालीन आहे, असेहि विधान करणे पुढेमागे शक्य होणार आहे…’
