‘विचारविकार प्रदर्शनाच्या साधनांची (इतिहासपूर्व व इतिहासोत्तर) उत्क्रांती’ या निबंधात राजवाडे यांनी फक्त भाषेचा नव्हे तर कला आणि तंत्राधारित अभिव्यक्तीचाही विचार केला. ही उक्रांती शोधताना कलेचे मर्मही त्यांनी त्यांच्या शब्दांत मांडले – ‘‘ ध्वनी, रेघा, हावभाव व आकृती यांना भाषा, अक्षर, अभिनय व भांडी यांचे रूप देऊन या चारी नैसर्गिक व अनुकारक शक्त्यांचा उपयोग रोजच्या व्यवहारातील विचारप्रदर्शनाच्या कामी मनुष्याने केला. साध्या, सरळ, पोटभरू व्यवहाराला ही भाषादी साधने साळसूदपणे पुरी पडतात, हे खरे आहे. परंतु विचारांचे किंवा विकारांचे जेव्हा काहूर उठते आणि सुखदु:खादींचा जेव्हा कल्लोळ माजतो, तेव्हा साधी बोलणी आणि सुधी लिहणी कुचकामाची ठरतात आणि तीव्रतर साधनांचा आश्रय केल्यावाचून वादळाची शांती होत नाही. विचाराचा व विकारांचा हा तीव्र आवेग दर्शविण्यास मनुष्याने अगदी अज्ञातपूर्व अशी नवीन साधने शोधून काढली असे नाही. पूर्वीचा पाया ज्याला बिलकूल नाही. असे नवीन काहीच शोधून काढणे शक्य नाही. पाया पूर्वीचाच, साधने तीच, फक्त भरदारीत फरक. साध्या बोलण्याला जो ध्वनी लागतो त्यालाच दीर्घ व भरदार करून कोणत्याही आवेगाचे प्रदर्शन तीव्रपणे करणे म्हणजेच गाणे. साध्या मूळाबरहुकूम चित्रेखांना आवेगाचे तीव्र रूप भरदार, काल्पनिक व नाजूक रंगांनी देणे म्हणजेच चित्र काढणे. साध्या हावभावांचा अतिशय करणे म्हणजेच नाचणे आणि साध्या नित्याच्या घन आकृतींना तीव्र आवेग दाखवावयास लावणे म्हणजेच मूर्ती करणे. येणेप्रमाणे ध्वनी, रेखा, हावभाव व आकृती या प्रत्येकापासून मनुष्याने साधेपणा व अतिशायन या ऐयत्तिक भेदांबर दोन दोन निरनिराळ्या कला उत्पन्न केल्या.’’
याच ओघात पुढे राजवाडे फोटोग्राफी, सिनेमा आदी कृत्रिम साधनांचाही उल्लेख करतात. राजवाडे हे या आधुनिक साधनांचे अभ्यासक नव्हेत. पण इतिहासाच्या ओघात त्यांनी या तंत्राधारित कलांची दखल घेतली, तीही इसवीसन १९१८-१९ मध्ये, हे विशेष उल्लेखनीय. पुढे फोटोग्राफी आणि सिनेमा या कला-तंत्रांचा विचार वॉल्टर बेंजामिन या जर्मन तत्त्ववेत्ता व संस्कृती-अभ्यासकाने केला, त्याचा १९३५ सालचा ‘द वर्क ऑफ आर्ट इन द एज ऑफ मेकॅनिकल रिप्रोडक्शन’ हा निबंध प्रख्यात आहे. परंतु भारतात दादासाहेब फाळके यांनी पहिला सिनेमा बनवल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत सिनेमाला मानवी अभिव्यक्तीच्या उत्क्रांतीत स्थान देत होते, म्हणून त्यांनी सिनेमाच केलेला उल्लेख महत्त्वाचा. ते म्हणतात- ‘‘वस्तूंची हाताने चित्रे काढण्यापेक्षा प्रकाशाच्याद्वारा ती काढून घेण्याची प्रकाशलेखनकला महशूर आहे. नटांची मातब्बरी सफा काढून टाकून केवळ बाहुल्यांच्याकडून अभिनय व नर्तन करविण्याची कळसूत्राची कला अत्यंत पुरातन आहे. मूर्तीच्या आंगलटीत व मुखचर्यंत विचार व विकार साठविण्यापेक्षा वृक्ष, वेली, उपवने, उदयाने, मैदाने व टेकड्या यांच्या विशिष्ट रचनेने विचार व विकार चेतविण्याची भूमिरचनेची कला भरतखंडात फार जुनी आहे. वाद्यात फोनोग्राफ, चित्रणात प्रकाशलेखन व कळसूत्रात सिनेमा ही रूपे आधुनिक शास्त्र ज्ञानोत्पन्न अतएव सद्यस्क आहेत. या तिन्हीखेरीज बाकीची सर्व रूपे आपल्या या महाराष्ट्रात प्राचीन कालापासून उमद्या स्थितीत असलेली आढळतात. या बाह्य कलांचा जोड पूर्वीच्या आठ कलांना दिला…’’
परंतु ‘कलाविचार’ म्हणण्याइतके महत्त्वाचे ठरते, ते राजवाडे यांची नवरसांची केलेली सुगम व्याख्या आणि गाणे, चित्र यांच्या रसग्रहणाचा त्यांनी दाखवलेला मार्ग ‘‘मनाचे द्रवून जे उतू जाणे त्याला रस म्हणतात. श्ृंगार, वीर, करूण, अद्भुत, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स व शांत या नऊ तन्हांनी द्रवून मन उतू जाते व या नर्वाह उताचे प्रदर्शन गान, चित्रण, नृत्य व भूर्तिकरण या चार अतिशायनांनी मनुष्य साधतो. शब्द व भाषा यांचा व गानाचा काही एक संबंध नाही, गान हजारो शब्दांनी बोलत नाही. फक्त सप्त स्वरांनी नवरस बोलते. चित्रण अक्षरांनी म्हणजे बावन मातृकांनी (मुळाक्षरांनी) अर्थ दाखवीत नाही. फक्त पाच रंगांच्या न्यूनाधिक्याने नवरसांचे आविष्करण करते.’’!
