नील आर्ते
आमच्यासारख्या झेनिअल (हलकीशी मिलेनिअल पूर्व/ १९७७ च्या आसपास प्रकट वर्षं असलेल्या) पिढीला काही खमक्या फायरब्रॅण्ड प्रशासकांची कारकीर्द पाहता आली. टी. एन. शेषन, गो. रा. खैरनार, ज्युलिओ रिबेरो, राकेश मारिया ही काही त्यातली ठळक नावं. त्यांच्या धडाकेबाज कारवाया आदर आणि भयमिश्रित अचंब्याने आम्ही माध्यमांतून पाहात आलो. शिवाय १९८५ ते २००० साली जेव्हा माझ्या पिढीला बर्‍यापैकी समज येत होती तेव्हा गँगवॉर्ससुद्धा ऐन भरात आलेली. तीसुद्धा भयमिश्रित अचंब्याने (आदर अर्थातच नव्हे) आम्ही माध्यमांतूनच पाहात आलो. एका किमान सजगता असलेल्या मुंबईकराला या गँगवॉर्सची जितकी पार्श्वभूमी असेल तेवढी आपल्याला होतीच, पण हे सगळं रक्तलांछित अधोविश्व कसं घडत किंवा बिघडत गेलं याच्या उगमाकडे पाहणं सुखदायक नसलं तरी नक्कीच रोचक आहे. राकेश मारिया यांचं ‘व्हेन इट ऑल बिगॅन’ हे नवंताजं पुस्तक आपल्याला याच रोचक सफरीवर घेऊन जातं.

राकेश मारिया हे स्वच्छ आणि धडाडीची प्रतिमा असलेले आयपीएस अधिकारी. खास करून मुंबई बॉम्बस्फोटांच्या तपासामुळे जनमानसात प्रसिद्ध, पण आधी म्हटल्याप्रमाणे बॉम्बस्फोट किंवा त्याआधी भरात असलेलं गँगवॉर आणि एन्काउंटरपर्व हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू नाही, तर या गोष्टी सुरू करणारी करीम-लाला, हाजी मस्तान, वरदा इत्यादी आधीची पिढी आणि पुढच्या पिढीचा सुरुवातीचा काळ (दाऊद, गवळी, छोटा-बडा राजन इत्यादी) यावर हे पुस्तक बेतलेले आहे. त्या अर्थी मुंबई अंडरवर्ल्डची ही ‘ओरिजिन्स स्टोरी’ म्हणता येईल. जेव्हा गुंड हे ‘भाई’ नसून ‘दादा’ असत त्या काळापासून पुस्तकाची सुरुवात होते. करीमलाला, हाजी मस्तान आणि वरदाराजनचा उदयास्त हे या पुस्तकाचं मुख्य सुकाणू कथानक म्हणता येईल.

करीमलालाची कारकीर्द थोडी आधी चालू होते. १९३० मधल्या पेशावरमधील तरुण करीमलाला काही स्वत:च्या घोडचुका आणि काही नशिबाची वळणं यामुळे मुंबईत येऊन पडतो. (प्रकरण- गुडबाय कुन्नार) आणि बाकी दोघांच्या कारवाया थोड्या नंतर चालू होतात. (प्रकरण- व्हेन ऑल रोड्स लीड टू बॉम्बे) कर्ज आणि धाक-दपटशाने कर्जवसुली- करीमलाला, गोदीतील स्मगलिंग – हाजी मस्तान, अवैध दारू – वरदाराजन या प्रमुख गुन्ह्यांनी तिघांची ‘कारकीर्द’ सुरू होते. अर्थातच कथनाच्या बांधणीसाठी वापरलेले हे तीन ठळक समांतर वासे आहेत. त्याला दाऊदचे वडील इब्राहिम कासकर, करीमलालाचा भाऊ रहीमलाला, दिलीप अझीझ इत्यादी तुळया मिळतात आणि पुढच्या पिढीचे आलमजेब, अमीरजादा, समाद खान आणि (अर्थातच) दाऊद इत्यादी इत्यादी फाटे फुटतात. पण या विशाल अर्धशतकी कालपटाच्या कादंबरीसदृश सत्यांकनात नायक कुणीच नाही. सगळेच खलनायक आहेत. लेखक स्वत: पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांनी हे नीट अधोरेखित होईल याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसते.

वर नमूद केलेल्या गुन्हेगारांना सिनेमे (उदाहरणार्थ ‘दीवार’, ‘नायकन’), माध्यमे आणि राजकारणातून दैवी नायकांचे रूपडे बर्‍याचदा चढवले जाते. पण ते किती फोल आहे हे त्यांच्या क्रूर, मतलबी आणि संधिसाधू कारवायांतून नीटच कळते. गुन्हेगारांची आधीची पिढी कदाचित किंचित अधिक नेमस्त होती. उदाहरणार्थ हाजी मस्तानने आयोजित केलेल्या शस्त्रसंधीच्या बैठकीचे तपशीलवार सुरस वर्णन पुस्तकात आहे, पण ते वाचताना त्याचा नेमस्तपणा हा मानवी चांगुलपणापेक्षा त्याच्या स्वत:च्या फायद्यापुरत्या व्यापारी वृत्तीशी जास्त जोडलेला होता हेही समजते. नंतरच्या संघटित गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीच्या क्रौर्याची, भडक टाळक्यांची आणि मानापमानाच्या चक्रम कल्पनांची वर्णने तर अंगावर येतील अशीच. पण एका दृष्टीने पाहता दाऊदचा भाऊ साबीर याच्या खुनाने सुरू झालेला हा हत्येचा सिलसिला आपल्याला माहिती आहेच. शिवाय हुसेन झैदी यांच्या ‘डोंगरी टू दुबई’ आणि ‘भायखळा टू बँकॉक’ या पुस्तकांमध्येही बरीचशी माहिती मिळतेच.

कदाचित झैदी यांची शैली थोडी अधिक मनोरंजकही असावी. मग हे पुस्तक का वाचावं आणि वाचावं का, याची उत्तरं आहे- जरूर वाचावं. कारण झैदींसारख्या गुन्हेगारीविषयक बातमीदार लेखकाचा मान राखूनही हे मान्य करावं लागेल की पोलीस हे सत्याच्या काही अंगुळे अधिक जवळ असतात आणि राकेश मारिया यांनी त्याचा पुस्तक लिहिताना चांगल्या अर्थाने पुरेपूर वापर केलेला दिसतो.

१९५० ते ७० च्या कालावधीत ते स्वत: कार्यरत नसले तरी ‘डिपार्टमेंट’च्या स्रोतांची भरपूर मदत त्यांना साहजिकच मिळाली आहे आणि ते त्यांनी ऋणनिर्देशातही नमूद केलं आहे. ऐंशीच्या दशकात तर ते स्वत:च कार्यरत होते. त्यामुळे हे पुस्तक ज्याला इंग्रजीत ‘फर्स्ट पर्सन एन्काउंटर’ म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीचे कथन आणि विश्लेषण आहे. म्हणूनच या पुस्तकाची अर्पण-पत्रिका फार हृद्य आहे. ‘स्वत:चा जीव धोक्यात घालून अमोल माहिती देणार्‍या पोलिसांना, जागल्या नागरिकांना आणि खबर्‍यांना’ हे पुस्तक अर्पण करण्यात आलं आहे. दुर्लक्षित, चांगल्या वाईटाच्या तळ्यात मळ्यात इथे तिथे करत राहणार्‍या, बहुधा भणंग अशा अनाम खबर्‍यांना अर्पण झालेलं हे बहुधा एकमेव पुस्तक असावं आणि या रसरशीत रसदीमुळेच राकेश मारिया यांची शैली फार सनसनाटी नसूनही पुस्तक वाचनीय होतं.

समाद खान या ‘ऑन्फांत तेरीब्ल’ (मराठीत अवलक्षणी कार्टे) गँगस्टर पुत्राचे विध्वंसक वेडसर कारनामे, दोन्ही बाजूच्या पक्षांनी कोर्टात, तुरुंगात, भर रस्त्यात केलेल्या निर्घृण हत्या, दोन्ही पक्षांना ‘गेम’साठी मदत करणारे डबल (ढोलकी) एजण्ट्स, मन्या सुर्वेचा मुंबईच्या इतिहासातला पहिला एनकाऊंटर, बाबू रेशीम, रमा नाईक, अरुण गवळी यांची ब्रा गँग, बॉम्बस्फोटांआधीच्या दशकातील दाऊदच्या थंड, घातकी निर्णायक चाली, काही राजकारणी आणि पोलिसांच्या गुन्हेगारी साट्यालोट्याच्या कहाण्या, हे सर्व इथे अजून जास्त तपशिलात पण संयत भाषेत येतं. आलमजेबचा विक्षिप्त मृत्यू (प्रकरण: द अनएंटर्ड पीस पॅक्ट) आणि ‘तुंग आमाद तोह जंग आमाद’ हे पूर्ण प्रकरण खास वाचण्याजोगे आहे. दुसरी आणि अर्थातच राकेश मारियांची बाजू जी पोलिसांची बाजू आहे ती थोडी संक्षेपात पण तेवढ्याच रोचकपणे येते.

ज्युलिओ रिबेरो, द. शं. सोमण, मन्या सुर्वेचे ‘एन्काउंटरकार’ इसाक बागवान, चार्ल्स शोभराजला पकडणारे मधुकर झेंडे, वरदाला धडा शिकवणारे वाय. सी. पवार इत्यादी धडाडीच्या पोलीस अधिकार्‍यांची त्या काळातील बजबजपुरीवर नियंत्रण मिळवण्यात असलेली भूमिकाही बारकाईने समजून घेण्याजोगी आहे. काही अजिबात धडाडीच्या नसलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या उफराट्या कामगिरीचा उल्लेख किंवा अनुल्लेख थोडा त्रोटक वाटू शकेल पण त्याची कारणेही वाचताना स्पष्ट होत जातात. आणीबाणी, मिसा कायदा, गिरण्यांचा संप, अंतुलेंची वादग्रस्त कारकीर्द, ऑपरेशन ब्लू स्टार, पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या या त्याच काळात झालेल्या काही मोठ्या घटना. साहजिकच या प्रमुख घडामोडींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम त्या काळातील संपूर्ण समाजजीवनावर आणि पर्यायाने गुन्हेविश्वावरही झाला. या सार्‍याचे प्रतिबिंब पुस्तकात पडले आहे.

आपण नुकतंच एका चित्रपटात एका प्रतिस्पर्धी देशातील एका मुख्य शहरातील गुन्हेगारीचं सुलभ काल्पनिक सपाटीकरण पाहिलं आणि मनोरंजन म्हणून ते ठीकही आहे, पण दुसर्‍या बाजूला आपल्या भारतातल्या प्रमुख शहरांतील खर्‍याखुर्‍या गुन्हेगारीची पाळंमुळं किती गुंतागुंतीची आहेत हे या पुस्तकामुळे स्पष्ट होत जातं. फक्त एका गोष्टीत खास करून मुंबईच्या वाचकांचा रसभंग होऊ शकतो ती म्हणजे सर्वज्ञात हिंदी आणि काही मराठी वाक्यांचे लगेच येणारे इंग्रजी अनुवाद. (उदाहरणार्थ ‘मॅटर पटाना’) काही काही वेळा सोप्या पण लांब हिंदी उतार्‍यांनंतर लगेच इंग्रजी अनुवाद वाचावा लागणं कंटाळवाणं होऊ शकतं. पण हे पुस्तक जगभरात पोहोचवण्याच्या उद्देशाने लिहिलं गेलंय हे लक्षात घ्यायला हवं. काळा-करडा असला तरी हा मुंबईचा इतिहासच आहे. आणि तो जगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण इतिहास विसरणार्‍यांना काळ कधीच क्षमा करत नाही.